युगानुयुगांची आशा
अध्याय ५६—येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो मत्तय
१९:१३-१५; मार्क १०:१३-१६; लूक १८:१५-१७.
येशूचे मुलांवर सतत प्रेम होते. त्याने त्यांची पोरकट सहानुभूती आणि नैसर्गिक प्रेम यांचा स्वीकार केला. त्यांच्या निर्मळ मुखातून निघणारी कृतज्ञतापूर्वक देवस्तुती त्याला कर्णमधुर संगीत होते आणि ढोंगी व धूर्त माणसांनी जेव्हा त्याची गांजणूक केली तेव्हा त्याचा आत्मा त्याद्वारे ताजातवाना झाला. जेथे जेथे उद्धारक गेला तेथे तेथे त्याच्या मुद्रेवरील दयाळूपणा व कोमल आणि गोड स्वभाव यामुळे त्याने मुलांचा दृढविश्वास आणि लोभ जिंकला. DAMar 447.1
लहान मुलांना, त्यांच्यावर हात ठेऊन आशीर्वाद देण्यासाठी एकाद्या धर्मगुरूकडे आणण्याची प्रथा यहूदी लोकामध्ये होती; परंतु ख्रिस्ताचे काम अति महत्त्वाचे आहे आणि त्यात अडथळा होऊ नये असे शिष्यांना वाटत होते. मातांनी आपल्या मुलांना त्याच्याकडे आणिले तेव्हा शिष्य नाखूष होते. येशूची भेट घेऊन काही फायदा करून घेण्यासाठी ही मुले फार लहान आहेत आणि त्यांना पाहून त्याला बरे वाटणार नाही असे त्यांना वाटले. परंतु तो शिष्याबद्दल नाखूष होता. देवाच्या वचनाप्रमाणे माता आपल्या बालकांना शिक्षण देण्याची खबरदारी आणि काळजी घेत होते हे उद्धारकाला समजले होते. त्यांच्या प्रार्थना त्याने ऐकिल्या होत्या. त्याने त्यांना त्याच्या सहवासात आकर्षिले होते. DAMar 447.2
येशूच्या शोधासाठी एक माता आपल्या मुलाला घेऊन गेली. जाताना शेजारणीला कारण सांगितले आणि त्या शेजारणीला आपल्या मुलांना येशूने आशीर्वाद द्यावा असे वाटत होते. अशा प्रकारे कित्येक माता मुलांना घेऊन एकत्र जमल्या. त्यातील काही मुले लहानाची मोठी झाली होती. काहीनी बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश केला होता. मातांनी केलेली विनंती येशूने सहानुभूतीपूर्वक ऐकिली. परंतु शिष्य त्यांना कसे वागवतात हे पाहाण्यासाठी तो थांबला. त्याच्या फायद्यासाठी म्हणून मातांना शिष्य मागे हटवताना पाहिल्यावर येशूने त्यांना त्यांची चुकी दाखविली, आणि म्हटले, “बाळकांस मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे.’ त्याने मुलांना वर घेतले त्यांच्यावर हात ठेवला आणि ज्यासाठी ते आले होते तो आशीर्वाद त्यांना दिला. DAMar 447.3
मातांना बरे वाटले. ख्रिस्ताच्या शब्दांनी त्यांना हिंमत आली आणि कृपाप्रसाद मिळाला. त्यांच्यावर पडलेली बालकांविषयीची जबाबदारी आनंदाने पार पाडण्यास त्यांना नवीन प्रेरणा लाभली. आजच्या मातांना तेच त्याचे उद्गार त्याच श्रद्धेने लाभले पाहिजे. त्या काळात मनुष्यामध्ये वावरणारा येशू जसा होता तो आज खरोखर तसाच आहे. यहूदामध्ये मुले एकत्र जमले होते त्या वेळेस येशू जसा होता तसेच तो आजही मातांना सहाय्य करणारा आहे. प्राचीन काळातील बाळकांना ख्रिस्ताच्या रक्ताने जसे विकत घेतले होते तसेच आजची बालकेही त्याच रक्ताने विकत घेतली आहेत. DAMar 448.1
प्रत्येक मातेच्या अंतःकरणावर पडलेला भार येशू जाणतो. दारिद्र् व अन्नवस्त्राच्या उणीवतेची छळ लागलेली ज्याला माता होती तो हाल अपेष्टा कंठणाऱ्या प्रत्येक मातेला सहानुभूती दाखवितो. कनान देशातील महिलेचे ओझे हलके करण्यासाठी ज्याने दूरचा प्रवाश केला तो सांप्रत मातांना तसाच मदतीचा हात देईल. नाईन गावाच्या विधवेला ज्याने तिचा एकुलता एक मुलगा परत दिला आणि वधस्तंभावरील दुःख सहन करीत असताना ज्याने स्वतःच्या मातेचे स्मरण केले तो आजच्या मातांचे दुःख पाहून हळहळतो. प्रत्येक दुःखीताचे तो दुःखपरिहार करील आणि प्रत्येक गरज भागविण्यास तो मदतीचा हात पुढे करील. DAMar 448.2
मनात उद्भवलेला गोंधळ घेऊन मातांनी येशूकडे यावे. मुलांना कुशल रीतीने हाताळण्यासाठी त्यांना कृपा उपलब्ध होईल. उद्धारकाच्या चरणी आपले ओझे ठेवणाऱ्या प्रत्येक मातेसाठी दरवाजे खुले आहेत. ज्याने म्हटले, “बाळकांस मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका.’ तो आजही प्रत्येक मातेला तिच्या बालकांना आशीर्वादित करण्यासाठी आमंत्रण देतो. प्रार्थनाशील मातेच्या विश्वासाद्वारे तिच्या हातातील बाळसुद्धा परात्पराच्या छायेत वस्ती करिते. बाप्तिस्मा करणारा योहान जन्मापासून आत्म्याने भरलेला होता. देवाशी आम्ही जर सलगीने चिंतन करीत राहू तर आमच्या बालकांना त्यांचा स्वभाव घडविण्यासाठी बालपणापासूनच दिव्य आत्म्याचे सहाय्य लाभेल. DAMar 448.3
त्याच्या संबंधात आलेल्या बालकांमध्ये येशने त्याच्या कृपेचे वारस आणि त्याच्या राज्याची प्रजा आणि काहीजन त्याच्यासाठी हतात्मे होणारे स्त्री पुरुष पाहिले. मोठ्या माणसांच्यापेक्षा ही लहान बालके त्याचे ऐकतील व त्यांचा उद्धारक म्हणून आढेवेढे न घेता खुषीने स्वीकार करतील हे त्याला कळत होते कारण मोठ्यांपैकी काहीजन पाषाणहृदयी आणि जगातील सुखोपभोग घेतलेले होते. त्यांच्या पातळीवर येऊन त्याने त्यांना शिकविले. स्वर्गातील वैभवशाली सम्राटाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि त्यांच्या पोरकट आकलनशक्तीला रुचेल असे पाठ सुलभ भाषेत समजावून सांगण्यास तिटकारा केला नाही. त्यांच्या कोवळ्या मनात त्याने सत्याचे बी पेरले, आणि काही वर्षांनी त्यांची वाढ होऊन त्यांना फळे येतील व ती चिरकाल टिकतील. DAMar 448.4
आजसुद्धा लहान मुले सुवार्तेच्या शिक्षणासाठी ग्रहणक्षम आहेत; त्यांच्या खुल्या अंतःकरणावर दिव्य पगडा पडतो आणि स्वीकारलेले धडे मनात ठेवण्यास ते सक्षम असतात. त्यांच्या वयोमानाप्रमाणे अनुभव आल्याने ही मुले ख्रिस्ती असू शकतील. आध्यात्मिक बाबीत त्यांना शिक्षण देण्याची जरूरी आहे आणि ख्रिस्तासारखा त्यांचा शीलस्वभाव बनण्यास मातापित्यांनी प्रयत्न करून त्यांना हरएक लाभ करून दिला पाहिजे. DAMar 449.1
प्रभूच्या कुटुंबातील लहान मुले धाकटे सभासद आहेत आणि स्वर्गासाठी त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी मातापित्यावर टाकली आहे. ख्रिस्तापासून आम्ही स्वतः शिकलेले धडे आमच्या मुलांना आम्ही दिले पाहिजेत. स्वर्गाच्या तत्त्वांचे सौंदर्य हळूहळू त्यांच्यापुढे उघड केल्याने ते त्यांचा स्वीकार करतील. अशा रीतीने ख्रिस्ती गृह विद्यालय बनते आणि मातापिता दुय्यम अध्यापकाचे काम करतात आणि ख्रिस्त स्वतः मुख्य अध्यापक असतो. DAMar 449.2
आपल्या मुलांचे जीवन परिवर्तन होण्यासाठी पापाची खात्री करून देण्यास भावना तीव्र उद्दीपित होतील अशा आवश्यक पुराव्याची आपण अपेक्षा करू नये किंवा त्यांच्यात कोणत्या निश्चित वेळी परिवर्तन झाले आहे हे समजून घेण्याची आवश्यकता नाही. पापक्षमेसाठी त्यांची पापे ख्रिस्तापुढे सादर करण्यास आणि ह्या भूतलावर असताना मुलांचा जसा त्याने स्वीकार केला तसा तो पापक्षमा करून स्वीकार करितो असा विश्वास धरण्यास आम्ही त्यांना शिकविले पाहिजे. DAMar 449.3
तिच्यावरील प्रेमामुळे मुले मातेवर प्रेम करतात, ख्रिस्ती जीवनातील हा पहिला धडा ती त्यांना शिकविते. मातेचे प्रेम हे ख्रिस्तावरील प्रेमाचे दर्शक आहे असे मुलाला वाटते आणि लहान मुले मातेवर श्रद्धा ठेवून जसे आज्ञापालन करितात तसे ते ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून आज्ञापालन करण्यास शिकतात. DAMar 449.4
मुलांच्यासाठी येशू उत्कृष्ट नमुना होता. तसेच तो पित्याचे उदाहरण होता. तो अधिकार वाणीने बोलला आणि त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होते; तथापि हिंसक आणि उद्धट लोकांशी बोलतांना त्याने उर्मट आणि असभ्य भाषा वापरली नव्हती. अंतःकरणातील ख्रिस्ताची कृपा ईश्वरी प्रतिष्ठा आणि औचित्याची जाणीव करून देईल. ते कठोर असलेले मृदू करील आणि ओबडधोबड व निर्दय असलेले नरम पाडील. त्यांच्या मुलांना बुद्धिमान माणसाप्रमाणे वागविण्यास मातापित्यांना मार्गदशन करील. DAMar 449.5
निसर्गामध्ये देवाने दिलेले वस्तुपाठ मातापित्यांनी अभ्यासावे आणि मुलांना ते शिकवावे. तुम्हाला गुलाब किंवा भुईकमळाविषयी शिकवायचे आहे तर ते कसे कराल? रोपट्याची प्रत्येक फांदी आणि पाने यांची सरेख व प्रमाणबद्ध वाढ होण्यासाठी काय केले पाहिजे याच्यासाठी कुशल माळ्याला विचारा. उद्दामपणाच्या व दांडगाईच्या वागणुकीने हे घडत नाही असे तो सांगेल; कारण त्याद्वारे नाजूक कोंब मोडून जातील. वारंवार थोडे थोडे लक्ष दिल्याने ते शक्य होते. तो भूमि ओलसर करितो आणि वाढणाऱ्या रोपट्याला झंझावती वाऱ्यापासून आणि कडक उन्हापासून संरक्षण देतो आणि देव त्यांची वाढ करून सौंदर्याने फुलवितो. मुलाशी वागतांना माळ्याची पद्धत अंमलात आणा. हळूवार कोमल स्पर्श करून आणि प्रेमळ मदतीचा हात देऊन ख्रिस्ताच्या शीलस्वभावाच्या नमुन्याप्रमाणे त्यांचा स्वभाव बनविण्याचा प्रयत्न करा. DAMar 449.6
देवावर व बंधुवर्गावर प्रीती करण्यास प्रोत्साहन द्या. निर्दय व कठोर हृदयाचे पुष्कळ स्त्रीपुरुष आज जगात आहेत त्याला कारण म्हणजे खरे प्रेम दुर्बलता आहे असे समजण्यात येते आणि म्हणून त्याला मोडता घालण्यात आणि दडपून टाकण्यात येते. अशा माणसांचा स्वभाव बालवयात दाबून टाकण्यात आला होता; आणि दिव्य प्रीतीच्या प्रकाश झोताने त्यांचा स्वार्थीपणा द्रवणार नाही तर त्यांचे आनंदी जीवन कायमचे नष्ट पावेल. येशूचा नाजूक मायाळू स्वभाव आणि देवदूतांनी व्यक्त केलेली सहानुभूती आपल्या मुलांनी संपादन करावी अशी तुम्ही अपेक्षा करीत असाल तर बालपणच्या उदार, प्रेमळ उत्तेजक शक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. DAMar 450.1
निसर्गामध्ये ख्रिस्ताचे दर्शन घेण्यास मुलांना चांगले धडे शिकवा. त्यांना वृक्षांच्या राईत, उद्यानांत आणि उघड्या मैदानात घेऊन जा; आणि सृष्टीतील अद्भुतजन्य कृतीतील त्याचे प्रेम प्रगटीकरण न्याहाळून पाहा. सर्व सजीव वस्तूंचे नियमन करण्यासाठी त्याने नियम घालून दिले आहेत, आमच्या सुखसमाधानासाठी त्याने नियम घालून दिले आहेत असे त्यांना शिकवा. लांबलचक प्रार्थना व कंटाळवाणा उपदेश यांनी त्यांना सतावून किंवा दमवून टाकू नका परंतु निसर्ग सृष्टीतील वस्तुपाठांनी देवाचे नियम पाळण्यास शिकवा. DAMar 450.2
ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने तुम्ही त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्याच्या महान प्रीतीविषयी शिकविण्यास सोपे जाईल. तारणाच्या सत्याचा खुलासा करिताना व वैयक्तिक उद्धारक म्हणून ख्रिस्ताकडे त्यांना मार्गदर्शन करीत असताना दिव्यदूत तुमच्याबरोबर असतील. बेथलहेम येथे जन्मलेल्या बाळाची सुंदर कथा ऐकण्यास मुलामध्ये गोडी निर्माण करण्यास आईबापांना प्रभु कृपा देईल. खरोखर तो जगाची मोठी आशा आहे. DAMar 450.3
जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की, त्याच्याकडे बालकास येण्यास मनाई करू नका तेव्हा तो सर्व युगांतील त्याच्या अनुयायांना सांगत होता - मंडळीतील पुढारी, उपदेशक, पास्टर्स, मदतगार आणि अखील ख्रिस्ती लोक यांना तो सांगत होता. येशू मुलांना आपल्याकडे आकर्षण करून घेतो, त्यांना येण्यास मनाई करू नका असे तो आम्हाला सांगतो; तुम्ही जर त्यांना अडखळण केले नाही तर ते येतील असे जणू काय तो आम्हास सांगतो. DAMar 450.4
तुमच्या अनुचित वागणुकीने ख्रिस्त शीलस्वभावाचा विपर्यास होऊ देऊ नका. तुमच्या थंडपणामुळे आणि निष्ठुरतेने लहान बालकांना त्याच्यापासून दूर ठेऊ नका. तुम्ही जर त्यांच्याबरोबर स्वर्गात राहिला तर ते सुखावह ठिकाण नाही असे वाटण्यास काही जागा देऊ नका. मुलांना धर्माविषयी समज होणार नाही असे बोलू नका किंवा बालपणात त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची अपेक्षा नाही असे काही करू नका. ख्रिस्ताचा धर्म उदासिनतेचा, खिन्नतेचा आहे आणि उद्धारकाचा स्वीकार करिताना सुखी व आनंदी जीवन करणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे असा चकीचा फसवा छाप त्यांच्यावर पाडू नका. DAMar 451.1
पवित्र आत्मा मुलांच्या अंतःकरणावर जसा कार्य करितो तसे तुम्ही त्याला सहकार्य करा. उद्धारक त्यांना पाचारण करीत आहे आणि तरतरीत जोमाच्या वयात ते त्यांना वाहून देतात हे पाहून त्याला अत्यानंद होतो. DAMar 451.2
स्वतःच्या रक्ताने ज्यांना त्याने विकत घेतले आहे त्यांच्याकडे उद्धारक अनंत मायाळूपणाने पाहातो. त्याच्या प्रीतीचे ते वारस आहेत. तो त्यांच्याकडे अवाच्य तीव्र इच्छेने पाहातो. सद्गुणी मुलाकडेच नाही तर आनुवंशिकतेने लाभलेल्या अनिष्ट स्वभाव गुणाच्या मुलांच्याकडेसुद्धा त्याचे अंतःकरण ओढले जाते. त्यांच्या मुलांच्या स्वभावातील ह्या अवगुणाबद्दल ते किती जबाबदार आहेत हे अनेक मातापित्यांना समजत नाही. त्यांनी घडविलेल्या ह्या चुका करणाऱ्या मुलांना वागवून घेण्याचा शहाणपणा आणि मायाळूपणा त्यांच्यापाशी नाही परंतु येशू त्यांच्याकडे करुणेने पाहातो. तो कार्यकारणभाव पाहातो. DAMar 451.3
ही मुले ख्रिस्ताकडे आकर्षित करून घेण्यासाठी ख्रिस्ती कामदार ख्रिस्ताचा हस्तक असू शकेल. शहाणपणाने व चातुर्याने तो त्यांना आपलेसे करून घेईल व त्यांना तो आशा व प्रोत्साहन देईल आणि ख्रिस्त कृपेने त्यांच्या स्वभावाचे परिवर्तन होईल आणि त्यांच्याविषयी उद्गार काढण्यात येईल की, “स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे.” DAMar 451.4