युगानुयुगांची आशा

85/88

अध्याय ८४—“तुम्हास शांती असो”

लूक २४:३३-४८; योहान २०:१९-२९.

यरुशलेमाला पोहंचल्यावर सणाच्या काळात उघडा ठेवलेल्या पूर्वेकडील दरवाज्यातून ते दोन शिष्य आत गेले. घरे उदास व शांत दिसत होती परंतु प्रवासी अरुंद रस्त्यावरून चंद्र प्रकाशात जा ये करीत होते. मृत्यूच्या अगोदर शेवटची सायंकाळ येशूने जेथे घालविली त्या माडीवरील खोलीत ते जातात. या ठिकाणी त्यांचे बांधव त्यांना मिळतील असे त्यांना वाटले होते. येशूच्या शरीराचे काय झाले हे समजल्याशिवाय कितीही उशीर झाला तरी शिष्य झोपणार नाहीत असे त्यांना वाटले. खोलीचे दार बंद करून घेतले होते. दार ठोठावले पण उत्तर आले नाही. काळजीपूर्वक दार उघडले जात होते, ते आत जातात आणि त्यांच्याबरोबर अदृश्य वक्ती आत जाते. नंतर गुप्त हेरांना बाहेर रोखण्यासाठी पुन्हा दार बंद करून घेतले जाते. DAMar 694.1

आत आश्चर्यकारक खळबळ उडाल्याची प्रवाशांच्या नजरेस आले. आत जमलेल्यांच्या मुखातून उपकार स्तुतीचे शब्द निघाले आणि म्हटले, “प्रभु खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे.’ नंतर दोन प्रवाशांनी खडतर प्रवास करून आल्यावर धापा टाकीत ख्रिस्त त्यांना कसा भेटला ह्याची विस्मयजनक घटना कथन केली. ह्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसेना कारण ती फार चित्तथरारक होती. ती गोष्ट संपत आहे तोच दुसरी एक व्यक्ती त्यांच्यापुढे उभे राहाते. सर्वांचे डोळे त्या व्यक्तीवर खिळतात. कोणीही दार ठोठावले नव्हते. तेथे पायाची चाहूल नव्हती. शिष्य थक्क होऊन गेले आणि हे सर्व काय घडत आहे याचे आश्चर्य करू लागले. नंतर त्यांनी त्यांच्या प्रभूचा आवाज ऐकिला. स्पष्ट आणि समजायला सोपे शब्द त्याच्या मुखातून निघाले, “तुम्हास शांती असो.” DAMar 694.2

“पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहात आहोत असे त्यास वाटले. त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला? तुमच्या मनात तर्कवितर्क का येतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहाता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखविले.” DAMar 694.3

खिळे मारून खराब झालेले त्याचे हातपाय त्यांनी पाहिले. त्याचा आवाज त्यांनी ओळखला. “मग आनंदामुळे त्यांस ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यास म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा व मधाचे पोळे दिले. ते घेऊन त्यांच्या देखत ते खाल्ले.” “त्यानंतर प्रभूला पाहिल्यावर शिष्य आनंदित झाले.” अविश्वासाची जागा विश्वास व हर्ष यांनी घेतली आणि तो पुनरुत्थित उद्धारक आहे असे त्यांनी कबूल केले. DAMar 695.1

येशूच्या जन्माच्या वेळी देवदूताने घोषीत केले होते, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यावर प्रसाद झाला आहे. पुनरुत्थानानंतर शिष्यांना प्रथमच दर्शन देत असताना उद्धारक कृपाप्रसादाचे शब्द उद्गारतो, “तुम्हास शांती असो.” संशय आणि भीती यांनी जखडलेल्या जीवाला शांतीसंदेश देण्यास येशू सतत तयार आहे. अंतःकरण उघडे करून आत निवास करण्यास विनंती करणाऱ्यांची तो वाट पाहातो. तो म्हणतो, “पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोठावीत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील.’ प्रगटी. ३:२०. DAMar 695.2

येशूचे पुनरुत्थान हे त्याच्यामध्ये निद्रित असलेल्यांच्या शेवटच्या पुनरुत्थानाचे दर्शक आहे. उद्धारकाचा चेहरा, त्याची लकब-शिष्टाचार त्याचे बोलणे ही सर्व शिष्यांना परिचित होती. ख्रिस्ताप्रमाणेच त्याच्यामध्ये निद्रा घेत असलेले पुन्हा उठतील. आम्ही आमच्या स्नेह्यांना DAMar 695.3

ओळखू. शिष्यांनीसुद्धा येशूला ओळखले. कदाचित ह्या मर्त्य जीवनांत ते विद्रूप रोगग्रस्त झाले असतील तरी ते आरोग्य संपन्न आणि बांदेसूधपणा उठावदार दिसतील; तथापि त्या वैभवी शरीरात त्यांचे व्यक्तित्व काटेकोरपणे जोपासले जाईल. नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. १ करिंथ. १३:१२. येशूच्या मुद्रेवरून चमकणाऱ्या प्रकाशाने आम्ही तेजस्वी होऊन ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांची ठेवण आम्ही ओळखू. DAMar 695.4

मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिले होते ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. हे मरणाअगोदर काढलेले उद्गार शिष्यांना भेटल्यावर त्याने त्याची आठवण करून दिली. “तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडिले. आणि त्याने त्यास म्हटले, असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांस त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषीत करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहा.” DAMar 695.5

त्यांच्या कामाचे स्वरूप व व्याप्ती ह्याची कल्पना शिष्यांना येऊ लागली. त्यांच्यावर सोपविलेले सत्य जगाच्यासमोर त्यांना घोषीत करायचे होते. त्याच्या जीवनातील घटना, त्याचे मरणे, पुनरुत्थान, ह्या घटना निदर्शीत करणारी भाकीते, देवाच्या नियमशास्त्राचे पावित्र्य, तारणाच्या योजनेचे रहस्य, पापविमोचनाप्रीत्यर्थ येशूचे सामर्थ्य-ह्या सर्वांचे ते साक्षी होते आणि जगापुढे हे त्यांना घोषीत करावयाचे होते. पश्चात्तापदग्ध अंतःकरण व उद्धारकाचे सामर्थ्य ह्याद्वारे त्यांना शांती व उद्धार यांचा शुभसंदेश जाहीर करावयाचा होता. DAMar 695.6

“असे बोलून त्याने त्यांच्यावर कुंकर टाकिला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्म्याच्या स्वीकार करा; ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करीता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेविता ती तशीच ठेविलेली आहेत.’ DAMar 696.1

पवित्र आत्मा अजून पूर्णपणे प्रगट झाला नव्हता कारण अद्याप ख्रिस्ताचे गौरव करण्यात आले नव्हते. ख्रिस्ताचे उत्थान होण्याच्याअगोदर पवित्र आत्म्याचे फार मोठे प्रदर्शन झाले नव्हते. ते संपन्न झाल्याशिवाय जगाला शुभसंदेश देण्याची कामगिरी शिष्य करू शकले नव्हते. मंडळीच्या संदर्भात पार पाडण्याच्या कामगिरीअगोदर ख्रिस्ताने शिष्यावर आपल्या आत्म्याचा फुकर टाकला. अति पवित्र ठेव तो त्यांच्या स्वाधीन करीत होता, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविना हे कार्य फलद्रूप होणार नाही हा विचार तो त्यांच्या मनावर बिंबवीत होता. DAMar 696.2

पवित्र आत्मा आध्यात्मिक जीवनाचा प्राण आहे, श्वास आहे. आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे ख्रिस्त जीवनाचे प्रकटीकरण होय. ज्यांना तो मिळतो तो ख्रिस्ताच्या स्वाभाविक गुणधर्माने भरून जातो. ज्यांना देवाचे शिक्षण मिळाले आहे, ज्यांनी अंतर्यामात कार्य करण्याचा आत्मा स्वीकारला आहे आणि ज्यांच्या जीवनात ख्रिस्त जीवन दृगोचर झाले आहे तेच मंडळीच्या वतीने कार्य करण्यास मानवातील प्रतिनिधी आहेत. DAMar 696.3

ख्रिस्ताने म्हटले, “ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करीता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेविता ती तशीच ठेविलेली आहेत. यामध्ये दुसऱ्याचा न्याय करण्याचे स्वातंत्र्य ख्रिस्त मनुष्याला देत नाही. डोंगरावरील उपदेशात त्याने ते मना केले आहे. हा देवाचा विशेष हक्क आहे. परंतु संघटीत मंडळीतील वैयक्तिक सभासदासाठी ही जबाबदारी राखून ठेविली आहे. पापात पडलेल्यांना इशारा देणे, प्रबोधन करणे आणि शक्य झाल्यास त्यांची पुनर्स्थापना करणे हे मंडळीचे कर्तव्य आहे. प्रभु म्हणतो, “सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.” २ तित. ४:२. चुका करणाऱ्याबरोबर इमानाने वाग. धोक्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इशारा द्या. स्वतःची फसवणूक करून घेण्यास कोणालाही संधि देऊ नका. पाप स्पष्ट करा. लबाडी करणे, शब्बाथ उलंघन, चोरी, मूर्तिपूजा आणि सर्व प्रकारची दुष्टता ह्या बाबतीत देवाने काय म्हटले ते जाहीर करा. “अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.’ गलती. ५:२१. पाप करण्याचा ते हेकाच धरतील तर देवाच्या वचनातून दिलेली शिक्षा स्वर्गात ती जाहीर होईल. पाप करण्याद्वारे ते ख्रिस्ताचा त्याग करितात; त्यांची कृती मंडळीला मान्य नाही हे मंडळीने दर्शविले पाहिजे नाहीतर मंडळी देवाला काळीमा लावते, अप्रतिष्ठा करिते. देवाने पापाविषयी जे सांगितले आहे तेच तिने सांगितले पाहिजे. देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे तिने निर्णय दिला पाहिजे आणि तो निर्णय स्वर्गात मंजूर झाला पाहिजे. जे मंडळीचा अधिकार तुच्छ लेखितात ते ख्रिस्ताचा अधिकार तुच्छ लेखितात. परंतु ह्याची दुसरी जमेची बाजू आहे. “ज्या पापांची तुम्ही क्षमा करीता त्यांची क्षमा झाली आहे.” हा विचार सर्व श्रेष्ठ राहू द्या. चुका करणाऱ्यासाठी काम करीत असताना प्रत्येक नेत्र ख्रिस्ताकडे वळू द्या. प्रभूच्या कुरणातील मेंढरावर मेंढपाळांची कृपादृष्टी असू द्या. उद्धारकाची पापक्षमा करणारी दया चूका करणाऱ्याच्या कानावर पडू द्या. पश्चात्ताप करण्यास व क्षमा करण्यावर विश्वास ठेवण्यास त्यांना उत्तेजन द्या. “जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” असे उद्गार काढण्यास प्रोत्साहन द्या. १ योहान १:९. पश्चात्ताप करणाऱ्यांना ही खात्री दिली आहे: “तो वळून पुन्हा आम्हावर दया करील; आमचे अपराध पायाखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकिशील.” मीखा ७:१९. DAMar 696.4

पाप्याने केलेला पश्चात्ताप मंडळीने कृतज्ञतेने स्वीकारावा. अनुतप्त व्यक्तीला अविश्वासाच्या अंधकारातून विश्वास व धार्मिकतेच्या प्रकाशात घेऊन जावे, मार्ग दाखवावा. त्यांचा कंप पावणारा हस्त ख्रिस्ताच्या प्रेमळ हस्तावर ठेवावा. असले पापविमोचन स्वर्गात मंजूर होते. DAMar 697.1

केवळ ह्या अर्थाने पाप्याला दोषमुक्त करण्याचा मंडळीला अधिकार आहे. पापविमोचन केवळ ख्रिस्ताच्या चांगुलपणामुळे लाभते. अपराधापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य मनुष्यामध्ये कोणालाही दिलेले नाही. ख्रिस्ताच्या नामामध्ये पापविमोचन लाभते हा शुभ संदेश सर्व राष्ट्रांना देण्यास शिष्यांना त्याने सांगितले होते. “कारण जेणे करून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.” प्रेषित. ४:१२. DAMar 697.2

माडीवरच्या खोलीत येशू पहिल्यांदाच शिष्यांना भेटला तेव्हा थोमा तेथे नव्हता. दुसऱ्याकडून त्याने पुष्कळ ऐकिले आणि येशू उठल्याचे पुष्कळ पुरावे मिळविले; परंतु त्याचे अंतःकरण अविश्वास आणि खिन्नता यांनी भरून गेले होते. उद्धारक उठल्याच्या समर्थनार्थ शिष्यांनी चकित करणाऱ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तो अधिकच निराशेत गुरफटला. मरणातून येशू जर उठलेला आहे तर ह्या पृथ्वीवर राज्य स्थापण्याची काही आशा उरली नाही आणि त्याला सोडून त्याच्या गुरुजीने सर्वांना दर्शन दिल्याचे पाहून त्याच्या मनाला फार लागले. त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचा नाही असा त्याने निर्धार केला. ह्या वीट आणणाऱ्या गोष्टीवर सबंध सप्ताहभर तो विचार करीत राहिला आणि त्यांच्या बांधवांचा विश्वास व आशा यांच्या तुलनेत तो तीव्र औदासिन्यात लोटला गेला. DAMar 697.3

ह्या अवधीत तो वारंवार म्हणत होता, “त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.” त्याच्या बांधवांचे ऐकावयास किंवा त्यांनी दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. प्रभूवर त्याचे मनापासून प्रेम होते परंतु त्याच्या अंतःकरणात व मनात अविश्वास व मत्सर यांनी ठाण मांडले होते. DAMar 698.1

माडीवरील खोली शिष्यांचे तात्पुरते निवासस्थान झाले होते आणि सायंकाळच्या वेळी थोमा सोडून सर्व शिष्य तेथे जमा होत असत. एके दिवशी सायंकाळी थोमाने त्यांना भेटण्याचा विचार केला. त्याच्याठायी अविश्वास असूनसुद्धा ही गोष्ट खरी असल्याची त्याला अंधुक आशा होती. संध्याकाळचे भोजन घेत असतांना भाकितामध्ये ख्रिस्ताने दिलेल्या पुराव्याविषयी शिष्य बोलत होते. “तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला; दार बंद होते व त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो.” DAMar 698.2

थोमाकडे वळून त्याने म्हटले, “तू आपले बोट इकडे करून माझे हात पाहा, आणि आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास धरणारा ऐस.’ थोमाच्या मनात चाललेले विचार त्याला अवगत होते हे ह्या उद्गारावरून दिसले. सबंध सप्ताहभर कोणत्याही शिष्याने येशूला पाहिले नव्हते हे विश्वासहीन शिष्याला माहीत होते. त्याच्या अविश्वासाविषयी येशूला ते सांगू शकत नव्हते. त्याच्यासमोर असलेला तो प्रभु आहे हे त्याने ओळखले. अधिक पुराव्याची त्याला गरज वाटली नव्हती. त्याचे अंतःकरण आनंदाने उसळी घेऊ लागले आणि येशूच्या चरणावर तो पडला व म्हटले, “माझा प्रभु व माझा देव!” DAMar 698.3

येशूने त्याची कबूली मान्य केली परंतु सौम्य भाषेत त्याच्या अविश्वासाबद्दल त्याला दोष दिला. “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेविला आहे; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.” त्याच्या बांधवांच्या साक्षीवरून विश्वास ठेवण्यास तो राजी झाला असता तर थोमाचा विश्वास ख्रिस्ताला मोठा कृपाप्रसाद झाला असता. आज थोमाचे उदाहरण जगाने घेतले तर तारणावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्यांच्या साक्षीवरून ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास तयार व्हावे. DAMar 698.4

अनेक अविश्वासू निमित्त पुढे करून म्हणतात थोमाप्रमाणे त्यांच्या सोबत्यांकडून पुरावे मिळाले तर आम्ही विश्वास ठेवू. तेवढाच नाही पण त्यापेक्षा अधिक पुरावा उपलब्ध आहे ह्याची त्यांना जाणीव नाही. थोमाप्रमाणे अविश्वासाच्या सर्व कारणांचे निराकरण होण्याची वाट पाहू लागल्यास अनेकजनाच्या इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत. हळूहळू त्यांचा अविश्वास दृढ होऊन जातो. अंधारी बाजूवर मन केंद्रित करून कुरकूर करीत राहाणाऱ्यांना ते काय करितात हे त्यांना समजत नाही. ते अविश्वासाचे बी पेरतात आणि शेवटी अविश्वासाच्या सुगीची कापणी करतात. श्रद्धा व दृढ विश्वासाची जेव्हा अत्यावश्यकता वाटते तेव्हा अनेकजन आशा व विश्वास ठेवण्यास असमर्थ असलेले दिसतील. DAMar 698.5

येशूने थोमाला ज्या प्रकारे हाताळले त्यामध्ये त्याच्या अनुयायांना महत्त्वाचा धडा शिकविला. ज्यांचा विश्वास दुबळा आहे आणि संशय प्रमुख आहे अशांशी आम्ही कसे वर्तावे हे त्याच्या उदाहरणावरून दर्शविले आहे. येशूने थोमाची खरडपट्टी केली नाही किंवा त्याच्याशी वादविवाद केला नाही. परंतु त्याला प्रत्यक्ष तो प्रगट झाला. त्याच्या विश्वास ठेवण्याच्या अटी अवाजवी होत्या परंतु येशूने आपल्या उदार प्रेमाने व परिशीलनाने सर्व प्रतिबंध त्याने खोडून टाकिले. अविश्वास संघर्षावर मात करू शकत नाही, कदाचित तो आत्मसंरक्षण करील आणि नवीन निमित्त व पाठिंबा शोधील. परंतु वधस्तंभी खिळिलेला म्हणून येशूला प्रेमस्वरूप व दयावंत असा प्रगट करा आणि एकेकाळी नाखूष असलेल्या अनेक मुखातून थोमाप्रमाणे “माझा प्रभु व माझा देव” असे उद्गार निघतील. DAMar 699.1