मोक्षमार्ग

25/28

अध्याय १० वा.—ईश्वराविषयीं ज्ञान

स्वताला प्रगट करण्यासाठीं व आमचें त्याच्याशीं ऎक्य करण्यासाठीं ईश्वर अनेक प्रकारें प्रयत्न करीत आहे. सृष्टि त्याच्याविषयीं आमच्या इंद्रियाम्स सतत सांगत आहे. त्याच्या हातानेम केलेल्या कामांत प्रगट झालेल्या त्याच्या प्रेमाचा व वैभवाचा ठसा खुल्या अंत:करणावर उमटेलच उमटेल. सृष्‍ट पदार्थाच्याद्वारे ईश्वराचें आपणांशी असलेलें दळणवळण आपल्या कानांस ऎकूं येतें, व समजतें. हिर्वीगार शेतें, गगनचुंबित वृक्ष, कळ्या व फुलें, चालत जातातसें भासणारे ढग, पडणारा पाऊस, खळखळ आवाज करणारा ओढा, आकाशांतील वैभवयुक्त तारकापुंज हीं सर्व आपल्या अंत:करणास त्याच्याविषयीम सांगतात, व ज्यानें हें सर्व जग उत्पन्न केलेम त्याची ओळख करून घेण्यास पाचारण करीतात. WG 80.1

आपल्या प्रभूनें सृष्‍टपदार्थाशीं त्या परमेश्वराच्या अमुल्य वचनांचीं सांगड घालून दिली आहे. मनुष्याच्या कष्‍टमय आयुष्यक्रमांतील सतात काळजीच्या स्थितींतहिं त्या परमेश्वराच्या सत्यवचनांची आठवण त्यास व्हावी, म्हणून झाडें, पक्षी, दरीतील वन्य पुष्पें, डोंगर, सरोवरें, शोभायमान व सुंदर आकाश त्याचप्रमाणें आपल्या रोजच्या आयुष्यक्रमांतील गोष्‍टी व सभोंवतालची परिस्थितिं ह्या सर्वाची ईश्वराच्या सत्यवचनांशीं प्रभूनें जोड लावून दिली आहे. WG 81.1

ह्या आपल्या कामाचें आपल्या लेंकरांनीं गौरव करावें, व ज्या सौंदर्याच्या योगानें ह्या आपल्या पृथ्वीला शोभा आली आहे, त्या साध्या परंतु मनोरम सौंदर्यांत त्यांनीं आनंद मानावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. तो सौंदर्यांचा भोक्ता तर खराच ,परंतु जें सौंदर्य बाहेरुन चित्ताकर्षक असतें, त्यापेक्षाम शिलाचे सौंदर्य त्यास अधिक आवडतें. फुलाच्या मनोहरतेप्रमाणें आपण शुद्धता व साधेपणा कमावावा अशी त्याची इच्छा आहे. WG 81.2

आपली लक्ष देण्याची इच्छा मात्र असली, तर ईश्वरनिर्मित कामें आपणांस आज्ञाधारकत्वाचें व विश्वासाचे अमूल्य धडे शिकवतील. आकाशांत युगानुयुग नेमून दिलेला मार्ग आक्रमणार्‍या तार्‍यांपासून तों तहत अतिशय बारीक अशा परमाणूपर्यंतच्या सर्व सृष्‍ट वस्तु त्या निर्माणकर्त्या ईश्वराची इच्छा मान्य करीत आहेत. ईश्वरहि त्यानें निर्माण केलेल्या सर्व वस्तूंची काळजी घेत आहे व त्यांचें चालवीत आहे. अनंतकालापासून अनंतसृष्‍टि चालवीत असतां झाडावर बसून न भिता सुखानें गाणें गाणार्‍या एखाद्या लहानशा चिमणीचांहि तो प्रभु काळजी वहात असतो. माणसें आपल्या रोजच्या कामगिरीवर जातात तेव्हां, रात्रीं निजतात व सकाळीं उठतात तेव्हां, एखादा श्रीमंत मनुष्य आपल्या वाड्यांत मेजवाणी करित असतो तेव्हां, अगर एखादा गरीब मनुष्य आपल्या मुलाबालांसह गरीबीची मीठ भाकरखात असतांना वगैरे प्रत्येक जणाकडे त्या स्वर्गीय पित्याचें अगदीं बारीक नजरेनें लक्ष असतें. ईश्वराच्या नजरेस येत नाहीं असा एकहि अश्रुबिंदु जमिनीवर पडत नाहीं, व असें एकहि चेहेर्‍यावरचें हास्य नाहीं, कीं तें त्या प्रभूच्या लक्षांत येत नाहीं. WG 81.3

ह्या सर्व गोष्‍टींवर आपला पुर्ण विश्वास असेल, तर जगांतील सर्व शुष्क काळज्या नाहींशा होतील. हल्लींप्रमाणें आपल्या जिण्यांत निराशा भरलेली असायाची नाहीं. कारण अशा वेळी प्रत्येक गोष्‍ट मग ती लहान असो वा मोठी असो, जो नानाप्रकारच्या काळज्यांनीं गोंधळून जात नाहीं, अगर त्याम्च्या भारामुळें कष्‍टीही हो ऊन जात नाहीं अशा त्य ईश्वराच्या हातांत सोंपवलेली असते, वमग आत्म्याच्या ज्या शांततेस पुष्कळ लोक बहुत काळापर्यत पारखे झालेले असतात ती शांतता आपणांस अनुभवावयास सांपडते. WG 82.1

ह्या पृथ्वीवरील मनोहर अशा सौंदर्यांत तुमच्या इंद्रियांना आनंद होतो, त्याअर्थी ज्या जगांत पापाचा व म्हणून मृत्युचा डागहि कधीं लागत नाहीं व ज्याच्यावर ह्या भौतिक सृष्टीप्रमाणें शापाची छायाहि नाहीं, अशा पुढील जगाचा विचार करा। तारण झालेल्यांच्या त्या गृहाचें चित्र डोळ्यसमोर आणा, व लक्षांत ठेवा, कीं तुमच्या त्या काल्पनिक चित्रापेक्षांही तें गृह अधिक वैभवाचें असेल. ह्या सृष्टींतील ईश्वराच्या नानाप्रकारच्या देणग्यांत आपणांस त्याचें वैभव केवळ अंधुक असें दिसतें. शास्त्रांत असें सांगितलें आहे, कीं “डोळ्यानें पाहिलें नाहीं व कानांनीं ऎकलें नाहीं, व माणसाच्या मनांत आलें नाहीं, आपणांवर प्रीति करण्यासाठीं देवानें जें कांहीं सिद्ध केले तें.”1 WG 82.2

कवि व सृष्‍टपदार्थविज्ञानशास्त्रवेत्ता हे सृष्‍टीविषयी पुष्कळ सांगत असतात, तथापि ह्या पृथ्वीवरील सौंदर्याचा उत्कृष्‍टपणें उपभोग एका ख्रिस्ती मनुष्यासच केवळ घेतां येतो; कारण त्यासच केवळ त्या पित्याचें हस्तकौशल्य ओळखतां येतें, व फुलामधील, झुडुपामधील अगर एखाद्या झाडामधील त्याचें प्रेम त्यास दिसून येतें. नदी, समुद्र ह्याचें महत्त्व जो त्यांजकडे तीं ईश्वराच्या मनुष्यावरील प्रेमाचेंच दर्शक आहे असें मानीत नाही, अशा कोणासही कळून येत नाहीं. WG 82.3

ईश्वरानें निर्माण केलेल्या वस्तुंमधून व अंत:करणांतील त्याच्या आत्म्याच्या प्रभावामधून तो आपणांशीं बोलतो. आपल्या स्वताच्या व भोंवतालच्या परिस्थितींत जे रोजच्या रोज फेरफार घडून येतात त्यांवर आपणाला मौल्यवान धडे--जर ते शिकण्यासाठीं आपलें अंत:करण खुलें ठेवीलें तर सहज सांपडतील. ईश्वरनिर्मित गोष्‍टींचा तपास करीत असतां गीतकर्त्यानें म्हटलें होतें, “परमेश्वराच्या दयेनें पृथ्वी भरली आहे.”1 “कोण बुद्धिमान? तर तो हे अर्थ ध्यानांत धरो, आणि परमेश्वराची परम दया ते समजोत.”2 WG 82.4

ईश्वरानें दिलेल्या शास्त्रवचनांतूनहि तो आपणांशी बोलत आहे. ह्या ठिकाणीं त्याच्या शीलाचें, मनुष्यांशीं चाललेल्या त्याच्या व्यवहारांचें व मनुष्याच्या तारणाच्या कामगिरीचें प्रगटीकरण अगदीं स्पष्‍ट अक्षरांनीं नमुद केलें आहे; शिवाय धर्मगुरू, भविष्यवादी, व इतर जुने पवित्र लोक ह्यांचाहि इतिहास आपणांपुढें ठेवून दिला आहे. ते “आम्हांसारख्या स्वभावाचे मनुष्य होते.”3 आपल्याप्रमाणें निराशेमध्यें त्यांनीं कसा झगडा केला, मोहाला ते कसे बळी पडले, व इतकें असूनहि ईश्वराच्या कृपेनें धैर्य करून त्यांनी जय मिळविला हें आपणांस माहीत आहेच. ह्या त्यांच्या गोष्‍टी पाहात असतां आपणांसही नीतिमत्व मिळविण्यास उत्तेजन येतें. सोज्वळ, प्रेमाचे व सुखाचे असे त्यांचे अमूल्य अनुभव व प्राप्‍त झालेल्या ईश्वराच्या कृपेनें जें कार्य त्यांनीं केलें तें, हीं वाचीत असतां जो आत्मा त्यांच्या अंत:करणांत प्रज्वलीत झाला होता, तोच आत्मा आपल्या अंत:करणांत त्याम्ची बरोबरी करण्याची व त्यांच्या शीलाप्रमाणें आपलेंही शील बनवून घेण्याची पवित्र इच्छा--त्यांच्याप्रमाणें ईश्वराबरोबर चालण्याची--उत्पन्न करितो. WG 83.1

जुन्या करारांतील लेखाविषयीं व नव्या कराराला ते लागू पडणारे आहेत. ह्याविषयीं प्रभु येशुनें म्हटलें आहे, “मजविषयीं साक्ष देणारे तेच आहेत.”4 होय, होय, सर्व शास्‍त्र येथून तेथून ख्रिस्ताविषयींच सांगत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या आरंभापासून म्हणजे “जें झालें असें कांहींच त्यानें केल्यावांचून झालें नाहीं”5 येथपासून तों वचन समाप्‍त होईपर्यंत म्हणजे “पहा मी लौकर येतों”6 येथपर्यंत त्याचीं कामें आपण वाचतों व त्याची वाणी आपण ऎकतो. तारकाशीं आपला परीचय व्हावा अशीं इच्छा असली तर सर्व पवित्रशास्‍त्राचें अध्ययन करा. WG 83.2

ईश्वराच्या वचनानीं तुमचें सर्व अंत:करण भरून टाका. तीं वचनें जीवनाचें उदक असून तुमची मोठी तहान भागवणारी आहेत. स्वर्गांतून उतरलेली ती वचनें म्हणजें म्हणजे स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे. प्रभु येशू म्हणतो. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाहीं व त्याचें रक्त त्याला नाही तर तुम्हांमध्यें जीवन नाहीं” “जी वचनें मी तुम्हांस सांगितलीं ती आत्मा व जीवन आहेत.”1 असें म्हणून तो आपल्या स्वताचें स्पष्‍टीकरण करीत आहे. जें कांहीं आपण खातों व पितों त्यानेंच आपली शरीरें घडवली आहेत, भौतिक गोष्‍टीप्रमाणेंच आत्मिक वळण देऊन सामर्थ्य आणतें. WG 84.1

ज्या गोष्‍टींकडे आपण लक्ष द्यावें अशी देवदूतांची इच्छा आहे, त्यापैकीं तारण ही एक आहे. तें तारण म्हणजे अनंतकालापासून तारण केलेल्याचें शास्त्र व गाणेंच आहे. म्हणून आतांहि तें मनापासून विचार करण्यासारखें व अभ्यास करण्यासारखें नाहीं काय ? ख्रिस्ताची अमर्याद दया, त्याचें प्रेम, व त्यानें आमच्यासाठीं केलेला आत्मयज्ञ हीं आम्हांस फारच गंभीर विचार करावयास सांगत आहेत ; म्हणुन आपण आपल्य प्रिय तारकाच्या व मध्यस्थाच्या शीलाचा, व जो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून मुक्‍त करण्यास आला त्याच्या कामगिरीचा विचार करावा. ह्याप्रमाणें स्वर्गीय गोष्‍टींबाबत आपण विचार करतों, तेव्हां आपली श्रद्धा व आपलें प्रेम स्वर्गीय गोष्‍टीबाबत आपण विचार करतों, तेव्हां आपली श्रद्धा व आपलें प्रेम हीं वृद्धिंगत होत जातात, व आपल्या प्रार्थना ईश्वराकडून अधिक स्वीकारण्यालायक होतात; कारण त्या अधिक श्रद्धायुक्‍त व प्रेमाच्या, अधिक विचाराच्या व अंत:करणपूर्वक केलेल्या असतात, व म्हणून ख्रिस्ताचे ठायीं आपला विश्वास अधिक वाढतो, व जे त्याच्यामार्फत ईश्वराकडे जातात, त्यांस वांचविण्याच्या त्याच्या सामर्थ्याचा ढळढळीत अनुभव त्याम्स येतो. WG 84.2

ख्रिस्ताच्या पूर्णत्वाविषयीं आपण विचार करीत असतां, आपणांमध्ये सर्वस्वी पालट व्हावा, व त्याच्या शुद्धतेंत अगदीं त्याच्यासारखेच आपण व्हावें ही इच्छा आपणांस होते. ज्याला आपण पूज्य मानतों, त्याच्यासारखी होण्याची तहान भुक आपणांस लागते. जों जों अधिक आपलें विचार ख्रिस्ताविषयीं असतील, तों तों त्याच्याविषयीं आपण दुसर्‍यांस सांगूं व सार्‍या जगाला त्याची ओळख करून देऊं. WG 84.3

निष्णात अशा पंडितांकरितांच मात्र शास्‍त्र लिहिलें आहे असें नाहीं, तर तें सामन्य जनसमूहाकरितांहि लिहिलें आहे. तारणास उपयुक्त अशी त्यांतील सत्यवचनें माध्यान्हकाळच्या सूर्याप्रमाणें स्पष्‍ट अशीं आहेत ; व जें त्यांत स्पष्‍टपणें प्रगट केलेल्या ईश्वराच्या वचनांस न जुमानता आपल्याच मतानें चालतात, अशा लोकांखेरीज दुसरा कोणीहि मनुष्य त्या सत्यवचनांसंबंधानें आपला मार्ग चुकत नाहीं. WG 85.1

शास्त्र काय शिकवितें ह्याबद्दल दुसर्‍या कोणाचाहि पुरावा आपण घेऊं नये, तर तें आपण स्वतांच आपल्याकरतां शिकावें. आपल्याबद्दल दुसर्‍यांस विचार करावयास लाविलें, तर आपला उत्साह व आपली विचारशक्ति खुंटतील. ईश्वरी वचनांतील गुढ अर्थ समजण्याचें सामर्थ्य नष्‍ट होण्याइतक्या एखाद्या विषयाचें जरूर तें मनन करण्याच्या अभावामुळें मनाच्या उच्च शक्‍तिचा अशा रीतीनें र्‍हास होऊन जाईल. शास्‍त्रांतील वचनाम्ची व आत्मिक गोष्‍टींची एकमेकांशी तुलना करून त्यांतील विषयांचा एकमेकांमधील संबंध शोधून काढण्याकडे मन लाविलें, तर त्याची अधिक वाढ होईल. शास्‍त्रवचनांच्या अभ्यासापेक्षां बुद्धीची वाढ करणारें असें दुसरें कंहीं एक नाहीं विचार उदात्त करावयास व मानसिक शक्तींस सामर्थ्य देण्यास ह्या पुस्तकाइतकें दुसरें कोणतेहि पुस्तक समर्थ नाहीं. करावा त्या रीतीनें आपन त्याचा अभ्यास केला, तर आपलें शील होऊन आपल्या हेतूंस ह्यावेळीं क्वचितच दिसणारी स्थिरता प्राप्‍त होईल. WG 85.2

परंतु हीहि गोष्‍ट आहे, कीं शास्‍त्राचा उडत उडत अभ्यास केल्यानें फारच थोडा फायदा होतो. एखादा मनुष्य सबंध शास्त्र वाचून टाकील, परंतु त्यास त्यांतील सौंदर्य दिसून येणार नाहीं, अगर त्यांतील वचनांचा खोल व गुढ अर्थ समजनार नाहीं. एकाच कलमाचें महत्व मनास बरोबर पटेल अशा रीतीनें तयार केलें, व त्या कलमाचा तारणाशीं काय संबंध आहे, हें पक्कें समजून आलें, तर अशा रीतीनें केलेला अभ्यास मनसोक्त, वरवर वाचलेल्या च कांहींएक शिक्षण प्रत्यक्ष न मिळालेल्या बर्‍याच कलमांच्या अभ्यासापेक्षां अधिक महत्त्वाचा आहे. आपलें पविय्तशास्‍त्र अगदीं जवळ बाळगा, व संधि सांपडेल तेव्हां तें वाचा. त्यांतील प्रतिकें लक्षांत ठेवा. रस्त्यांतून चालतांना देखील कलम वाचा. त्याचें मनन करा, व अशा रीतीनें तें मनांत पक्कें बिंबवून ठेवा. WG 85.3

एकचित्तपणें लक्ष दिल्याशिवाय व प्रार्थनापूर्वक केलेल्या अभ्यासाशिवाय ज्ञान प्राप्‍त होणें नाहीं. शास्‍त्रांतील कांहीं कांहीं भाग अगदीं गैरसमजूत न होता समजण्यासारखे आहेत. कांहीं असे आहेत, कीं त्यांचा अर्थ सहज वाचून समजून येण्यासारखा नाहीं. त्यांचा अभ्यास करावयाचा म्हणजे वचनावचनांची सांगड घालून व त्यांची तुलना करून करावयाचा आहे. या कामीं विचारपूर्वक शोध केला पाहिजे, व प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. पृथ्वीच्या पोतांत असलेल्या व म्हणून अदृश्य अशा मौलुअवान धातूंच्या वचनांचा शोध, तें गुप्तधन आहे असें स्मजून जो करतो त्यास, निश्काळजीनें शोध करणारास कधीहि न सांपडणारी अशीं अमूल्य सत्य तत्वें सांपडतात. अंत:करणांत बिंबलेली ती ईश्वराचीं वचनें जीवनरूप पाण्याच्या साठ्यामधून निघालेल्या झर्‍यांप्रमाणें होतील. WG 86.1

प्रार्थना केल्याशिवाय शास्त्राचा अभ्यास कधीही करूं नयें. तें उघडण्यापूर्वी पवित्र आत्म्याचा प्रकाश आपणांमध्यें पडावा अशी ईश्वराची विनंति करावी; म्हणजे मग तो प्रकाश मिळेल. WG 86.2

नथनेल प्रभु येशूकडे आला, तेव्हां त्या तारकानें सांगितलें, “पहा, हा खरोखर इस्त्रायली आहे, यांत कपट नाहीं.” त्यावर नथनेल म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली ?” येशूनें त्याला उत्तर दिलें, “फिलीपसानें तुला बोलाविल्यापुर्वी तूं अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हां मीं तुलापाहिलें.”1 सत्य काय आहे हें समजण्यास प्रकाश मिळावा म्हणून आपण त्यास शोधिलें, तर तो प्रभु आमच्या प्रार्थनेंच्या एकान्त स्थलीदेखील आम्हांस पाहिल. अंत:करणानें नम्र असणारें जे लोक दैवी मदतीची अपेक्षा करतील, त्यांस स्वर्गीय दूत मदत करतील. WG 86.3

पवित्र आत्मा त्या तारकाचा मोठेपणा प्राप्‍त करून देऊन त्याचें गौरव करतो. ख्रिस्‍त प्रगट करणें, त्याचें नीतिमत्व दाखवून देणें, व त्याच्याकडून प्राप्त होणारें तारण दाखवून देणें हीं पवित्र आत्म्याचीं कामें आहेत. प्रभु येशूनें म्हटलें आहे “जें माझें आहे त्यांतून घेऊन तें तुम्हांस विदित करील.”2 सत्यपणाचा आत्मा हाच काय तो दैवी सत्य शिकविणारा आहे. ईश्वरानें आपला पुत्र मनुष्यांसाठीं दिल्यापासून तो मनुष्यजातीला किती थोर मान देत असला पाहिजे ? व म्हणून त्यानें स्वताचा पवित्र आत्मा मनुष्याला शिक्षक व मार्गदर्शक असा नेमिला आहे. WG 87.1