युगानुयुगांची आशा

18/88

अध्याय १७—निकदेम

योहान ३:१-१७.

निकदेम हा यहूदी राष्ट्रातील एक उच्च पदस्थ असून तो उच्चविद्याविभुषित आणि प्रतिभावत व्यक्ती होता. त्याचप्रमाणे तो राष्ट्रीय महासभेचा एक सन्माननिय सभासद होता. येशूच्या शिकवणीमुळे इतराबरोबर तोही खळबळून गेला होता. जरी तो सुसंपन्न, सुविद्य आणि प्रतिष्ठित होता, तरी तो साध्याभोळ्या नासरेथकराकडे नवलाइने आकर्षित झाला होता. येशूच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शिकवणीने त्याच्यावर जबरदस्त पगडा पडला होता. त्यामुळेच तो त्या अद्भुत सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी अधिक उत्सुक होता. मंदिर स्वच्छ (शुद्ध) करण्यासाठी ख्रिस्ताने केलेल्या अधिकाराच्या उपयोगामुळे याजक व अधिकारी यांचा निग्रही द्वेष भडकला होता. DAMar 127.1

परदेशस्थाच्या सामर्थ्याची त्यांना भीती वाटत होती. एका साधारण गालीलकराचे धारिष्ट्य त्यांना सहन करायचे नव्हते. म्हणून त्यानी त्याच्या कामाचा शेवट करण्याचा निर्धार केला होता. तथापि तसे काम करण्याबाबत सर्वच सहमत नव्हते. त्यांत असेही काही होते की जो देवाच्या आत्म्याद्वारे असे करण्यास उघडपणे धजत होता त्याला विरोध करण्यास भीत होते. इस्राएलातील पुढाऱ्यांच्या पापांबद्दल निषेध केल्यामुळे संदेष्ट्याचे शिरकान कसे करण्यात आले होते याचे स्मरण त्यांना झाले. विधर्मि राष्ट्राचा यहूदी लोकांवरील गुलामगिरीचा अंमल हा देवाने केलेल्या दोषारोपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्यांच्या हट्टवादीपणाचा परिणाम होता हे ते जाणून होते. याजक व आधिकारी हे येशूविरूद्ध कटकारस्थान करण्याद्वारे त्यांच्या वाडवडीलांचे अनुकरण करीत होते आणि त्यामुळे राष्ट्रावर नव्याने संकटे आणू शकत होते अशी त्यांना आशंका वाटत होती. निकदेमाने तसे विचार मांडले. सान्हेद्रिन सभेत, जेव्हा येशूविषयी विचार विनिमय करण्याचे मान्य करण्यात आले होते तेव्हा निकदेमाने सावधगिरीचा व माफकपणाचा सल्ला दिला होता. त्याने आग्रहपूर्वक सांगितले की, जर येशूला देवाकडूनच अधिकार देण्यात आला असेल तर, त्याच्या इशाऱ्यांचा अव्हेर करणे हे धोक्याचे होईल. याजक या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत, आणि तात्पुरते येशूविषयी काही उपाय न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. DAMar 127.2

येशूविषयी ऐकल्यापासून, निकदेमाने मशीहाविषयीच्या भाकीतांचा उत्कंटापूर्वक कसून अभ्यास केला होता; जस जसा त्याने अधिक अभ्यास केला तस तशी त्याच्या मनाची पक्की खातरी होत गेली की, जो एकजण येणार होता तो हाच होय. मंदिराच्या भ्रष्टीकरणाबाबत इस्राएलातील अनेक लोकासह तोही अतिशय मानसिकरित्या दुःखी झाला होता. क्रयविक्रय करणाऱ्यांना जेव्हा येशूने मंदिरातून पिटाळून लावलेल्या त्यावेळेच्या देखाव्याचा तो एक साक्षीदार होता; दैवी सामर्थ्याचा अद्भुत अविष्कार त्याने त्याच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. दरिद्री लोकांना येशू जवळ घेताना त्याने पाहिले होते, येशू रोग्यांना बरे करतांना त्याच्या दृष्टीस पडले होते. त्यांच्या हर्षीत नजरा त्याने पाहिल्या होत्या, आणि त्यांची स्तुतीपर स्तोत्रे त्याने ऐकली होती; म्हणून नासरेथकर येशू हा देवानेच पाठविलेला होता याबद्दल तो तिळमात्र शंका घेऊ शकत नव्हता. DAMar 127.3

म्हणून येशूची भेट घेण्यासाठी तो फारच उत्सुक झाला होता. तथापि अगदी उघडपणे त्याची भेट घेण्याचे त्याने टाळले. अद्याप अति अपरीचित असलेल्या गुरूचा सहानुभूतीने स्वीकार करणे हे त्या यहूदी उच्चपदस्थ अधिकाऱ्याला अतिशय क्षुद्रपणाचे वाटले. शिवाय यहूदी धर्मसभेला या त्याच्या भेटीविषयी कळले असते, तर त्याने स्वतःवर तिरस्कार व निंदा ओढवून घेतली असती. तो तसा उघडपणे भेटीसाठी गेलाच असता तर इतरही त्याचे अनुकरण करतील या कारणामुळे त्याने येशूची भेट गुप्तपणे घेण्याचाच निश्चय केला. जैतून डोंगरावर येशू विश्रांति घेत असलेल्या स्थळाची खास चौकशीद्वारे माहिती काढून सर्व शहर गाढ झोपी जाईपर्यंत तो थांबला आणि नंतर त्याला शोधून काढले. DAMar 128.1

ख्रिस्ताच्या समक्षतेत निकदेमाला विचित्र लाजाळूपणा वाटू लागला, तो त्याने त्याचा शांत स्वभाव व मोठेपणा यांच्या अवरणाखाली लपविण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणाला “गुरूजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहा हे आम्हास ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव त्याच्याबरोबर असल्यावांचून कोणाच्याने करवणार नाहीत.’ शिक्षक आणि अद्भुत चमत्कार करण्याचे सामर्थ्य या ख्रिस्ताच्या दुर्लक्ष देणग्याविषयी प्रशंसोद्गार काढून त्याने संभाषणाचा पुढचा मार्ग तयार करण्याची उमेद बाळगली. विश्वास प्रदर्शित करण्यासाठी आणि संपादन करण्यासाठी त्याच्या शब्दांची रचना करण्यात आली होती; परंतु खऱ्या अर्थाने त्या शब्दाद्वारे अविश्वासच प्रदर्शित झाला होता. त्याने येशूला मशीहा म्हणून मान्य केले नव्हते (स्वीकारले नव्हते), तर देवाने पाठविलेला फक्त एक शिक्षक म्हणूनच मान्य केले होते. DAMar 128.2

त्या स्तुतिपर अभिवादनाला पसंती न दाखवता येशूने बोलणाऱ्यावर आपली तेजस्वी नजर टाकली, जसे काय त्याने त्याच्या संपूर्ण अंतर्यामाचे परिक्षणच केले होते. त्याचा अगम्य ज्ञानाने त्याने त्याच्यासमोर एक सत्य संशोधक पाहिला. निकदेमाच्या भेटीचा उद्देश येशू जाणून होता, आणि त्या श्रोत्याच्या अतःकरणात अगोदरच असलेला विश्वास अधिकच खोलवर रुजविण्यासाठी तो सरळच मुद्याकडे वळला; आणि येशू मोठ्या गांभिर्याने पण अतिव दयाळूपणे म्हणाला, “मी तुला खचीत खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” योहान ३:३. DAMar 128.3

निकदेम प्रभूबरोबर वाटाघाटी करण्यासाठी त्याच्याकडे आला होता. परंतु येशूने सत्याची मूलभूत तत्त्वे थोडीशी उघड करून दाखवली. तो निकदेमाला म्हणाला, तुला तात्त्विक ज्ञानाची इतकी आवश्यकता नाही जितकी अधिक आध्यात्मिक पुनरुजीवनाची आहे. तुझ्या जिज्ञासाचे समाधान होण्याची गरज नाही, तर तुला नव्या अतःकरणाची गरज आहे. स्वर्गीय गोष्टीचे मोल मान्य करण्यापूर्वी तुला स्वर्गातून नवजीवन प्राप्त झाले पाहिजे आणि हा बदल घडल्याशिवाय, माझा अधिकार किंवा माझे कार्य याविषयी माझ्याशी उहापोह करून तुला कोणताही तारणदायी फायदा होणार नाही. DAMar 129.1

पश्चाताप व बाप्तिस्मा या विषयीचे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे संदेश निकदेमाने ऐकले होते, आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणाऱ्याला तो लोकांना दाखवीत होता हे सुद्धा निकदेमाने पाहिले होते. खुद्द निकदेमाला माहिती होते की यहूदी लोकांत आध्यात्मिकतेची प्रचंड न्यूनता होती आणि ते दुराग्रह व जगिक महत्वाकांक्षा यानी मोठ्याप्रमाणात पच्छाडले होते. येशूच्या (मशीहा) येण्यामुळे काहीतरी चांगल्या गोष्टी घडण्याची त्याने आशा बाळगली होती. तरीसुद्धा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे हृदयस्पर्शी संदेश त्याच्या पापांची जाणीव करून देण्यास अपयशी ठरले होते. तो कट्टर परुशी होता, तो स्वतःच्या सत्कर्माबद्दल स्वतःच शेखी मिरवत होता. त्याच्या उपकारक कार्यामुळे आणि मंदिराचे कार्य सतत चालू ठेवण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्यामुळे तो सर्वत्र प्रशंसेस पात्र ठरला होता. त्यामुळे तो देवाच्या कृपेबाबत निश्चिंत होता. आणि असे असूनही त्याला देवाच्या राज्यात जाणे कठीण आहे हा विचारच आश्चर्यचकीत करीत होता. DAMar 129.2

येशूने वापरलेले नव्या जन्माचे रूपक निकदेमाला अगदीच अपरिचित नव्हते. मूर्तिपूजक धर्मातून इस्राएली धर्मात सामील झालेल्या धर्मान्तरीत लोकांची तुलाना अनेकदा नवजात बालकाशी केली जात होती. म्हणून ख्रिस्ताच्या शब्दांचा अर्थ शब्दशः करायचा नाही हे त्याने समजून घेतले असले पाहिजे. तथापि तो जन्मतःच इस्राएली असल्यामुळे त्याला देवराज्यात नक्कीच जागा मिळेल अशी तो बालोबाल खात्री बाळगून होता. म्हणून त्याला त्याच्यात बदल करून घेण्याची गरज नाही असे त्याला वाटले होते. त्यामुळे येशूच्या विधानाचे त्याला आश्चर्य वाटले. ते शब्द त्याच्या संदर्भात वापरले गेले होते म्हणून तो संतप्त झाला होता. एका परुशाचा गर्विष्टपणा, एक सत्य शोधकाच्या सोज्वल मनोकामनेच्या विरूद्ध झगडत होता. इस्राएलामधील अधिकारी या नात्याने त्याच्या पदाचा (दर्जाचा) आदर न करता येशू त्याच्याशी ज्या पद्धतीने बोलला त्याबद्दल त्याला नवल वाटले. DAMar 129.3

स्वतःवरचा ताबा सुटल्यामुळे द्वयर्थी शब्दांचा उपयोग करून तो येशूला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल?” जेव्हा भेदक (निर्भिड) सत्य बुद्धिला पटवून देण्यात येते तेव्हा, इतर अनेकाप्रमाणे त्याने एक गोष्ट दाखवून दिली की दौहिक स्वभावाचा मनुष्य आध्यात्मिक (आत्मिक) गोष्टीचा स्वीकार करीत नाही. आध्यात्मिक गोष्टीना प्रतिसाद देणारे असे त्याच्यात काहीच नसते; कारण आध्यात्मिक गोष्टीची पारख आत्म्याच्याद्वारे होते. DAMar 130.1

परंतु उद्धारकाने वादासाठी वाद केला नाही. तर आदरभावाने व गांभीर्याने आपले हात वर करून खात्रीने म्हटले, “मी तुला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यावाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करिता येत नाही.’ या ठिकाणी येशू पाण्याने बाप्तिस्मा व पवित्र आत्म्याद्वारे अतःकरणाचे नूतनीकरण या संदर्भात बोलत होता हे निकदेम जाणून होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ज्याच्याविषयी अगोदरच वर्तविले होते तो त्याच्याच समक्षतेत होता याची त्याला खात्री पटली होती. DAMar 130.2

बोलणे चालू ठेवून येशू पुढे म्हणाला, “जे देहापासून जन्मले ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे.” स्वभावतः हृदय अमंगल आहे, आणि “अमंगळातून कांही मंगळ निघते काय? अगदी नाही.” इयोब १४:४. कोणतेही संशोधन पापी मानवावर उपाय शोधून काढू शकत नाही. “कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याच्याने तसे होववत नाही.” “अंतःकरणातून दृष्ट कल्पना, खून व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी, ही निघतात” रोम ८:७; मत्तय १५:१९. अंतःकरणातील प्रवाह निर्मळ होण्यासाठी अगोदर अंतःकरणाचे झरे शुद्ध केले पाहिजेत. जो कोणी आज्ञापालन करून स्वतःच्या कर्माने स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न करीत आहे तो असाध्य गोष्ट साध्य करण्याचा यत्न करीत आहे. जो फक्त कायदेशीर कर्तव्यकर्म करतो, म्हणजे धार्मिकतेचे स्वरूप धारण करतो त्याला सुरक्षितता मुळीच नाही. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन हे फेरफार केलेले जीवन किंवा त्याच जुन्या जीवनाची नवी आकृती नव्हे; तर स्वभावाचे परिवर्तन होय. परिवर्तनात स्वत्व व पाप यांना नेस्तनाबूत केलेले असते आणि सर्वस्वी नवजीवनाची सुरवात असते. हा बदल केवळ पवित्र आत्म्याच्या फलदायी कार्यामुळेच घडवून आणला जाऊ शकतो. DAMar 130.3

निकदेम अद्यापही गोंधळलेल्या अवस्थेत होता; म्हणून अर्थबोध समजून सांगण्यासाठी येशूने वाऱ्याच्या उदाहरणाचा उपयोग केला. “वारा पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा नाद तू ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला कळत नाही, जो कोणी आत्म्यापासून जन्मला आहे त्याचे असेच आहे.” DAMar 130.4

वारा पानातून व फूलातून सळसळत सरकत असताना झाडांच्या डहाळ्यामधून त्याचा नाद ऐकू येतो; तथापि तो अदृश्य असतो, आणि तो कोठून येतो आणि तो कोठे जाते याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. पवित्र आत्म्याच्या अंतःकरणावरील कार्याबाबत अगदी तसेच आहे. वाऱ्याच्या हालचालीचे स्पष्टीकरण देता येत नाही तसेच पवित्र आत्म्याच्या कार्याचेही स्पष्टीकरण करता येत नाही. एकाद्या व्यक्तीला त्याच्या परिवर्तनाची नक्की वेळ किंवा स्थळ किंवा परिवर्तनाच्या प्रक्रियेतील घटनाचा तपशिल याविषयी काही सांगता येणे शक्य होणार नाही; म्हणून तो अपरिवर्तनीय आहे असे सिद्ध होत नाही. वाऱ्याप्रमाणे अदृश्य असलेल्या मध्यस्थाद्वारे, येशू अंतःकरणावर सतत कार्य करीत असतो. हळूहळू कदाचित स्वीकारणाऱ्याला कल्पना नसताना, त्याच्यावर परिणाम घडले जातात आणि त्याद्वारे तो ख्रिस्ताकडे ओढला जातो अर्थात हे परिणाम येशूचे चिंतन करण्याद्वारे, पवित्र शास्त्राचे अध्ययन करण्याद्वारे किंवा उपदेशकाचा उपदेश श्रवणाद्वारे होतात. जेव्हा पवित्र आत्मा आकस्मितपणे येतो आणि सरळ विनवणी करतो, तेव्हा व्यक्ती अगदी आनंदाने स्वतःहून ख्रिस्ताला वाहून घेते. अनेक लोक असा परिवर्तनाला आकस्मिक परिवर्तन म्हणतात; परंतु खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याद्वारे सातत्याने केलेल्या पाठलागाचे ते फळ असते. DAMar 130.5

वारा जरी अदृश्य आहे, तरी तो दृश्य आणि मनाला जाण देणाऱ्या गोष्टी घडवून आणतो. अगदी तसेच व्यक्तीच्या अंतःकरणावर पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे होणाऱ्या परिणामाचे आहे. ज्या व्यक्तीने पवित्र आत्म्याचे तारणदायी सामर्थ्य अनुभवलेले आहे ती आपल्या सर्व कृतीत तो प्रत्यय प्रदर्शित करते. जेव्हा पवित्र आत्मा अतःकरणाचा ताबा घेतो तेव्हा तो जीवनात परिवर्तन घडवून आणतो. विकृत (पापी) विचार दूर केला जातो, आघोरी आचाराचा परित्याग केला जातो; प्रेम, नम्रता आणि शांती हे गुण, राग, द्वेष, आणि तंटे यांची जागा घेतात. दुःखाच्या जागी संतोष विराजमान होतो, आणि चेहरा स्वर्गीय तेज परावर्तित करतो. जेव्हा आत्मा (मनुष्य) स्वतःहून देवाला विश्वासाने वाहून घेतो तेव्हा तो आशीर्वादीत होतो. मग मानवी डोळ्यांना जी शक्ती दिसत नाही ती शक्ती देवाच्या स्वरूपाचा नवा मनुष्य निर्माण करते. DAMar 131.1

मर्यादा असलेल्या मानवी मनाला तारणाच्या कार्याचे आकलन होणे अगदी अशक्य आहे. त्या कार्याचे गूढ मानवी ज्ञानकक्षेच्या पलीकडचे आहे; तथापि जो मरणातून जीवनात प्रवेश करतो तो जाणतो की तारणाचे कार्य ही एक दिव्य वास्तविकता (सत्यता) आहे. तारणाची सुरूवात आपण व्यक्तीगत अनुभवाद्वारे येथेच जाणू शकतो, (अनुभवू शकतो). त्याचे परिणाम अनंत काळापर्यंत पोहंचतात. DAMar 131.2

येशू बोलत असतानाच सत्याच्या काही किरणांनी त्या अधिकाऱ्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. सौम्य आणि नम्रता निर्माण करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने त्याच्या मनावर पगडा (छाप) पाडला. तरीसुद्धा त्याला तारकाच्या शब्दांचा अर्थबोध पूर्णपणे समजला नाही. साध्य करून घेण्याच्या पद्धतीपेक्षा पुनर्जन्माच्या आवश्यकतेबाबत तो म्हणाला तितका प्रभावित झाला नव्हता. म्हणून आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “या गोष्टी कशा होतील.’ DAMar 131.3

त्यावर येशूने त्याला उत्तरादाखल प्रश्न केला, “तू इस्राएल लोकांचा गुरू असून या गोष्टी समजत नाहीस काय?” खचीतच, इतर लोकांना धर्मज्ञान देण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविण्यात आली आहे त्यांनी इतक्या महत्वाच्या आणि उपयोगी सत्याविषयी अज्ञानी असूच नये. ख्रिस्ताच्या शब्दानी त्याला एक धडा शिकवला की सत्यवचनाबद्दल राग बाळगण्याऐवजी निकदेमाने त्याच्या आध्यात्मिक अज्ञानामुळे स्वतःबद्दल नम्र मत बनवावयास पाहिजे होते. तरीसुद्धा येशू मनाच्या मोठेपणाने (त्याच्याशी) बोलला आणि त्याची प्रेमळ नजर आणि मृदु आवाज या दोन्हीमुळे त्याचे मनस्वी प्रेम प्रदर्शित केले गेले; त्यामुळे पाणउतारा झालेला आहे याची कल्पना येऊनसुद्धा निकदेम दुःखावला गेला नाही. DAMar 132.1

परंतु जेव्हा येशूने स्पष्ट केले की, या पृथ्वीवर भौतिक नव्हे तर आध्यात्मिक राज्य स्थापन करणे हे त्याचे काम होते; तेव्हा त्याचे श्रोतेजन दुःखी झाले होते. हे त्याच्या लक्षांत आल्यावर येशू म्हणाला, “मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हास सांगितल्यास विश्वास कसा धराल?” अंतःकरणावरील कृपेच्या कार्याविषयीचे स्पष्टीकरण (माहिती) करणारी येशूची शिकवण जर निकदेम स्वीकारू शकत नव्हता, तर तो त्याच्या (ख्रिस्ताच्या) वैभवी राज्याचे स्वरूप कसे लक्षात घेऊ शकला असता? पृथ्वीवरील येशूच्या कार्याचे स्वरूप त्याने नीट लक्षात न घेतल्यामुळे त्याला त्याचे स्वर्गातील कार्य समजू शकले नाही. DAMar 132.2

येशूने ज्या यहूदी लोकांना मंदिरातून हाकलून लावले होते ते लोक स्वतःला आब्राहामाची मुले असल्याचा दावा करीत होते, परंतु ते तारणाऱ्याच्या समक्षतेतून पळून गेले कारण ख्रिस्तांत प्रगट झालेले देवाचे वैभव त्यांच्याने सहन करवले नाही. देवाच्या दयेने अशा प्रकारे त्यांनी एक पुरावाच दिला की ते मंदिराच्या पवित्र सेवेत भाग घेण्यास लायक नव्हते. दिखाऊ पवित्रता जोपासण्यास ते उत्सुक होते, परंतु अंतर्मनाची पवित्रता जोपसण्यास ते निष्काळजीपणा करीत होते. ते नियमशास्त्रातील शब्दांना चिकटून राहणारे होते, पण त्या शब्दामागच्या खऱ्या आशयाचा सातत्याने ते अनादर करीत होते. ज्या प्रकारच्या परिवर्तनाविषयी येशू निकदेमाला स्पष्ट करून सांगत होता ती त्यांची मोठी गरज होती. ती म्हणजे नवीन नैतिक जन्म, पापापासून शुद्धी, मानसिक व आध्यात्मिक नवीकरण होय. DAMar 132.3

पुनर्निर्मितीच्या कार्याबाबत इस्राएल लोकांच्या अंधळेपणासाठी काहीच कारण नव्हते. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने यशयाने लिहून ठेवले होते, “आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झाले आहो; आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत.’ दावीदाने प्रार्थनेत असे म्हटले होते, “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुनः घाल.’ यहेज्केलाद्वारे एक अभिवचन देण्यात आले होते, “मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमानी चालाल.” यशया ६४:६; स्तोत्र. ५१:१०; यहेज्के. ३६:२६, २७. DAMar 132.4

निकदेमाने ही वचने त्याचा अर्थ न समजून घेता वाचून काढली होती. पण आता त्याला त्याच्या अर्थबोधाचे आकलन होऊ लागले. त्याला समजून आले की नियम- शास्त्राचे केवळ शब्दशः कडक आज्ञापालन बाह्य जीवनाला लागू करणारी कोणीही व्यक्ती स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्यास पात्र ठरत नाही. मानवी दृष्टीकोनातून त्याचे जीवन न्यायी व आदरणीय होते; परंतु ख्रिस्तासमोर त्याचे अंतःकरण अशुद्ध आणि त्याचे जीवन अपवित्र असल्याचे त्याला वाटले. DAMar 133.1

निकदेम ख्रिस्ताकडे ओढला जात होता, जेव्हा तारणाऱ्याने त्याला नव्या जन्माबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले, तेव्हा तशा प्रकारचा बदल त्याच्यामध्ये घडावा यासाठी तो उत्सुक झाला होता. तो बदल कोणत्या साधनाने साध्य करता येऊ शकतो? विचारण्यात न आलेल्या प्रश्नाचे ख्रिस्ताने उत्तर दिले. “जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे; यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” DAMar 133.2

या प्रसंगाविषयी निकदेमाला चांगलीच माहिती होती. उंच केलेल्या सर्पाच्या रूपकाने त्याला तारणाऱ्याच्या कामाविषयी स्पष्ट कल्पना दिली. जेव्हा इस्राएल लोक आग्या सापाच्या दंशाने मृत्यूमुखी पडत होते तेव्हा देवाने मोशाला पितळेच्या सापाची प्रतिमा करून लोकांच्या जमावाच्या मध्यभागी उंच ठिकाणी टांगण्यास सांगितले होते. त्यानंतर सर्व छावणीमध्ये दौंडी देण्यात आली होती की जे कोणी सापाच्या प्रतिमेकडे पाहातील ते सर्व वाचतील. लोकांना पूर्णपणे माहीत होते की त्या सापाच्या प्रतिमेत त्यांना मदत करता येईल असे काहीच सामर्थ्य नव्हते. ती सापाची प्रतिमा ख्रिस्ताचे दर्शक होते. लोकांना वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे नाश करणाऱ्या सर्पासारखीच केलेली प्रतिमा उंच करण्यात आली होती, त्याचप्रमाणे ज्याला “पापी देहासारख्या देहाने” (रोम ८:३) पाठविलेला तो त्यांचा तारणारा असणार होता. अनेक इस्राएल लोक मानीत होते की यज्ञयागाच्या सेवेमध्ये त्यांना पापापासून सोडविण्याची शक्ती होती. देवाला त्या लोकांना हे शिकवण्याची इच्छा होती की त्या यज्ञयागाच्या सेवेमध्ये पितळेच्या सापापेक्षा अधिक उपयुक्ततेचे काहीच नव्हते. ते सर्व त्यांची मने तारणाऱ्याकडे वळविण्यासाठी होते. त्यांच्या जखमा बऱ्या होण्यासाठी असो किंवा त्यांच्या पापक्षमेसाठी असो त्यांना स्वतःसाठी काही करण्याची गरज नव्हती, तर केवळ देवाने दिलेल्या देणगीवर त्यांचा विश्वास प्रदर्शित करायचा होता. त्यांनी फक्त पाहायचे आणि जगायचे होते. DAMar 133.3

ज्यांना सापाकडून दंश करण्यात आला होता त्यांनी कदाचित सापाच्या प्रतिमेकडे पाहाण्यास विलंब केला असावा. कदाचित त्यांनी प्रश्न उभा केला असावा की पितळेच्या सापाच्या प्रतिमेमध्ये इतकी गुणकारी शक्ती असू शकते काय? कदाचित त्यांनी शास्त्रीय स्पष्टीकरणाची निक्षून मागणी केली असावी. परंतु कसलेच स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मोशेद्वारे त्यांना दिलेल्या देवाच्या शब्दाचा स्वीकार त्यांनी करायलाच पाहिजे होता. सापाच्या प्रतिमेकडे पाहाण्यास नकार करणे म्हणजे नाश करून घेणे होते. DAMar 134.1

वितंडवाद व ऊहापोह याने ज्ञान संपन्न होत नाही. आपण फक्त पाहावे व जगावे. निकदेमाला हा धडा मिळाला, त्याने तो आत्मसात केला. त्याने नव्या पद्धतीने शास्त्रभ्यास केला. तात्त्विक काथ्याकूट करण्यासाठी नाही तर जीवन प्राप्तीसाठी. जेव्हा त्याने स्वतःला पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली झोकून दिले, वाहून घेतले, तेव्हापासून त्याला देवाच्या राज्याची खात्री पटू लागली. DAMar 134.2

जगांत हजारो लोक असे आहेत की ज्यांना उंच केलेल्या सापाद्वारे जे सत्य निकदेमाला शिकविण्यात आले होते तेच सत्य शिकण्याची गरज आहे. देवाने त्याच्यावर दया करावी म्हणून ते देवाचे आज्ञापालन करण्यावर विसंबून राहातात. जेव्हा त्याना येशूकडे पाहण्यास, आणि तो त्यांचे तारण त्याच्या कृपेने करतो असा विश्वास धरा असे सांगण्यात येते तेव्हा ते उद्गारतात, “या गोष्टी कशा होतील?’ DAMar 134.3

सर्व पाप्यातील आपण मुख्य पापी आहोत असे मानून निकदेमाने ज्या मार्गाने जीवनात प्रवेश केला त्याचप्रमाणे आपण त्याच पद्धतीने जीवनात प्रवेश करण्यास तयार असले पाहिजे. ख्रिस्ताशिवाय “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; जेणेकरून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.’ प्रेषित. ४:१२. विश्वासाद्वारे आपल्याला देवाची कृपा प्राप्त होते. तथापि विश्वास हा कांही आमचा तारणारा नाही. त्याच्यामुळे काहीच साध्य होत नाही. तो (विश्वास) म्हणजे असा एक हात आहे की ज्याने आपण येशूला धरू शकतो, DAMar 134.4

आणि त्याची पात्रता मिळवू शकतो, ही पात्रताच पापावर जालीम उपाय आहे. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आपण पश्चातापसुद्धा करू शकत नाही. ख्रिस्ताबद्दल पवित्र शास्त्र सांगते की “त्याने इस्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हस्ते राजा व तारणारा असे उच्च केले. या गोष्टीविषयी आम्ही त्याचे साक्षी आहो.” प्रेषित. ५:३१. जशी पापक्षमा ख्रिस्ताद्वारे होते तसेच पश्चाताप ख्रिस्ताकडून होतो. DAMar 134.5

तर मग, आपले तारण कसे करण्यात येईल? “जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे.’ यास्तव देवाच्या पुत्राला उंच केले आहे, आणि ज्या कोणाला फसविण्यात आले आहे आणि सर्पाने दंश केला आहे तो फक्त त्याच्याकडे पाहू शकतो आणि वाचू शकतो. “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.” योहान १:२९. वधस्तंभावरून चमकणारा प्रकाश देवाचे प्रेम प्रगट करतो. त्याचे प्रेम आम्हाला त्याच्याकडे ओढत आहे. आपण जर त्याला प्रतिबंध केला नाही तर ज्या पापामुळे तारणाऱ्याला वधस्तंभावरच मरण पत्करावे लागले त्या पापासाठी पश्चातापी अंतःकरणाने आपण वधस्तंभाच्या पायाथ्याशी नेले जाऊ. नंतर पवित्र आत्मा व्यक्तीमध्ये विश्वासाच्याद्वारे नवीन जीवन उत्पन्न करतो. मनचे विचार व आकांक्षा ख्रिस्ताच्या इच्छेनुसार आज्ञाकित बनविले जातात. हृदय व अंतःकरण ही, जो स्वतःसाठी सर्व गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी आमच्यात कार्य करतो त्याच्या प्रतिमेप्रमाणे नवीन केली जातात. नंतर देवाच्या आज्ञा अंतःकरणावर व हृदयावर लिहिल्या जातात. आणि मग आपण ख्रिस्ताबरोबर म्हणू शकतो, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” स्तोत्र. ४०:८. DAMar 134.6

निकदेमाच्या मुलाखतीच्या वेळी येशूने तारणारी योजना आणि या जगातील त्याचे कार्य यांचा उलगडा केला. या आदिच्या कोणत्याही संभाषणामध्ये, त्याने जे स्वर्गीच्या राज्याचे वतनदार होतील त्यांच्या अतःकरणांत कराव्या लागणाऱ्या कार्याचे इतके इथंभूत व पायरी पायरीने विवरण केले नव्हते. त्याच्या सेवाकार्याच्या अगदी सुरूवातीलाच त्याने, धर्ममहासभेच्या प्रख्यात सभासदाला, ग्रहणक्षम मनाला, आणि लोकासाठी नेमलेल्या शिक्षकाला सत्याचा उलगडा केला. परंतु इस्राएल लोकांच्या अधिकाऱ्यांनी प्रकाशाचे स्वागत केले नाही. निकदेमाने सत्य त्याच्या अतःकरणातच बंदिस्त करून ठेवले, आणि तीन वर्षे थोडेही फळ मिळाले (दिसले) नाही. DAMar 135.1

तथापि ज्या मातीत बी पेरले गेले होते, त्या मातीला येशूने चांगलेच ओळखले होते. रात्रीच्या वेळी एकांत डोंगरावर त्या एका श्रोत्याला सुनाविलेले येशूचे शब्द वाया गेले नव्हते. काही काळ निकदेमाने उघडपणे येशूचा स्वीकार केला नाही, तथापि तो त्याच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून होता, आणि त्याच्या शिकवणीवर विचारमंथन करीत होता. येशूला ठार मारण्याच्या याजकांच्या कटकारस्थानाना तो ‘सान्हेंद्रिन’ सभेत सतत विरोध करीत होता आणि शेवटी जेव्हा येशूला वधस्तंभावर चढविण्यात आले तेव्हा, त्याला येशूच्या, “जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे; यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे’ या शिकवणीची आठवण झाली. त्या गुप्त मुलाखतीद्वारे गुलगुथा टेकडीवरील वधस्तंभावर प्रकाश झोत टाकला होता, आणि निकदेमाला येशूत जगाचा तारणारा दिसला होता. DAMar 135.2

प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर छळामुळे शिष्यांची पांगापांग झाली त्यावेळी निकदम मोठ्य धैर्याने सामोरा झाला. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळी बाल्यावस्थेत असलेली लहानशी मंडळी जिचा संपूर्ण नाश होईल अशी यहूदी अपेक्षा करीत होते त्या मंडळीची जोपासना करण्यासाठी निकदेमाने त्याची धनसंपत्ती कामी लावली. संकटमय काळात जो अतिशय सावधगिराने आणि संशयी वृत्तीने वागत होत तोच आता शिष्याच्या निष्ठेला प्रोत्साहन देऊन आणि सुवार्तेचे कार्य सतत पुढे रेटण्यासाठी अर्थिक हातभार लावून पत्थरासारखा कणखर राहिला होता. इतर वेळा ज्यांनी त्याला सन्मानाने व पुज्य भावनेने वागविले होते ते त्याची छळ व कुचेष्टा (तिरस्कार) करू लागले. भौतिक धनसंपत्तीत तो कंगाल झाला तरी तो येशूबरोबर मुलाखत झालेल्या रात्री ज्या विश्वासाची सुरूवात झाली होती त्या विश्वासात डळमळला नाही. DAMar 135.3

त्या मुलाखतीची सर्व गोष्ट निकदेमाने योहानाला निवेदन केली, आणि योहानाच्या लेखनीद्वारे लाखो लोकांच्या माहितीसाठी ती गोष्ट शब्दांकित करण्यात आली. त्या रात्री अंधाराची छाया पसरलेल्या त्या एकांत डोंगरावर जेव्हा एक यहूदी अधिकारी एका विनम्र गालीली गुरूकडून जीवनाच्या मार्गाविषयी शिक्षण घेण्यास गेला होता, त्यावेळेस त्यात नोंदलेली सत्ये जितकी महत्त्वाची व उपयुक्त वाटली तितकीच ती आजही महत्त्वाची आहेत. DAMar 136.1