युगानुयुगांची आशा

49/88

अध्याय ४८—मोठा कोण?

मत्तय १७:२२-२७; १८:१-२०; मार्क ९:३०-५०; लूक ९:४६-४८.

कपर्णहूमाला परतल्यानंतर, ज्या ठिकाणी त्याने शिक्षण दिले होते त्याच परिचित ठिकाणी तो विश्रांतीसाठी गेला नाही, तर तात्पुरते त्याच्यासाठी विश्रामस्थान असणार होते, त्या ठिकाणी तो त्याच्या शिष्यांना घेऊन गेला. त्याच्या उरलेल्या वास्तव्याच्या काळात लोकसेवा करण्याऐवजी शिष्यांना मार्गदर्शन करण्याचा त्याचा उद्देश होता. DAMar 378.1

गालीलातील एकंदर प्रवासात येशूने त्याच्यावर ओढवणाऱ्या प्रसंगाविषयी शिष्यांची मने तयार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याने त्यांना सांगितले की त्याला मारले जाण्यासाठी आणि मरणातून पुनः उठण्यासाठी यरुशलेमाला जावे लागत होते. त्याने आणखी एका विचित्र व गंभीर बातमीची भर घातली की विश्वासघाताने त्याला शत्रूच्या हाती सोपविले जावयाचे होते. इतके सांगितल्यानंतरसुद्धा शिष्यांना येशूच्या बोलण्याचा अर्थ समजू शकला नव्हता. जरी त्याच्यावर दु:खाची गडद छाया पसरली होती, तरी त्यांची अंतःकरणे स्पर्धात्मक प्रवृतीने व्यापून गेली होती. देवाच्या राज्यात वाद येशूपासून गुप्त ठेवण्याचा त्यांनी विचार केला, आणि नित्याप्रमाणे ते त्याला खेटून न चालता मागे मागे रेंगाळत राहिले, यासाठी की कपर्णहूमात प्रवेश करताना तो त्यांच्यापुढे राहील. येशूने त्यांचे विचार जाणून घेतले, तो त्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्यास उत्सुक होता. परंतु सल्लामसलतीसाठी त्यांची अंतःकरणे तयार होईपर्यंत तो उगा राहिला. DAMar 378.2

ते नगरात पोहंचतात न पोहंचतात तोच मंदिराची पट्टी वसूल करणारा अधिकारी पेत्राकडे आला आणि पेत्राला विचारले, “तुमचा गुरू पट्टीचा रुपया देत नाही काय?’ हा पट्टीचा रुपया म्हणजे नगर सारा (कर) नव्हता, तर प्रत्येक यहूद्याला प्रत्येक वर्षी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी द्यावी लागणारी धर्मदाय वर्गणी होती. ही पट्टी देण्याचा नाकार करणे हे मंदिराची बेअदबी समजले जात होते, धर्मगुरुंच्या मताप्रमाणे ते मोठे पापच (मोठा गुन्हा) होते. धर्मगुरूंच्या निमयमाविरुद्ध असलेला तारणाऱ्याचा रोख, आणि परंपराचे संरक्षण करणाऱ्यावर त्याने सरळ ठेवलेला ठपका, यामुळे मंदिराचे सेवाकार्य तो झुगारून देण्याचा प्रयत्न करीत होता असा त्याच्यावर आरोप ठेवण्यास त्यांना निमित्त सापडले होते. त्याच्या शत्रूना त्याचे नांव बदनाम करण्यासाठी एक नामी संधि मिळाली असे वाटले. पट्टी वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याच्या रूपात त्यांना एक दोस्तच भेटला होता. DAMar 378.3

पट्टी वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रश्नामागे मंदिराविषयीच्या ख्रिस्ताच्या निष्ठेला आव्हान देणारी खोच होती ते पेत्राला समजून आले. गुरूबद्दल त्याच्या मनात असलेल्या आत्यंतिक आदरामुळे येशूबरोबर विचार विनिमय न करताच तो पटकन म्हणाला की, येशू पट्टी भरून टाकील. DAMar 379.1

तथापि प्रश्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रश्नाचा मतितार्थ पेत्राला अंशतःच समजला होता. असे काही वर्ग होते की त्या वर्गाना पट्टीची फेड करण्यापासून वगळण्यात आले होते. मोशेच्या काळात, जेव्हा लेवी लोकांना पवित्रस्थानाची सेवा करण्यासाठी वेगळे ठेवण्यात आले होते, तेव्हा त्यांना वेगळे वतन देण्यात आले नव्हते. प्रभूने सांगितले होते, “ह्यामुळेच लेव्यास त्यांच्या भाऊबंदाबरोबर काही वाटा किंवा वतन नाही;” अनुवाद १०:९. ख्रिस्ताच्या काळापर्यंत लेवी आणि याजक यांना मंदिराच्या सेवाकार्यासाठी वाहिलेले गणण्यात येत होते, आणि मंदिराच्या कार्यासाठी वार्षिक कर, पट्टी भरणे त्यांच्यासाठी बंधनकारक नव्हते. संदेष्ट्याकडूनही ही पट्टी घेण्यात येत नव्हती. येशूकडून ही पट्टी घेण्याद्वारे धर्मगुरू, येशूला संदेष्ट्यांना किंवा गुरूंना असलेल्या अधिकारापासून बाजूला ठेवीत होते, आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीसारखे वागवून कर देण्याचे नाकारणे म्हणजे तो मंदिराशी बेईमानी करीत होता असे त्यांना दाखवावयाचे होते, आणि त्याचवेळी, पट्टी देणे हे त्याला संदेष्टा म्हणून नाकारण्याची त्यांची कृती बरोबर होती असे मानावयाचे होते. DAMar 379.2

थोड्याच वेळापूर्वी पेत्राने येशूला देवाचा पुत्र म्हणून मान्य केले होते; परंतु त्यावेळी तो त्याच्या गुरूचे गुण जाहीर करण्याची संधि गमावून बसला होता. येशू पट्टी भरेल असे पट्टी वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला दिलेल्या त्याच्या उत्तराद्वारे, याजक व अधिकारी ज्या चुकीच्या कल्पनांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याना तो मंजूरी देत होता. DAMar 379.3

जेव्हा पेत्र घरात आला, तेव्हा येशूने घडलेल्या प्रकाराचा काहीच उल्लेख केला नाही. तथापि “शिमोन, तुला कसे वाटते? पृथ्वीवरील राजे कोणापासून जकात किंवा पट्टी घेतात? आपल्या पुत्रापासून अथवा परक्यापासून?” असा येशूने त्याला प्रश्न विचारला. त्यावर पेत्राने उत्तर दिले की “परक्यापासून.” मग येशू त्याला म्हणाला, “तर पुत्र मोकळे आहेत.” जेव्हा राज्यातील प्रजेवर, तिच्या राजाचा राज्यकारभार चालविण्यासाठी कर बसविण्यात येतो, तेव्हा राजाची मूले त्यापासून मोकळी असतात, त्याचप्रमाणे देवाचे लोक मानलेल्या इस्राएल लोकांना त्याच्या सेवाकार्याचा कारभार चालवावयाचा होता; परंतु देवाचा पुत्र, येशू अशा कोणत्याच निबंधाखाली नव्हता. जर याजक व लेवी, त्यांच्या मंदिराशी असलेल्या संबंधामुळे करापासून मोकळे होते, तर ज्याला मंदिर म्हणजे त्याच्या पित्याचे घर होते तो किती तरी अधिक मोकळा असला पाहिजे. DAMar 379.4

जर विरोध न करता येशूने ही पट्टी भरली असती तर वास्तविकरित्या त्याला अधिकाराचा रास्तपणा मान्य करावा लागला असता, आणि अशा प्रकारे त्याने त्याचे देवत्व नाकारले असते. परंतु जेव्हा मागणी मान्य करणे त्याला रास्त वाटले तेव्हा ज्यावर ती आधारभूत होती ती त्याने नाकारली. कर भरण्याची व्यवस्था करून त्याने त्याच्या दैवी गुणधर्माचा पुरावा दिला. तो देवामध्ये एकरूप होता हे प्रदर्शित केले गेले आणि म्हणून राज्यातील प्रजेचा एक घटक म्हणून त्याला कर भरणे बंधनकारक नव्हते. DAMar 380.1

तो पेत्राला म्हणाला, “तू जाऊन समुद्रात गळ टाक; आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड; म्हणजे तुला दोन रुपयाचे नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यास दे.” DAMar 380.2

जरी त्याने त्याचे देवत्व मानवी स्वरूपात आच्छादिले होते, तरी या चमत्काराद्वारे त्याने त्याचे गौरव प्रगट केले. “वनातील सर्व पशु, हजारों डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत; आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे.” स्तोत्र. ५०:१०१२. असे दावीदाद्वारे ज्याने जाहीर केले होते तो जाहीर करणारा तोच होता हे स्पष्ट झाले. DAMar 380.3

येशूने तो पट्टी भरण्याच्या बंधनात बिलकूल नव्हता असे जेव्हा स्पष्ट केले. तेव्हा तो त्याबाबतीत यहूदी लोकांबरोबर कोणत्याच वादात पडला नव्हता; कारण त्याच्या शब्दांचा विपर्यास केला गेला असता व त्याचे शब्द त्याच्यावरच उलटविले असते. कर न देण्यामुळे कदाचित तो असंतोषाचे मूळ ठरला असता, म्हणून जे करणे त्याच्यासाठी अगदी बंधनकारक नव्हते ते त्याने केले. हा धडा त्याच्या शिष्यासाठी अतिशय मोलाचा होणार होता. लवकरच मंदिराच्या सेवेविषयीच्या त्यांच्या संबंधाबाबत लक्षणीय बदल व्हावयाचे होते. म्हणून प्रस्थापित परंपरांच्या विरोधात शिष्यांनी विनाकारण स्वतःला गोवून घेऊ नये असे ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले. जितके शक्य होईल तितके करून त्यांनी त्यांच्या धर्ममताचा विपर्यास होण्याइतपत संधि देण्याचे टाळावयाचे होते. ख्रिस्ती लोकांनी एकाही सत्य तत्त्वाचा त्याग करावयाचा नसला तरी, जेव्हा शक्य होईल तेव्हा झगडा किंवा वितंडवाद टाळलाच पाहिजे. DAMar 380.4

जेव्हा ख्रिस्त व शिष्य घरात होते, आणि जेव्हा पेत्र समुद्रावर गेला होता, तेव्हा येशूने इतराना त्याच्याकडे बोलावून घेतले, आणि विचारले, “तुम्ही वाटेत काय संवाद करीत होता?” ख्रिस्ताची समक्षता आणि त्याने विचारलेले प्रश्न यांनी ते वाटेत ज्या विषयावर वाद करीत होते त्यावर त्यांना वाटत होते त्यापेक्षा वेगळाच प्रकाश टाकला. लाज व आत्मदोष यांनी त्यांची तोंडे बंद केली. येशूने त्यांना सांगितले होते की तो त्यांच्यासाठी मरणार होता आणि त्यांची स्वार्थी महत्वाकांक्षा त्याच्या निःस्वार्थी प्रीतीपुढे वेदनादायक विरोधी भूमिका होती. DAMar 380.5

त्याला मारले जाणार होते व तो पुन्हा उठणार होता, असे जेव्हा येशूने त्यांना सांगितले तेव्हा तो त्यांना त्यांच्या विश्वासाच्या कसोटीच्या संवादात गुतविण्याचा प्रयत्न करीत होता. तो त्यांना ज्या विषयीची माहिती देण्याची अपेक्षा करीत होता त्याचा स्वीकार करण्यास ते तयार असते तर, भयंकर मनोवेदना व निराशा यापासून त्यांची सुटका झाली असती. दुःखाच्या व निराशेच्या काळात त्याच्या शब्दाने त्यांना सांत्वन मिळवून दिले असते. पुढे त्याच्यावर कोणता प्रसंग ओढवणार होता याविषयी जरी त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. तरी तो लवकरच यरुशलेमाला जाणार होता या त्याच्या उल्लेखामुळे जे राज्य संस्थापिले जाणार होते त्याविषयी त्यांच्या आशा प्रज्वलित झाल्या. यामुळेच उच्च अधिकारपदावर कोणी बसावयाचे या प्रश्नाला वाचा फुटली होती. पेत्र सरोवराहून परत येताच त्यांनी त्याला तारणाऱ्याच्या प्रश्नाविषयी सांगितले आणि शेवटी एकाने येशूला, “स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण?’ असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. DAMar 381.1

त्यावर येशूने शिष्यांना जमा केले आणि म्हटले, “आपण पहिले व्हावे असे कोणाच्या मनात असल्यास त्याने सर्वांत शेवटले व सर्वांचा सेवक असे व्हावे.’ या शब्दांत जी मनोवेधकता व जे गांभिर्य होते ते शिष्यांच्या आकलनापलिकडचे होते. ख्रिस्ताला जे दिसत होते ते शिष्य पाहू शकत नव्हते. त्यांना ख्रिस्ताच्या राज्याचे स्वरूप समजले नव्हते आणि ते अज्ञानच त्यांच्यातील वितंडवादाचे भांडणाचे उघड कारण होते. परंतु खरे कारण फारच गहन होते. स्वर्ग राज्याच्या स्वरूपाचे स्पष्टिकरण करून ख्रिस्त त्यांच्यातील झगडा तात्पुरत्या काळासाठी मोडून काढू शकला असता; परंतु हा पर्याय मूळ प्रश्नाला हात घालू शकला नसता. त्यांना संपूर्ण ज्ञान मिळाल्यानंतरसुद्धा श्रेष्ठत्वाच्या कोणत्याही प्रश्राने पुन्हा झगडा उत्पन्न झाला असता. ज्या व्यक्तीने आकाशातील जगांत महान लढायाच्या सुरुवातीस कार्य केले होते, तीच व्यक्ती श्रेष्ठ कोण ह्या वादात गुंतली होती आणि परिणामी ख्रिस्ताला मरण पत्करण्यासाठी स्वर्गातून खाली यावे लागले. लुशिफर, जो “प्रभात पुत्र,” वैभवाने देवाच्या आसनाभोवती असलेल्या घनिष्ट बंधनाने एक होता तो लुशिफर म्हणाला होता, “मी परात्परासमान होईन” (यशया १४:१२, १४); आणि स्वतःला मोठेपणा मिळवण्याच्या हव्यासापोटी स्वर्गराज्यात झगडा सुरू करण्यात आला होता आणि परिणामी असंख्य देवदूतांना स्वर्गाच्या बाहेर टाकण्यात आले होते. लुशिफराला खरेच परात्परासारखे होण्याची इच्छा होती, तर त्याला देण्यात आले होते ते स्वर्गातील स्थान त्याने सोडायला नको होते; कारण परात्पर परमेश्वराची प्रवृत्ती त्याच्या निस्वार्थी सेवेद्वारे प्रगट करण्यात येते. लुशिफराने परमेश्वराचा अधिकार अपेक्षिला पण त्याचा शिलस्वभाव मिळवण्याची अपेक्षा केली नाही. त्याने स्वतःसाठी अत्युच्च पद मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासारख्या प्रवृत्तीने भारलेली प्रत्येक व्यक्ती अगदी तेच करील. अशा त-हेने, दुजाभाव, बेबनाव, आणि भांडणतंटे या गोष्टी अनिवार्य होतील. “बळी तो कान पिळी,” असेच होईल. सैतानी राज्य हे अतिरेकी राज्य आहे; प्रत्येक व्यक्तीला वाटते की दुसरी प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रगति पथावरील अडखळण आहे किंवा स्वतःला उच्च पदावर चढण्याचा आधार आहे. DAMar 381.2

देवासमान होणे ही एकदम स्वीकारणीय बाब आहे असे लुशिफराने गणले होते, परंतु देवाच्या स्वरूपाचे असणाऱ्या ख्रिस्ताने, “मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण, सोशिले; एथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” फिलिप्पै. २:७, ८. वधस्तंभ त्याच्यासमोर होता, परंतु खुद्द त्याचे शिष्य, सैतानी सत्तेचे तत्त्व असलेल्या आप्पलपोटेपणाने भारावून गेले होते, त्यामुळे ते त्याच्या प्रभूला सहानुभूतीसुद्धा दाखवू शकले नव्हते. त्यांच्यासाठी धारण केलेल्या त्याच्या नम्रतेविषयी तो त्यांना सांगत असताना ते त्याला समजूनही घेत नव्हते. DAMar 382.1

येशूने अगदी ममताळूपणे, परंतु ठासून ती दुष्टाई दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. स्वर्गाच्या राज्यात अधिकार धारण करणारे कोणते तत्त्व आहे आणि देवाच्या राज्याच्या सुत्राप्रमाणे खरा मोठेपणा कशाने मोजला जातो हे त्याने दाखविले. जे लोक गर्वाने आणि भेदभावाची प्रीति याने प्रभावित झाले होते, ते त्यांना मिळालेल्या देणग्या, त्यांनी देवाला कशा परत करावयाच्या होत्या याचा विचार करण्याऐवजी ते स्वतःचा व त्यांना अपेक्षीत असलेल्या प्रतिफळाचा विचार करीत होते. त्यांना देवाच्या राज्यात जागा मिळणार नाही कारण त्याना सैतानाच्या दर्जाचे मानले जाईल. DAMar 382.2

आधी नम्रता मग मान्यता. उच्च पदावर बसविण्यासाठी योहानाप्रमाणे देवासमोर जो नम्रता धारण करतो, त्या कामदाराला परमेश्वर निवडतो. अगदी लहान मुलासारखा शिष्य देवाच्या कार्यात अधिक कार्यक्षम असतो. जो स्वतःची बढती करण्याचा नव्हे, तर आत्मे जिंकण्याचा प्रयत्न करतो त्याला स्वर्गातील देवदूत सहकार्य करू शकतात. ज्याला दैवी साहाय्याची अत्यंत आवश्यकता भासते त्याने कळकळीची विनंती करावी; आणि पवित्र आत्मा त्याला समर्थ व उन्नत करणारे ख्रिस्ताचे ओझरते दर्शन देईल. ख्रिस्ताबरोबर सुसंवाद साधल्यानंतर तो, पापामुळे जे नाश पावत आहेत त्यांच्यासाठी कार्य करील. त्याला त्याचे कार्य करण्यासाठी निवडलेला आहे. जेथे ज्ञानी व विद्यवान अपयशी ठरतात तेथे तो यशस्वी होईल. DAMar 382.3

परंतु देवाच्या महान योजनेच्या यशासाठी त्यांचीच गरज आहे असे समजून जेव्हा लोक स्वतःचीच प्रतिष्ठा मिरवितात, स्वतःलाच उंच करतात, तेव्हा प्रभु त्यांना दूर सारतो, आणि प्रभु त्यांच्यावर अवलंबून नाही हे प्रदर्शित केले जाते. त्यांना दूर सारल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे कार्य बंद पडत नाही, तर उलट अधिक समर्थपणे पुढे सरकते. DAMar 382.4

येशूच्या शिष्यांना, येशूच्या राज्याच्या स्वरूपाच्या शिक्षणाची गरज नव्हती, तर त्या राज्याच्या तत्त्वाबरोबर त्यांची एकवाक्यता होईल अशा अंतःकरणाच्या परिवर्तनाची त्यांना आवश्यकता होती. म्हणून येशूने एका मुलाला बोलावून घेतले व त्यांच्यामध्ये त्याला उभे केले, आणि अगदी मायेने त्याला कंवटाळून धरून तो म्हणाला, “तुमचे मन वळल्याशिवाय व तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.’ सोज्वळपणा, निस्वार्थ वृती आणि लहान मुलासारखे विश्वासपूर्ण प्रेम या गुणवैशिष्ट्यांना देव किंमत देतो. खऱ्या मोठेपणाचे हेच गुणधर्म आहेत. DAMar 383.1

येशूने पुन्हा स्पष्टपणे सांगितले की त्याचे राज्य हे भौतिक मोठेपणा व डामडौल यामुळे लक्षणीय ठरत नाही. येशूच्या चरणापाशी या प्रतिष्ठा किंवा गुणवैशिष्ट्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. धनवान व दरिद्री, शिक्षित व अशिक्षित, असे सर्व लोक जाती भेद किंवा जगिक श्रेष्ठत्व याचा विचार न करता एकत्र जमतात. रक्ताने खरेदी केलेल्या आत्म्याप्रमाणे एकत्र जमतात. DAMar 383.2

प्रामाणिक व पश्चातापी व्यक्ती देवाला फार मौल्यवान असते. तो त्यांच्यावर त्याचा शिक्का, त्यांचा दर्जा, त्यांची धनाड्यता, त्यांचे बौद्धिक श्रेष्ठत्व यामुळे मारीत नाही, तर ते सर्व ख्रिस्तात एकभाव झाल्यामुळे मारतो. गौरवी प्रभु, जे लीन व दीन आहेत त्यांच्याबाबत समाधानी असतो. दावीद म्हणाला की “तूं मला आपली तारणरूप ढाल दिली आहे,... तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” स्तोत्र. १८:३५. DAMar 383.3

येशू म्हणाला, “जो कोणी माझ्या नामाने असा बालकापैकी एकाला स्वीकारितो तो मला स्वीकारितो, व जो कोणी स्वीकारितो, तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो.” “परमेश्वर म्हणतो आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे,... पण जो दीन व भग्नहृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याजकडे मी पाहतो.” यशया ६६:१, २. DAMar 383.4

तारणाऱ्याच्या शब्दाद्वारे शिष्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या अविश्वाची भावना जागी केली होती. उत्तरामध्ये खास करून कोणाचाही नामनिर्देश केला नव्हता, परंतु एका गोष्टीबाबत योहानाची कृती योग्य होती की नव्हती असा प्रश्न विचारण्यास योहान पुढे झाला. एकाद्या बालकाच्या आवेशाने त्याने ती बाब प्रभूपुढे मांडली. तो म्हणाला, “गुरूजी, आम्ही एका इसमाला आपल्या नामाने भूते काढताना पाहिले; तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आम्हाला अनुसरत नव्हता.” DAMar 383.5

याकोब आणि योहान यांना असे वाटले होते की त्या माणसाचा दोष दाखवण्याद्वारे ते त्यांच्या प्रभूचा मान राखत होते. परंतु त्यांना दिसून येऊ लागले होते की ते स्वतःचाच अभिमान बाळगत होते. त्यांनी त्यांची चूक मान्य केली, आणि “त्याला मना करूं नका; कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे” अशा शब्दाने येशूने त्यांची केलेली कानउघडणी मान्य केली. ज्यानी कोणत्याही प्रकारे येशूबरोबर मित्रत्व दाखविले नव्हते त्या कोणालाही झिडकारावयाचे नव्हते. येशूचे शील व कार्य यामुळे प्रभावित झालेले, व ज्यांनी येशसाठी त्यांची अंत:करणे विश्वासाने उघडली होती असे अनेक लोक होते; म्हणून लोकांच्या मनातील विचार किंवा उद्देश न समजणाऱ्या शिष्यांनी त्यांना निराश न करण्याबाबत दक्षता घ्यावयाची होती. जेव्हा येशू व्यक्तीशः त्यांच्या समवेत असणार नव्हता आणि सर्व कार्य त्यांच्या हाती सोपविण्यात यावयाचे होते, तेव्हा त्यांनी संकुचित, अहंभावी वृत्तीने राहावयाचे नव्हते, तर त्यांच्या गुरूमध्ये जी आत्यंतिक सहानुभूती पाहिली होती त्याच सहानुभूतीने त्यांनीही वागावयाचे होते. DAMar 384.1

एकादी व्यक्ती सर्व बाबतीत आपल्या व्यक्तीगत कल्पना किंवा मते यांच्याशी जुळवून घेत नाही या वस्तुस्थितीमुळे त्याला देवाचे कार्य करण्यास मनाई करणे आपल्याला समर्थनीय ठरणार नाही. ख्रिस्त हाच महान गुरू आहे; आपल्याला न्यायनिवाडा करावयाचा नाही किंवा हुकूम सोडावयाचा नाही, तर नम्रभावे प्रत्येकाला त्याच्या चरणाशी बसावयाचे आहे आणि त्याच्याकडून शिक्षण संपादन करावयाचे आहे. देवाने राजी केलेली प्रत्येक व्यक्ती ही ख्रिस्ताच्या क्षमाशील प्रीतीचे माध्यम आहे. कदाचित आपण देवाच्या एकाद्या प्रकाशधारकाला निराश करू आणि त्यामुळे त्याच्याकडून जगात पसरविल्या जाणाऱ्या किरणांना अटकाव होऊ नये म्हणून आम्ही किती दक्षता बाळगली पाहिजे! DAMar 384.2

ज्याला ख्रिस्त स्वतःकडे आकर्षित करीत होता, त्याला शिष्याने दाखविलेला कठोरपणा, आणि निरूत्साह - ख्रिस्ताच्या नामाने चमत्कार करणाऱ्याला प्रतिबंध करणारी योहानाच्या कृतीसारखी कृती - याचा परिणाम त्याला सैतानाच्या मार्गाकडे वळण्यास प्रवृत करील आणि त्यामुळे आत्म्याचा नाश होईल. एकाद्याने असे करण्यापेक्षा, येशू म्हणाला, “त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल पाण्यात बुडवावे ह्यांत त्याचे हित आहे.” आणखी येशू म्हणाला, “तुझ्या हाताने तुला अडखळविले तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे यापेक्षा व्यंग होऊन जीवनांत जावे हे तुला बरे. तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकात टाकिले जावे, यापेक्षा पंगू होऊन जीवनांत जावे हे तुला बरे.” मार्क ९:४३-४५. DAMar 384.3

कळकळीच्या भाषेसारखी दुसरी भाषा कडक का नाही? कारण हे की “जे हरवलेले त्याला तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.” स्वर्गीय अधिपतीने दाखविली त्यापेक्षा कमी आदरबुद्धी शिष्यांनी त्यांच्या बाधंवाच्या आत्म्यासाठी दाखवावी काय? प्रत्येक आत्म्याच्या खरेदीची किंमत अमर्यादित आहे, म्हणून ख्रिस्तापासून एक आत्मा परत फिरवणे हे किती भयंकर पाप आहे. यामुळे तारणाऱ्याची प्रीति, अपमान आणि शारीरिक व मानसिक त्रास ही त्यांच्यासाठी निरर्थक झाली असती. DAMar 384.4

“अडखळ्यामुळे जगाला धिक्कार असो! अडखळे तर होणारच, परंतु ज्या मनुष्याकडून अडखळा होईल त्याला धिक्कार असो!” मत्तय १८:७. सैतानाने चेतविलेले जग, खचित ख्रिस्ताच्या अनुयायांना विरोध करील, आणि त्याचा विश्वास नाहीसा करण्याचा प्रयत्न करील, परंतु जो त्याचे (ख्रिस्ताचे) नांव धारण करतो आणि काम मात्र सैतानाचे करतो त्याला धिक्कार असो! जे त्याची सेवा करतात असे मानतात, परंतु त्याच्या शिलाचे विपरित प्रगटीकरण करतात, त्यामुळे असंख्य लोक फसविले जातात आणि चुकीच्या मार्गाला लावले जातात. DAMar 385.1

पापात पाडणारी, आणि ख्रिस्ताची अप्रतिष्ठा करणारी संवय किंवा प्रथा कोणताही त्याग करून सोडणे अत्युत्तम होईल. देवाची अप्रतिष्ठा करणारी गोष्ट माणसाच्या फायद्याची ठरू शकत नाही. नीतीची शाश्वत तत्त्वे उलंघून कोणीही मनुष्य स्वर्गीय आशीर्वाद मिळवू शकत नाही. हृदयात जतन केलेले एक पाप, शीलाची अवनति करण्यास आणि इतरांना विपर्यस्त मार्गाला लावण्यास पुरेसे आहे. शरीराला मरणापासून वाचविण्यासाठी हात किंवा पाय तोडून टाकणे, किंवा डोळा उपटून टाकणे उचित आहे, तर आत्म्याला मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या पापाला समूळ उपटून टाकण्याबाबत आपण किती तरी प्रामाणिक असले पाहिजे. DAMar 385.2

विधिच्या सेवेत, प्रत्येक बलिदानात मीठ मिसळले जात होते. धूपाच्या अर्पणाप्रमाणे हे कृत्य दाखवून देते की केवळ ख्रिस्ताचे नीतिमत्व (धार्मिकता) देवाला प्रिय अशी सेवा करू शकते. या प्रथेचा संदर्भ देत असतांना येशू म्हणाला, “प्रत्येक बलिदान मीठाने खारट करतील.” “तुम्ही आपणात मीठ असू द्या व एकमेकाबरोबर शांतीने राहा.” जे स्वतःचा “जीवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ” करतील त्यांनी त्या तारणदायी मीठाचा, तारणाऱ्याच्या धार्मिकतेचा स्वीकार केला पाहिजे. (रोम. १२:१). त्यानंतर मीठ जसे सडण्याच्या क्रियेपासून वाचविते तसे ते लोकांतील दुष्टाईपासून आवणारे “पृथ्वीचे मीठ’ होतील. मत्तय ५:१३. परंतु जर मीठाने त्याचा खारटपणा गमाविला; तर देवाच्या प्रीतीशिवाय केवळ ईश्वरानिष्ठेची कबूली असली तर त्यात कल्याणकारक सामर्थ्य नसेल. जीवन जगावर तारणदायी प्रभाव पाडू शकणारच नाही. येशू म्हणतो, माझ्या राज्याची स्थापना करण्याच्या कार्यात तुमची शक्ती व कुशलता तुम्ही माझ्यावर विसंबून राहाण्यामुळेच प्राप्त करू शकता. जीवनासाठी जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे जीवन माझ्या कृपेने कृपामय केले पाहिजे. असे केल्यानंतर शत्रुत्व उरणार नाही. स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, उच्च पदाची अपेक्षा बाळगली जाणार नाही. स्वतःलाच समृद्ध करण्यासाठी नव्हे तर इतरांनासुद्धा समृद्ध करणारे प्रेम तुमच्या ठायी असेल. DAMar 385.3

पश्चातापी पाप्याने त्याची दृष्टी “जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा’ याच्यावर लावली (योहान १:२९) तर तो बदलून जातो. त्याच्या भयाची जागा संतोष घेतो, संशयाचे रूपांतर आशेमध्ये होते. कृतज्ञता उसळून वर येते. पाषाणमय हृदय भग्न पावते. त्यांच्यात प्रीतिचा पूर वाहू लागतो, जीवनी पाणी असलेला त्याच्यातील ख्रिस्त त्याच्या अविनाशी जीवनाचा झरा बनतो. जेव्हा आपण, दुःख सहन करणाऱ्या, हरवलेल्यांचा शोध करण्यासाठी अतोनात श्रम घेणाऱ्या, स्वतःची कार्यसिद्धी होईपर्यंत शहरो-शहरी फिरणाऱ्या येशूकडे पाहतो; जेव्हा आपण गेथशेमाने बागेत रक्ताच्या टपोऱ्या थेंबाच्या घामाने थबथबलेल्या, आणि वधस्तंभावर शारीरिक व मानसिक भयंकर वेदना सहन करीत प्राण सोडणाऱ्या ख्रिस्ताला पाहतो तेव्हा स्वार्थ मान्यतेसाठी आवाज कधीच काढणार नाही. आपण ख्रिस्ताकडे पाहिल्याने आपल्याला आपला निरूत्साहीपणा, सुस्तपणा आणि स्वार्थीपणा यांची शरम वाटल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्ताचा खांब वाहण्यासाठी आपण संकट, अपमान आणि छळ सहन करण्यात आनंद मानू. DAMar 386.1

“आपण जे सबळ आहो त्या आपण, दुर्बळाची दुर्बळता सोशिली पाहिजे; आपल्याच सुखाकडे पाहू नये.’ रोम १५:१. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आणि कदाचित विश्वासात दुर्बळ असून लहान बालकाप्रमाणे लटपटत पाऊल टाकणाऱ्या कोणालाही कमी लेखले जाऊ नये. ज्या गोष्टीमुळे आम्हाला इतरापेक्षा अधिक फायदा झाला आहे - त्या गोष्टी, मग त्या शिक्षण आणि सभ्यता, शीलसंपन्नता, ख्रिस्ती प्रशिक्षण, धर्मानुभव असो ज्यांना या गोष्टी कमी प्रमाणात लाभल्या आहेत त्यांचे आम्ही ऋणको आहोत; म्हणून आपणास जे काही करता येईल ते करून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आपण जर बलवान असू तर आपण दुर्बलाचे हात बळकट केले पाहिजेत. वैभवाने नटलेले देवदूत जे स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पहातात ते त्याच्या लहान्यातील लहान्याची सेवा करण्यात आनंद मानतात. ज्यांच्या स्वभावाविषयी अनेक हरकती घेता येण्यासारख्या आहेत असे लोक त्यांचे खास कार्यक्षेत्र असते. देवदूतांची ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आवश्यकता असते तेथे ते हजर असतात. जे लोक अहंपणाबरोबर प्रखर लढा देत असतात, आणि ज्यांच्या सभोवारचा परिसर निराशमय वातावरणाने व्यापलेला असतो अशा सर्व ठिकाणी ते (देवदूत) हजर असतात. अशा प्रकारच्या लोकसेवा कार्यात ख्रिस्ताचे खरे अनुयायी सहकार्य करतील. DAMar 386.2

जर दुर्बलातील (लहानातील) एकदा बलवान झाला, आणि त्याने तुमच्याविरुद्ध गुन्हा केला, तर त्याच्याबरोबर समेट करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तसा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. समेट करण्यासाठी त्याने पहिले पाऊल उचलावे याची तुम्ही वाट पाहू नका. याबाबत येशूने एक दाखला दिला आणि म्हणाला “तुम्हास कसे वाटते; कोणाएक मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत, आणि त्यातून एखादे भटकले तर तो ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास जाणार नाही काय? कदाचित ते त्याला सांपडले, तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील असे मी तुम्हास खचीत सांगतो. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” DAMar 386.3

“तूंही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतः संभाळ,” (गलती. ६:१) आणि सौम्य वृत्तीने अपराधी व्यक्तीकडे जा, आणि “तूं व तो एकटे असताना त्याचा अपराध त्याला दाखीव.” त्याचा अपराध इतराना दाखवून त्याला लज्जित करू नको, किंवा ज्याने ख्रिस्ताचे नाव धारण केले आहे त्याचे पाप किंवा त्याची चूक सर्व लोकांत प्रसिद्ध करून ख्रिस्ताचा अवमान करू नका. वेळोवेळी अपराध्याला सत्य गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे; त्याच्यात सुधारणा व्हावी म्हणून त्याची चूक त्याला दाखविली पाहिजे. तथापि तुम्ही त्याला अपराधी ठरवू नये किंवा त्याचा न्याय करू नये. स्वतःचे आत्मसमर्थन करण्याचा कोणताच प्रयत्न करू नका. त्याच्यात सुधारणा व्हावी यासाठीच तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न करावेत. जखमावर इलाज करताना कमालीचा समजूतदारपणा व मायाळू स्पर्श याची गरज असते. वधस्तंभावर दुःख सोसलेल्या ख्रिस्ताच्या प्रेमासारखे प्रेमच केवळ अशा वेळी उपयोगी पडते, कामास येते. निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी झालात तर “त्याचा जीव मरणापासून तारील व पापाची रास झाकील,’ याकोब ५:२०. असे समजून अगदी ममतेने हळूवारपणे भावाने भावाबद्दल निर्णय घ्यावा. DAMar 387.1

या प्रयत्नाचासुद्धा काही उपयोग झाला नाही. तर येशूने सांगितले की “तू आणखी एकादोघास आपणाबरोबर घे.” कदाचित दोघानी एकत्रीपणे केलेल्या प्रयत्नाच्या प्रभावाने पहिल्या प्रयत्नाने अयशस्वी झालेला हेतू सफल होईल. त्या दोघाचाही त्या समस्येशी काही संबंध नसल्यामुळे ते निःपक्षपाती वृत्तीने वागण्याची जास्त शक्यता आहे आणि या वस्तुस्थितीमुळे त्यांचा सल्ला अपराध्यावर अधिक वजन पाडेल. DAMar 387.2

जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर, वरील प्रयत्न करून झाल्यानंतरच, त्यापूर्वी नाही, ती बाब सर्व मंडळीपुढे मांडावी. ख्रिस्ताचे प्रतिनिधी या नात्याने मंडळीच्या सर्व सभासदांनी प्रार्थनेसाठी एक व्हावे आणि अपराध्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून कळकळीची विनंती करावी. अपराधी आत्मा किंवा बहकलेला आत्मा देवाकडे परतावा म्हणून पवित्र आत्मा त्याच्या दासाकरवी त्याच्याशी बोलेल. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पौल म्हणतो, “यास्तव देव आम्हाकडून बोध करवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करितो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करितो.’ २ करिंथ. ५:२०. जो कोणी अशा औपचारिक मागणीचा अव्हेर करतो तो त्याला ख्रिस्ताबरोबर बांधलेले बंधन तोडून टाकतो. अशा प्रकारे तो स्वतःला मंडळीच्या सहभागातून विभक्त करून घेतो. त्यानंतर “तो तुला विदेशी किंवा जकातदार यासारिखा होवो.” असे येशूने सांगितले. तथापि तो देवाच्या दयेपासून दूर झाला आहे असे मानण्यात येऊ नये. त्याच्या आधीच्या बांधवांनी त्याला पाण्यात पाहू नये, त्याचा तिरस्कार करू नये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. ख्रिस्त जसा बहकलेल्या एका मेंढराला कळपात आणण्यासाठी सतत प्रयत्न करतो त्याप्रमाणे त्याला कनवाळूपणाने व मायाळूपणाने वागविण्यात यावे. DAMar 387.3

“आपल्या मनांतही आपल्या भावाचा द्वेष करू नको; आपल्या शेजाऱ्याचा निषेध अवश्य करावा, न केला तर त्याच्यामुळे तुझ्या माथी पाप येईल.” लेवी १९:१७. मोशेद्वारे इस्राएल लोकांना देण्यात आलेल्या या शिकवणीपेक्षा अपराध्याला वागविण्याबाबत येशूची शिकवण अधिक निश्चित स्वरूपाची आहे. म्हणजे असे की, ज्याने अपराध केला आहे किंवा पाप केले आहे त्यांना सुधारण्याबाबत ख्रिस्ताने जे सांगितले आहे त्याप्रमाणे न करणारा त्या पापात भागीदार होतो. कारण आपण जे दोष काढले असतील ते आपण केल्यासारखे होईल. DAMar 388.1

तथापि खुद्द अपराध करणाऱ्यालाच आपण त्याचे अपराध दाखवावयाला हवेत. त्याबाबत आपण आपापल्यात टिका आणि वाच्यता करावयाची नाही; किंवा मंडळीच्या निदर्शनास आणल्यानंतर ती गोष्ट इतरांना सांगण्यासाठी ते मोकळे नाहीत. ख्रिस्ती लोकांच्या पापाचे ज्ञान ख्रिस्तावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी अडखळण्याचे फक्त कारण होईल; अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आपण आपल्यालाच इजा करून घेऊ कारण पाहण्याद्वारे माणसात बदल होतो. जेव्हा आपण आपल्या बांधवाच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खुद्द ख्रिस्ताचा आत्मा त्याच्या बांधवाच्या टिकेपासून आणि कितीतरी मोठ्या प्रमाणात ख्रिस्तावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकापासूनसुद्धा त्याचे संरक्षण करण्यास आपल्याला मार्गदर्शन करतो. आपण सर्वजण चुका (अपराध) करतो, म्हणून आम्हा सर्वाना ख्रिस्ताच्या कृपेची व पापक्षमेची गरज आहे. त्याने आम्हाला जसे वागवावे अशी आम्ही इच्छा बाळगतो, तसेच आम्ही इतरांना वागवावे अशी तो आम्हाला आज्ञा करतो. DAMar 388.2

“जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल, ते स्वर्गात बंद केले जाईल; आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” तुम्ही देवाचे (स्वर्ग राज्याचे) राजदूत म्हणून कार्य करीत आहात आणि तुमच्या कार्याचे परिणाम अनंतकालिक असतील. DAMar 388.3

तथापि ही महान जबाबदारी आपण एकट्या एकट्याने घ्यावयाची नाही. जेथे कोठे त्याचे वचन मनापासून प्रामाणिकपणे ऐकले जाते तेथे ख्रिस्त वास करतो. तो केवळ मंडळीच्या मोठ्या सभामध्येच हजर राहातो असे नाही, तर जेथे कोठे त्याच्या नावाने त्याचे शिष्य - मग ते कितीही थोडके (असून) एकत्र जमतात तेथेसुद्धा तो असतो. तो सांगतो, “तुमच्यातील दोघे कोणाएका गोष्टीविषयी एकचित होऊन विनंती करितील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल.’ DAMar 388.4

“माझ्या स्वर्गातील पिता’ असे संबोधून येशू त्याच्या शिष्यांना आठवण करून देत होता की, तो मानवी देहाद्वारे तो त्यांच्याशी जोडला गेला आहे, त्यांच्या संकटात भागीदार आहे, त्यांच्या दुःखाच्या वेळी सहानुभूती दाखविणारा आहे, आणि त्याच्या देवत्वाद्वारे त्याचा संबंध देवाच्या आसनाशी आहे. अद्भुत आत्मविश्वास! स्वर्गातील देवदूत दयामय भावाने मानवाबरोबर एक होतात आणि जे हरवले आहेत त्यांचे तारण करण्यासाठी कार्य करतात. लोकांना ख्रिस्ताकडे ओढण्यासाठी स्वर्गीय सर्व सामर्थ्य मानवी सामर्थ्यामध्ये एकवट केले जाते. DAMar 389.1