मोक्षमार्ग
अध्याय ६ वा.—श्रद्धा आणि स्वीकार
पवित्र आत्म्यानें तुमच्या विचारशक्तीस चलन दिल्यामुळें पापाची दुष्टता, त्याचें सामर्थ्य, त्याचा अपराध व त्यापासून होणारें दु:ख ह्यांची तुम्हांस कांहींशीं कल्पना होते व त्यामुळें तुम्ही त्याचा तिरस्कार करीतां. त्यानेंच आपली ईश्वरापासून ताटातूट केली केली आहे व त्या दुष्टाच्या सामर्थ्याच्या कचाटींत आपण सांपडलों आहों असें ज्ञान तुम्हांस होतें, त्याच्या तावडींतून सुटण्याचा जसजसा तुम्ही प्रयत्न करीतां तसतशीम तुमच्या अशक्तपणाची खात्री तुम्हांस पटतें. तुमचें हेतु अपवित्र असतात व अंत:करण मलीन असतें. आपलें जिणें स्वार्थी व पापी आहे असें तुमच्या नजरेस येतें. क्षमेची, शुद्धीकरणाची व पापाच्या तावडींतून मुक्त होण्याची अपेक्षा तुम्ही करीतां, परंतु ईश्वराशीं एकतानता व स्वरूपता ह्या प्राप्त होण्यास तुम्हांस काय करीतां येईल ? WG 46.1
आत्म्याचेठायीं शांतता, प्रेम व पापाची क्षमा ह्यांची तुम्हांस आवश्यकता आहे. हीं पैका देऊन विकत घेतां येत नाहींत, बुद्धिनें व शहाणपणानें पैदा करीतां येत नाहींत, व तुमच्या स्वतांच्या प्रयत्नानें तीं तुम्हांस प्राप्त होत नाहींत. परंतु ईश्वर तीं तुम्हांस “पैक्यावांचून अगर मोलावांचून”1 केवळ देणगीदाखल देतो. तुम्ही हात घालून जर तीं देणगी चांचपलींत तर ती तुमचीच आहे. परमेश्वर म्हणतो “तुमची पापे जरी लाखेसारखीं असलीं तरी तीं बर्फासारखी पांढरी होतील. किरमिजाप्रमाणें जरी तीं तांबडी असली तरी लोकरीसारखीं पांढरी होतील.”2 “मी तुम्हांस नवें हृदय देईन व नवा आत्मा तुम्हांमध्यें घालीन.”3 WG 46.2
तुम्हीं आपलीं पापें कबूल करून अंत:करणपूर्वक त्यांचा त्याग केला आहे, व ईश्वराला वाहून घेण्याचा निश्चय केला आहे, तर मग ईश्वराकडे जा व आमचीं पापें पुसून टाकून “आम्हालां नवें अंत:करण देशील काय” असें विचारा. मग तो हें करीतो तें त्यानें वचन दिलें आहे म्हणून करीतो असा दृढ विश्वास धरा. ईश्वर जी देणगी देण्याचें वचन देतो ती आपणांस प्राप्त होते, व ती आपलीच आहे असा पक्का विश्वास पाहिजे; व हाच धडा प्रभु येशूनें ह्या लोकीं असतां घालून दिला होता. लोकांनीं त्याचे सामर्थ्यावर जेव्हां विश्वास ठेविला तेव्हां त्यानें लोकांचें रोग बरे केले. ज्या गोष्टी प्रत्यक्ष त्यांच्या नजरेस पडतील अशा गोष्टीत त्यानें त्यांस साहय्य केलें व अशा रीतीनें ज्या गोष्टी त्याचे दृष्टीचे टप्याचे आड होत्या त्यांजवर विश्वास ठेवण्यास-- तें इतकें कीं आपणांस पापंची क्षमाहि करितां येते एथपर्यंत त्याचेठायी प्रेरणा उत्पन्न केली. पक्षघातानें आजारी असलेल्या मनुष्यास बरा करण्यांत त्यानें असें स्पष्ट सांगितलें आहे, कीं “पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हें तुम्ही जाणावें.” तेव्हां त्यानें पक्षघात्याला सांगितलें, कीं “उठ, आपली बाज घेऊन घरी जा.”1 त्याचप्रमाणें प्रेषित योहान्न ख्रिस्ताच्या चमत्कारांविषयीं म्हणतो. “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास धरावा, आणि विश्वास धरून तुम्हीं त्याच्या नावांचें जीवन पावावें म्हणून हीं लिहिलीं आहेत.”2 WG 46.3
येशूनें रोग्यास बरें केल्याबद्दलची जी हकिकत शास्त्रांत दिली आहे तीजवरून आपल्या पापांची क्षमा होण्यासाठीं आपण तीजवर कसा विश्वास ठेवावा हें आपणांस कळावें. बेथसूदा येथील पक्षघाती मनुष्याच्या गोष्टीकडे आपण वळूं. ३ त्या गरीब दुखाईताचा अगदीं नाइलाज झाला होता; कारण त्याचे अवयव अडतीस वर्षेपर्यंत अगदीं निरुपयोगी झालेले होते. तथापि येशूनें त्यास म्हटलें, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरीं जा.” यावर तो दुखणाईत म्हणाला असता, “हे प्रभु तूं मला बरा करिशील तर मी तुझें वचन मानीन;” परंतु नाहीं. त्यानें ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेविला, व आपणांस त्यानें बरें केलें असा विश्वास धरून त्यानें एकदम उठण्याचा प्रयत्न WG 47.1
केला, चालण्याची त्यास इच्छा झालीं व एकदम तो चालूंहि लागला. ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणें तो चालला म्हणून ईश्वरानें त्यास सामर्थ्य दिलें व तो बरा झाला. WG 48.1