युगानुयुगांची आशा

50/88

अध्याय ४९—मंडपाच्या सणाच्या वेळी

योहान ७:१-१५, ३७-३९.

धार्मिक कार्याच्या निमित्ताने यहूदी लोकांना वर्षातून तीन वेळा यरुशलेमात एकत्र जमणे जरूरीचे होते. मेघस्तंभाने आच्छादिलेल्या इस्राएल लोकांच्या अदृश्य पुढाऱ्याने या मेळाव्याबाबतचे मार्गदर्शन केले होते. यहूदी लोकांच्या गुलामगिरीच्या काळात ते लोक मेळावे (सण) साजरे करू शकले नव्हते; परंतु जेव्हा ते मायदेशी परतले तेव्हा सण पाळण्यास पुन्हा सुरुवात झाली. या वार्षिकोत्सवानी लोकांना त्याचे स्मरण करून द्यावे असा त्यामागचा देवाचा उद्देश होता. परंतु काही लोक वगळता, याजक व राष्ट्रीय अधिकारी हा हेतू विसरून गेले होते. ज्याने हे राष्ट्रीय मेळावे नेमले होते आणि ज्याला त्या मेळाव्याचा उद्देश माहीत होता किंवा ज्याने त्यामागचा हेतू जाणून घेतला होता त्याने त्या लोकांचा कुटिलपणा प्रत्यक्ष पाहिला होता. DAMar 390.1

मंडपाचा सण हा वर्षाच्या समारोपाचा सण होता. देवाचा हेतू असा होता की यावेळी लोकांनी त्याचा चांगुलपणा व दया यांचे चिंतन करावे. सर्व राष्ट्र त्याच्या मार्गदर्शनाखाली चालत होते, त्याचा आशीर्वाद त्याला मिळत होता. दिवस व रात्र तो त्यांचे रक्षण करीत होता. सूर्य प्रकाश व पावसाच्या सरी भूमिला फलद्रूप करीत होते. पॅलेस्टाईनची खोरी व पठारे यातून पिकांची कापणी होत होती. ऑलिव्ह फळे तोडली जात होती, सुंदर किमती तेल बुधल्यात साठविले जात होते. ताडाच्या वृक्षावरून विपूल उत्पन्न काढले जात होते. जांभळ्या रंगाच्या द्राक्षाचे घड द्राक्ष कुंडात तुडविण्यात आले. DAMar 390.2

हा सण सात दिवस साजरा करण्यात येत होता, आणि तो साजरा करण्यासाठी पॅलेस्टाईनमधील आणि इतर राष्ट्रातील लोक आपापली घरेदारे सोडून यरुशलेमाला येत असत. हर्षाची प्रतिके हातात घेऊन दूर दूर वरून लोक येत असत. वृद्ध व तरुण, श्रीमंत व गरीब असे सर्व, ज्याने त्या वर्षी त्याच्या चांगुलपणाने बरकत दिली होती त्याला उपकारस्तुतीचे अर्पण देण्यासाठी काही ना काही देणग्या आणीत असत. नजरेला सुखावणारे आणि सर्वांच्या आनंदाला वाट मोकळी करून देणारे असे सर्व काही अरण्यातून आणलेले असे, त्यामुळे सर्व शहर जसे काय एक मनोरम अरण्यच भासत असे. DAMar 390.3

हा सण म्हणजे केवळ हंगामाच्या उपकारस्तुतीचा सण नसे, तर देवाने इस्राएल लोकांचे अरण्यात काळजीपूर्वक संरक्षण केलेल्या कृतीचे स्मारक असे. तंबूत राहण्याच्या त्यांच्या जीवनाची आठवण म्हणून इस्राएल लोक या सणाच्या काळात हिरव्यागार झावळ्यांनी सजविलेल्या राहुट्यांत वस्ती करत असत. या राहुट्या रस्त्यावर, मंदिराच्या प्रांगणात किंवा घराच्या धाब्यावर उभारल्या जात असत. यरुशलेमाच्या सभोवारच्या टेकड्या व खोरी अशा प्रकारे हिरव्यागार झावळ्याने सजविलेल्या राहुट्यांनी व्यापून जात असत; आणि तो सर्व परिसर लोकांनी गजबजल्यामुळे सजीव वाटत असे. DAMar 391.1

भक्तिपर गाणी गाऊन व उपकारस्तुतीची अर्पणे देऊन, उपासक तो प्रसंग साजरा करीत असत. ह्या मेळ्याच्या थोडेसे अगोदर प्रायश्चिताचा दिवस येत असे. लोकांनी त्यांच्या पापाची कबुली केल्यानंतर त्यांनी देवाबरोबर शांती प्रस्थापित केल्याचे जाहीर होत असे. अशा प्रकारे सणाचा आनंद उपभोगण्याचा मार्ग तयार केला जात असे. “परमेश्वराला स्तवा, परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.” स्तोत्र. १०६:१. असा विजयानंदाचा जयजयकार होत असे, त्याच वेळी होसान्नाच्या आरोळ्या मिसळलेली वाद्य संगीते गाण्याला साथ देत असत. मंदिर सर्वांच्या आनंदाचे केंद्रस्थान असे. याच ठिकाणी यज्ञार्पणाचा थाटमाट चालू असे. मंदिराच्या दोन्ही बाजूस शुभ्र धवल रंगाच्या संगमरवरी दगडाच्या पायऱ्या दिसत, तेथे लेवी लोकांची गायक मंडळी, समूह गीतामध्ये मार्गदर्शन करीत असे. असंख्य उपासक, ताडाच्या व एका सुंदर सुंगधी वृक्षाच्या झावळ्या फडकावून धृपदाचा सूर धरीत असत, आणि ते धृपद म्हणण्यात जवळपासचे व दूरचे लोक सामील झाल्यामुळे सर्व टेकड्या आणि खोरी स्तुतीच्या प्रतिध्वनीने दुमदुमून जात असत. DAMar 391.2

रात्रीच्या वेळी, मंदिर आणि मंदिराची प्रांगणे कृत्रिम प्रकाश झोताने झळाळून निघत असत. कर्णमधुर संगीत, झावळ्यांचे झुलणे, होसान्नाच्या हर्ष भरीत आरोळ्या, झुंबराच्या दिव्याच्या प्रकाशाच्या झोतात न्हावून निघणारा लोकसमुदाय, याजकाचा थाटमाट आणि विधिची ढब, या सर्वामुळे दिमाखाने नटलेला देखावा पाहाणाऱ्यावर विस्मयकारक छाप पडत असे. तथापि या सणाचा अतिशय हृदयगम देखावा, जो आनंदाला उधान आणीत असे तो म्हणजे अरण्यातील तात्पुरत्या मुक्कामाच्या घटनेचा स्मरणोत्सव. DAMar 391.3

अगदी पहिल्या दिवसाच्या पहाटे, याजक त्यांच्या रूपेरी कर्यांचा प्रदीर्घ कर्कश ध्वनी काढत असत आणि त्यानंतर त्याला प्रतिसाद देणाऱ्या तुताऱ्यांचा ध्वनी आणि लोकांनी त्याच्या राहुट्यातून केलेल्या आरोळ्या सर्व पहाड व दऱ्या यातून पडसाद देऊन त्या महोत्सवी दिवसाचे स्वागत करीत असत. त्यानंतर याजक केद्रोनच्या वाहत्या पाण्यात सरई भरून घेऊन आणि वर करून काचा आवाज होत असताना तो संगिताच्या तालावर, अगदी संथपणे, प्रमाणबद्ध पावले टाकीत आणि मधून मधून “हे यरुशलेमा, तुझ्या दारात आमचे पाय उभे आहेत” स्तोत्र. १२२:२ असे गुणगुणत मंदिराच्या रुंद पायऱ्या चढून वर गेला. DAMar 391.4

त्याने ती सुरई याजकांच्या अंगणाच्या मध्यभागी असलेल्या वेदीकडे नेली. तेथे दोन चांदीची गंगाळे होती, त्या प्रत्येकाच्या बाजूला एक एक याजक उभा होता. सुरईतील पाणी एका गंगाळात ओतले आणि दुसऱ्या सुरईतील द्राक्षारस दुसऱ्यात ओतला; या दोन्ही गंगाळातील द्रव केद्रोनशी संबंध असलेल्या एका नलिकेत गेले आणि तेथून ते मृत समुद्रात नेण्यात आले. समर्पित पाण्याचे प्रदर्शन इस्राएल लोकांची तहान भागविण्यासाठी देवाच्या आज्ञेबरहुकूम खडकातून उफाळून वर आलेल्या लोंढ्याचे दर्शक होते. त्यानंतर “पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरितो, भीत नाही; कारण प्रभु परमेश्वर माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे” यशया १२:२, ३ अशी जयघोष करणारी गीते गाईली गेली. DAMar 392.1

जेव्हा योसेफाच्या मुलांनी मंडपाच्या सणाला जाण्याची तयारी केली, तेव्हा त्यांना दिसून आले की ख्रिस्त सणाला हजर राहाण्याची काहीच हालचाल करीत नव्हता. अगदी अस्वस्थ होऊन ते त्याच्यावर लक्ष ठेवीत होते. बेथेसदा तळ्यावर आजार बरे केल्यापासून तो कोणत्याच राष्ट्रीय मेळाव्याला हजर राहिला नव्हता. यरुशलेमातील पुढाऱ्याबरोबर निरर्थक झगडा टाळण्यासाठी त्याने त्याचे कार्य गालीलापुरतेच मर्यादित ठेवले होते. मोठ्या धार्मिक मेळाव्याना हजर राहण्याची त्याची संभाव्य हेळसांड आणि याजक व धर्मगुरू यांनी त्याच्याविरुद्ध प्रदर्शित केलेले शत्रूत्व ही त्याच्याबद्दल लोकांना आणि त्याचे शिष्य व नातेवाईकांनासुद्धा गोंधळात टाकणारी कारणे झाली होती. त्याच्या शिकवणीने त्याने देवाच्या आज्ञापालनाद्वारे लागणाऱ्या आशीर्वादावर भर दिला होता, आणि असे असूनसुद्धा तो स्वतः देवाने प्रस्थापित केलेल्या विधिबाबत उदासीन होता असे भासत होते. जकातदार व दुर्वर्तनी लोकांत मिसळणे, धर्मगुरूच्या परंपराचा अवमान करणे, आणि शब्बाथाबाबतच्या पारंपारिक बंधनाना दूर ठेवण्याचे स्वातंत्र्य देणे या सर्व गोष्टीमुळे तो धर्मपुढाऱ्यांच्या विरोधी असल्याचे भासल्यामुळे अधिक शंका उत्पन्न झाल्या. येशूने देशातील थोर व विद्वान लोकांचा स्नेह तोडणे ही त्याची चूक होती असे त्याच्या भावांना वाटत होते. त्यांना वाटत होते की त्या लोकांचे बरोबर होते, आणि येशू स्वतःला त्यांच्या विरोधात जाऊन चूक करीत होता. तथापि त्याचे निष्कलंक जीवन त्यांनी पाहिले होते आणि जरी ते स्वतःला शिष्यांच्या दर्जाचे मानीत नव्हते, तरी ते त्याच्या कार्याद्वारे अतिशय प्रभावित झाले होते. गालीलातील त्याचा लौकिक त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण करणारा होता. अद्यापही ते विश्वास बाळगून होते की तो त्याच्या सामर्थ्याविषयीचा पुरावा देईल. तोच पुरावा परूशी लोकांना, तो स्वतःला जे मानीत होता तेच तो होता हे समजण्यास मार्गदर्शन करील. होय, खरेच तो मशीहा, इस्राएलाचा राजा असला तर! असा अभिमानी विचार त्यांच्या अंतःकरणात ते बाळगत होते. DAMar 392.2

या बाबतीत ते इतके उत्सुक होते की, ते त्याला यरुशलेमाला जाण्यासाठी फारच आग्रह करीत होते. ते त्याला म्हणाले “तू येथून निघून यहूदीयात जा, म्हणजे जी कामे तू करितोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावी. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करीत नाही; तू ही कामें करितोस तर स्वतः जगाला प्रगट हो.” “तर’ या उभयान्वयाने शंका व अविश्वास व्यतीत केला. भित्रेपणा व मूर्खपणा त्यांनी त्याच्या माथी मारला. ते म्हणाले, तो मशीहा होता हे त्याला माहिती होते, तर मग हा आश्चर्यकारक अलिप्तपणा व निष्क्रियता का? जर तो खरेच सामर्थ्याचा साठा होता तर त्याने यरुशलेमाला निर्धोकपणे जाऊन त्याचा अधिकार का जाहीर करू नये? त्याने गालीलात जी अद्भुत कृत्ये केली होती ती त्याने यरुशलेमात का करू नयेत? पुढे आणखी ते त्याला म्हणाले, निर्जन प्रदेशात जाऊन स्वतःला लोकांच्या दृष्टीआड राहू नको. केवळ अशिक्षित व साध्या (शेतकरी) आणि कोळी लोकांच्या फायद्यासाठी अद्भुत चमत्कार करू नको. मुख्य व मोठ्या राजधानीसारख्या शहरात स्वतःला सादर कर, याजक व मुख्याधिकारी यांचे पाठबळ मिळव, आणि नव्या राज्याच्या निर्मितीसाठी सर्व राष्ट्रांची एकजूट कर. DAMar 393.1

अनेक वेळा दिखाऊपणासाठी महत्वाकांक्षी असलेल्या लोकांच्या अंतःकरणात जो स्वार्थी हेतू आढळतो त्याच हेतूने येशूचे भाऊ मतप्रदर्शन करीत होते. ही वृत्ती अधिकार गाजवण्याची जगाची वृत्ती होती. ते दुःखी झाले होते याचे कारण, भौतिक राज्य मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ख्रिस्ताने स्वतःला जीवनी भाकर असे जाहीर केले होते. येशूच्या अनेक शिष्यांनी त्याला सोडून दिले तेव्हा ते अतिशय निराश झाले होते. त्याच्या कार्याने काय प्रगट केले हे मान्य केल्यावर येणारे दुःख टाळण्यासाठी ते स्वतः त्याच्यापासून माघारी फिरले होते. तो देवाने पाठविलेला होता. DAMar 393.2

“त्यावरून येशू त्यास म्हणाला, माझा समय अजून आला नाही, तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा असे होत नाही; ते माझा द्वेष करते, कारण त्यांची कामे वाईट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देतो. तुम्ही सणास वर जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी आताच या सणास जात नाही. असे त्यास सांगून तो गालीलात राहिला.” त्याने कसे चालावे याविषयी, मोठ्या अधिकार वाणीने त्याच्या भावांनी त्याला सांगितले होते. परंतु त्याने त्यांना, स्वनाकार करणाऱ्या त्याच्या शिष्यांचा दर्जा न देता, जगाचा देऊन त्यांचे शब्द त्यांना परत केले; आणि म्हणाला, “जगाने तुमचा द्वेष करावा असे होत नाही; ते माझा द्वेष करते, कारण त्यांची कामे वाईट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देतो.” वृत्तीने जे जगासारखे असतात त्यांचा द्वेष जग करीत नाही; त्याना ते त्यांचे स्वतःचेच म्हणून त्यांच्यावर प्रेम करते. DAMar 393.3

हे जग ख्रिस्तासाठी सौख्य व स्वतःची बढती साधण्याचे ठिकाण नव्हते. तो या जगाची सत्ता व मोठेपणा बळकावण्याच्या संधीची वाट पाहत नव्हता. या जगाने त्याला कोणतेही इनाम देऊ केलेले नव्हते. जग हे असे ठिकाण होते की ज्या ठिकाणी त्याच्या पित्यानेच त्याला पाठविले होते. या जगाला जीवन देण्यासाठी, तारणाची योजना राबविण्यासाठी त्याला पाठविण्यात आले होते. पतित मानव जातीसाठी तो त्याचे कार्य पूर्ण करीत होता. तथापि त्याला अति धाडस दाखवायचे नव्हते, त्याने झपाट्याने धोक्यात पडावयाचे नव्हते, त्वरेने संकट ओढवून घ्यावयाचे नव्हते. त्याच्या कार्यामध्ये प्रत्येक घटनेचा ठरलेला समय होता. त्यासाठी त्याने धीराने प्रतीक्षा करावयाची होती. जग त्याचा द्वेष करणार होते हे त्याला माहीत होते; त्याच्या कार्याचे प्रतिफळ म्हणजे त्याला मरावे लागणार होते हे तो जाणून होता. तथापि त्याने स्वतःहून अकाली धोक्यात पडावे अशी त्याच्या पित्याची इच्छा नव्हती. DAMar 394.1

यरुशलेमातून येशूच्या चमत्काराची माहिती जेथे कोठे यहूदी लोक पांगले होते तेथे पसरली होती; आणि अनेक दिवस तो सणापासून गैरहजर होता. तरी त्याच्याविषयीची आस्था कमी झाली नव्हती. त्याला पाहण्याच्या आशेने जगाच्या सर्व भागातूतन अनेक लोक मंडपाच्या सणाला आले होते. सणाच्या सुरुवातीलाच अनेकांनी त्याच्याविषयी बरीच चौकशी केली होती. त्याच्यावर आरोप ठेवण्याच्या संधीच्या आशेने शास्त्री व परूशी त्याची प्रतीक्षा करीत होते. मोठ्या उत्सुकतेने ते विचारू लागले होते की “तो कोठे आहे?” परंतु कोणालाही त्याचा थांगपता नव्हता. सर्वांच्या मनांत सर्वस्वी त्याचाच विचार घोळत होता. परंतु याजकाच्या व अधिकाऱ्यांच्या भयामुळे, मशीहा म्हणून त्याचा स्वीकार करण्याचे कोणीही धैर्य केले नव्हते. देवाने पाठविलेला असे अनेकानी त्याच्याविषयी समर्थन केले होते, त्याच वेळी इतरांनी लोकांचा फसव्या म्हणून त्याच्यावर दोषारोप केला होता. DAMar 394.2

दरम्यानच्या काळात येशू अगदी गुप्तपणे यरुशलेमात आला होता. सर्व दिशाकडून यरुशलेमाला जाणाऱ्या प्रवाशांना टाळण्यासाठी येशूने त्याच्या प्रवासासाठी बिनवहिवाटीचा मार्ग निवडला होता. यरुशलेमाला जाणाऱ्या कोणत्याही एका प्रवासी टोळीत जर तो सामील झाला असता, तर शहरात त्याचा प्रवेश होताच जनतेचे लक्ष त्याच्याकडे आकर्षिले गेले असते, आणि त्याच्यावरील लोभामुळे लोकप्रदर्शनाने अधिकाऱ्यांच्या भावना त्याच्याविरुद्ध भडकल्या असत्या. ते टाळण्यासाठीच त्याने एकट्यानेच प्रवास करण्याचे पसंत केले होते. DAMar 394.3

सणाच्या मध्येच आणि जेव्हा त्याच्याविषयी लोकांच्या मनातील उत्कंठा शिगेला पोहंचली होती अगदी त्याच वेळी प्रचंड लोकसमुदाच्या देखत येशूने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. सणातील त्याच्या गैरहजरीमुळे त्याला आग्रहाची विनंती करण्यात आली होती की त्याने स्वतः याजक व अधिकारी यांच्या सत्तेला आव्हान देऊ नये. त्याच्या हजरीमुळे लोक आश्चर्यचकित झाले होते. सर्वजन अगदी निःशब्द झाले होते. DAMar 394.4

त्याच्या प्राणासाठी तहानलेल्या सामर्थ्यावान शत्रूच्यापुढे मोठेपणा व धैर्य धारण करणाऱ्या त्याच्या प्रवृत्तीबद्दल लोक आश्चर्यचकित झाले होते. DAMar 395.1

त्या प्रचंड लोकजमावाचे आकर्षण असलेल्या केंद्रस्थानी उभे राहून, यापूर्वी कधीही आणि कोणीही दिला नव्हता असा संदेश येशूने दिला. त्याच्या या संदेशाने, त्याला नियमशास्त्राचे आणि इस्राएलाच्या विधिंचे, यज्ञार्पणाचे आणि संदेष्ट्याच्या शिकवणीचे ज्ञान याजक व धर्मगुरू यांच्यापेक्षा किती तरी अधिक होते हे दाखवून दिले. त्याने औपचारिकता आणि रूढी-परंपरा यांच्या आडभीती तोडून टाकल्या. भविष्यकाळातील जीवनाचे देखावे त्याच्यासमोर उभे होते. ज्याने अदृश्य गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या त्याच्याप्रमाणे तो भौतिक आणि स्वर्गीय, मानवी आणि दैवी गोष्टींविषयी निर्विवाद अधिकाराने बोलला. त्याचे शब्द अगदी सुस्पष्ट व अंतःकरणाला पटणारे होते. “त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.’ लूक ४:३२. म्हणून कपर्णहूमातले लोक जसे थक्क झाले होते तसेच येथील लोकही त्याच्या शिकवणीमुळे आश्चर्यचकित झाले होते. जे आशीर्वाद देण्यासाठी तो आला त्यांचा ज्यानी नाकार केला त्यांच्यावर येणाऱ्या आपत्तीविषयी अनेक प्रकारे वर्णन करून त्याने त्याच्या श्रोत्यांना इशारा दिला. तो देवाकडून आला होता याविषयीचा अगदी ठोस पुरावा त्याने त्यांना दिला होता आणि त्यांना पश्चात्तापास प्रवृत करण्यास प्रयत्नाची पराकाष्टा केली होती. जर त्यांना अशा कृत्याच्या अपराधापासून त्याने वाचविले असते तर त्याच्या राष्ट्राकडून त्याचा अव्हेर केला गेला नसता, आणि त्याचा वध करण्यात आला नसता. DAMar 395.2

नियमशास्त्र व भाकिते याविषयीचे त्याचे ज्ञान पाहन सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि ते एकमेकात कुजबुजू लागले की, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली.” धर्मगुरूंच्या पाठशाळामध्ये शिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही धर्म शिक्षक म्हणून शिक्षण देण्यास पात्र समजण्यात येत नव्हते. येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान या दोघानाही अशिक्षित समजण्यात येत होते कारण त्यांना ते प्रशिक्षण मिळाले नव्हते. ज्यांनी त्यांचे संदेश ऐकले होते ते त्यांना “शिकल्यावाचून’ मिळालेल्या ज्ञानावरून थक्क झाले होते. खचीत त्यांना ते ज्ञान ती विद्या मनुष्याकडून मिळाली नव्हती; तर स्वर्गातील देव त्यांचा गुरू होता आणि त्याच्याकडूनच त्यांना ते उच्च प्रतीचे ज्ञान प्राप्त झाले होते. DAMar 395.3

मंदिराच्या अंगणात येशूने जेव्हा संदेश दिला तेव्हा लोक मंत्रमुग्ध झाले. जे लोक त्वेशाने त्याच्याविरुद्ध भडकून उठले होते तेच लोक त्याला दुःखापत करण्यास शक्तीहीन झाले. नंतर तेवढ्यापुरते सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले सर्व गोष्टी बाजूला ठेवण्यात आल्या. DAMar 395.4

सणाच्या अगदी शेवटल्या मोठ्या दिवसापर्यंत तो दररोज लोकांना शिकवीत राहीला होता. प्रदीर्घ आनंदोत्सवानंतर त्या दिवशी सकाळीच लोक थकून गेले होते. एकाएकी मंदिराचे संपूर्ण अंगण दणाणून जाईल असा मोठा आवाज येशूने काढलाः DAMar 395.5

“कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे. जो मजवर विश्वास ठेवितो त्याच्यातून, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जीवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” त्या वेळच्या लोकांच्या परिस्थितीमुळे येशूचे आव्हान प्रभावी ठरले. सर्व लोक सतत चालला होता त्या आनंदाच्या व मिरवणुकीच्या उत्सवात गुंतले होते. प्रकाश व रंगीबेरंगी सजावटीने त्यांचे डोळे दिपून गेले होते, कान कर्णमधुर संगीताने तृप्त झाले होते. परंतु त्यामध्ये आत्म्याच्या गरजा पुऱ्या करणारे काहीच नव्हते, त्यांची तृष्णा तृप्त करणारे काहीच नव्हते. म्हणूनच येशूने त्यांना जीवनाच्या झऱ्यातून पिण्याचे आमंत्रण दिले. ते पाणी त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाणाचा झरा होईल. DAMar 396.1

त्या दिवशी सकाळी याजकाने असा एक विधि उरकला की तो अरण्यात खडकावर प्रहार केलेल्या कृतीचा स्मरणोस्तव होता. तो खडक त्याचे दर्शक होता आणि त्याच्या मरणाद्वारे सर्व तृषितांच्याकडे तारणाच्या जीवंत नद्या वाहणार होत्या. ख्रिस्ताची वचने जीवनी पाणी होते. ते जीवनी पाणी जगाला मिळावे म्हणून त्या एकत्र जमलेल्या लोकसमुदायाच्या समक्षेतत त्याच्यावर प्रहार करता येण्यासाठी त्याने स्वतःला वेगळे ठेवून घेतले होते. ख्रिस्तावर प्रहार करण्याद्वारे सैतानाने जीवनाच्या अधिपतीला ठार मारण्याचा विचार केला होता. परंतु प्रहार केलेल्या खडकातूनच जीवंत पाणी वाहिले. जेव्हा ख्रिस्ताने असे उद्गार काढले, तेव्हा लोकांची अंतःकरणे भयंकर आश्चर्यचकित झाली होती आणि ते शोमरोनी स्त्रीबरोबर, “महाराज, मला तहान लागू नये म्हणून ते पाणी मला द्यावे’ योहान ४:१५. असे म्हणण्यास तयार होते. DAMar 396.2

येशूला लोकांच्या गरजाची जाणीव होती. डामडौल, धन्नाड्यता आणि मानसन्मान ही अंतःकरणाला संपूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. “कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे.’ धनवान, दरीद्री, उच्च, नीच अशा सर्वांना आमंत्रण देण्यात आले आहे. तो दुःखीतांना दुःख परिहार करण्याचे, शोकग्रस्ताना सांत्वन करण्याचे आणि निराश झालेल्यांना धैर्य देण्याचे आश्वासन देतो. ख्रिस्ताचे वचन ऐकलेल्या लोकांपैकी अनेकजन निराशजनक विश्वासासंबंधी शोक करीत होते, काहीजन अंतःस्थ दुःख बाळगीत होते त्यांची अस्वस्थ इच्छा भौतिक गोष्टी व लोक सन्मान याद्वारे आणि इतर तृप्त करण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु हे सर्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना असे आढळून आले होते की त्यांना तहान भागविणे शक्य होणार नाही अशा फुटक्या जलकुंभापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी श्रम केले होते. आनंदी प्रसंगाच्या कल्लोळामध्ये ते असमाधानी आणि दुःखी असे उभे असतानाच अचानक “कोणी तान्हेला असला तर,’ अशा शब्दात मोठ्याने केलेल्या विनंतीने त्यांना त्यांच्या दुःखी मनस्थितीतून खडबडून जागे केले, आणि जेव्हा त्यानंतरचे शब्द त्यांच्या कानी पडले तेव्हा त्यांची अंतःकरणे नव्या आशेने प्रज्वलित झाली. DAMar 396.3

तान्हेल्या आत्म्याला ख्रिस्ताने केली होती तशी विनंती आजही केली जात आहे आणि सणाच्या शेवटच्या दिवशी मंदिरात ज्या लोकांनी ती जितक्या मोठ्या आवाजात ऐकली होती त्यापेक्षा मोठ्या आवाजात ती आम्हाला ऐकविली जाते. तो झरा सर्वासाठी खुला आहे. थकलेल्या आणि गलितगात्र झालेल्या लोकांना तरतरीत करणारा, अविनाशी जीवनाचा घोट देऊ केलेला आहे. येशू आजही मोठ्याने म्हणत आहे, “कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे.” “तान्हेला येवो; आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो.” “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याजमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल. प्रगटी. २२:१७; योहान ४:१४. DAMar 397.1