युगानुयुगांची आशा

43/88

अध्याय ४२—परंपरा — सांप्रदाय

मत्तय १५:१-२०; मार्क ७:१-२३.

वल्हांडण सणाच्या वेळी येशूला भेटण्याच्या अपेक्षेने त्याला जाळ्यात पकडण्याचा शास्त्री व परूशी यांनी निर्धार केला होता. परंतु त्यांचा हा उद्देश ओळखून येशू ह्या सणापासून गैरहजर राहिला. “नंतर शास्त्री व परूशी मिळून येशूकडे आले.’ तो त्यांच्याकडे गेला नाही म्हणून ते त्याच्याकडे आले. काही कालावधीसाठी गालीलीचे लोक येशूच मशीहा म्हणून स्वीकार करतील आणि त्या भागात अधिकार परंपरा संपुष्टात येईल असे वाटले होते. शिष्यांचे सेवाकार्य ख्रिस्ताच्या कामाच्या विस्ताराचे चिन्ह असून त्याद्वारे शिष्य धर्मगुरूंच्या संघर्षात येत होते आणि त्यामुळे यरुशलेममध्ये पुढाऱ्यांचा मत्सर बळावला होता. त्याच्या सेवाकार्याच्या प्रारंभी कफर्णहूमला हेर पाठविले होते आणि ते त्याच्यावर शब्बाथ उलंघनाचा आरोप करण्याचा प्रयत्न करीत असताना ते गोंधळात पडले; परंतु धर्मगुरूंनी त्यांचा उद्देश पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला. त्याच्या हालचालीवर देखरेख ठेवून त्याच्याविरूद्ध काही आरोप शोधण्यासाठी आता दुसरे शिष्ठमंडळ पाठविण्यात आले होते. DAMar 341.1

पूर्वीप्रमाणेच त्यांच्या आरोपाचा पाया म्हणजे देवाच्या नियमाला अडथळा होणारे पारंपारिक निबंधाविषयी (संप्रदाय) त्याचा अनादर. देवाचे नियम सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची योजना उघड उघड केली होती परंतु ते देवाच्या नियमापेक्षा अधिक पवित्र आहेत असे समजत होते. सिनाय पर्वतावरून देवाने दिलेल्या आज्ञांशी त्यांचा विरोध होत असताना धर्मगुरूंच्या संप्रदायाला त्यांनी अधिक महत्त्व दिले. DAMar 341.2

संस्काराद्वारे शुद्धीकरण हा विधि काटेकोरपणे पाळला जात होता. जेवणाच्या अगोदर पाळावयाच्या संप्रदायात केलेला निष्काळजीपणा घोर पाप समजण्यात येत असून त्याची शिक्षा ह्या जगात आणि येणाऱ्या जगात होत असे. हे पाप करणाऱ्याचा नाश करणे धर्माचरण समजले गेले होते. DAMar 341.3

शुद्धीकरणाऱ्या बाबतीत अगणित नियम होते. त्या सर्वांची ओळख करून घेण्यास सबंध आयुष्य पुरे होणार नव्हते. धर्मगुरूंनी लावून दिलेल्या अपेक्षित गोष्टींचे पालन करणे हा विधिसंस्कार, भष्टाचार, नित्याचे धुणे व शुद्धीकरण यांच्या विरुद्धची मोठी धडपड होती. देवाने अपेक्षा न केलेल्या क्षुल्लक गोष्टीचे काटेकोर पालन करीत असताना त्यांनी त्याच्या महान आज्ञाकडे दुर्लक्ष केले. DAMar 341.4

ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांनी धुण्याच्या सांप्रदायाचे पालन केले नव्हते आणि हेरांनी त्याबाबतीत त्यांच्यावर आरोप ठेविला. तथापि त्यांनी ख्रिस्तावर प्रत्यक्ष हल्ला केला नाही परंतु त्याच्या शिष्यांच्यावर आरोप करीत ते त्याच्याकडे आले. लोकांच्या समोर त्यांनी म्हटले, “आपले शिष्य वाडवडिलांचा सांप्रदाय का मोडतात? कारण जेवते वेळी ते हात धूत नाहीत.” DAMar 342.1

जेव्हा जेव्हा सत्य संदेश सामर्थ्यानिशी मनावर प्रभाव पाडतो तेव्हा तेव्हा सैतान क्षुल्लक गोष्टीवर वादविवाद निर्माण करितो. अशा रीतीने तो मुख्य मुद्यापासून मन दुसरीकडे खेचतो. जेव्हा चांगल्या कामाला सुरूवात होते तेव्हा क्षुल्लक गोष्टीपुढे मांडून प्रत्यक्ष सत्यस्थिती बाजूला सारण्याचा प्रयत्न करण्यात येतो. देव आपल्या लोकासाठी विशिष्ट पद्धतीने काही काम करणार आहे असे दिसते तेव्हा नाशकारक संघर्षापासून दूर राहा. आमच्यापुढे महत्त्वाचे प्रश्न हे आहेत की, देवपुत्रावर तारणदायी श्रद्धा आहे काय? देवाच्या नियमाप्रमाणे माझा जीवनक्रम आहे काय? “जो पुत्रावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही.” “आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखितो.” योहान ३:३६; १ योहान २:३. DAMar 342.2

येशूने स्वतःचे किंवा शिष्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच्याविरूद्ध केलेल्या आरोपाचाही त्याने उल्लेख केला नाही, परंतु ज्या मनोवृत्तीने हे मानवी विधि करण्यास हे हेकेखोर लोक प्रवृत झाले ती दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला. ते जे वारंवार करीत होते त्यांचे त्याने उदाहरण दिले आणि त्याच्या शोधार्थ येण्याअगोदर त्यांनी ते केले होते. त्याने म्हटले, “तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहाता... कारण मोशेने सांगितले आहे की, तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करितो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एकादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे; आणि तो मोकळा, मुक्त आहे. आणि त्याला त्यापुढे आपल्या बापासाठी किंवा आईसाठी तुम्ही काही करू देत नाही.” त्याचा काही परिणाम होणार नाही असे समजून पाचवी आज्ञा ते बाजूला ठेवतात, परंतु वडीलधाऱ्या माणसाविषयीचे सांप्रदाय काटेकोर पाळण्यात येतात. स्वतःची मालमता मंदिराला वाहून देणे हे आईबापाचे पोषण करणे किंवा आधार देणे यापेक्षा अधिक पवित्र कर्तव्य आहे आणि कितीही मोठी अनिवार्य गरज असली आणि वाहून दिलेल्या अर्पणातून काही भाग आईबापांना दिला तर ती देवस्थानाची चोरी होते. अशा प्रकारची शिकवण त्यांनी लोकांना दिली. आज्ञाधारक किंवा कर्तव्यतत्पर नसलेल्या मुलाने आपल्या मालमत्तेवर केवळ “कुर्बान’ हा शब्द उच्चारून ती देवाला वाहून दिली आहे हे दर्शवायचे आणि सबंध आयुष्यभर स्वतःच्या कामासाठी वापरण्यास त्याने ती ठेवायची होती आणि त्याच्या मृत्यूनंतर ती मंदिराच्या कामी लावायची होती. अशा प्रकारे, देवाला वाहून दिले आहे ह्या ढोंगी निमित्ताने तो आपल्या आईबापांची ह्या जीवनात व मृत्यूत अप्रतिष्ठा करून लबाडीने लुबाडण्यास मोकळा राहिला होता. DAMar 342.3

मनुष्याने देवाला दान किंवा देणगी देण्याच्या कर्तव्याला येशूने उक्तीने किंवा कृतीने केव्हाही कमी लेखले नव्हते. दशमांश आणि दान ह्या बाबतीत ख्रिस्तानेच मार्गदर्शन केले होते. ह्या पृथ्वीवर असताना ज्या गरीब स्त्रीने आपले सर्व काही मंदिराच्या खजीन्यात टाकिले तेव्हा ख्रिस्ताने तिची प्रशंसा केली. परंतु याजक व धर्मगुरू यांचा देवाविषयीचा दिखाऊ उत्साह त्यांची स्वतःची समृद्धी करून घेण्याच्या इच्छेवर ढोंगाचे पांघरून होता. त्याद्वारे लोकांची फसगत झाली. देवाने न लादलेले जड ओझे ते वाहात होते. ख्रिस्ताचे अनुयायीसुद्धा ह्याच्यातून सुटले नव्हते. वंशपरंपरेने कलुषित झालेले मन आणि धर्मगुरूंचा अधिकार यांच्याद्वारे त्यांच्यावर पडलेले ओझे त्यांना वाहावयाचे होते. आता धर्मगुरूविषयीची सत्य परिस्थिती प्रगट करून खऱ्या अर्थाने देवाची सेवा करणाऱ्यांची संप्रदायाच्या बंधनातून सुटका करण्याचा येशूने प्रयत्न केला. DAMar 343.1

कपटी, कावेबाज हेरांना उद्देशून त्याने म्हटले, “तुम्हा ढोंग्याविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेविला आहे. त्याचा लेख असाः हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकतात ते असतात मनुष्याचे नियम.” येशूचे शब्द परूश्यांच्या व्यवस्थापनेवर दोषारोप होते. देवाच्या नियमापेक्षा धर्मगुरूंच्या शिकवणीला अधिक महत्त्व दिल्याने त्यांनी स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ गणले असे त्याने विदित केले. DAMar 343.2

यरुशलेमवरून आलेले प्रतिनिधी रागाने संतप्त झाले होते. सिनाय पर्वतावरून दिलेल्या नियमाचे तो उलंघन करीत आहे असा त्याच्यावर ते आरोप करू शकत नव्हते कारण सांप्रदायाच्या विरूद्ध बोलून त्यांचे तो समर्थन करीत होता. त्याने सादर केलेल्या देवाच्या श्रेष्ठ आज्ञा आणि मनुष्यांनी योजलेले हलके नियम यांच्यामध्ये लक्षणीय फरक होता. DAMar 343.3

भ्रष्टता बाहेरून येते अंतर्यामातून येत नाही याचे स्पष्टीकरण येशूने प्रथमता लोकसमुदायाला आणि नंतर शिष्यांना केले. पावित्र्य आणि अपावित्र्य आत्म्याशी संबधित आहे. मानवाने योजलेल्या विधिनियमाकडे दुर्लक्ष केल्याने नाही परंतु दुष्ट कृती, दुष्ट उक्ती, दुष्ट विचार, दैवी आज्ञांचे उल्लंघन यांच्याद्वारे मनुष्य भ्रष्ट होतो. DAMar 343.4

त्यांची खोटी शिकवण उघडी केल्यामुळे हेरांचा संताप शिष्यांच्या नजरेस आला. त्यांची क्रोधयुक्त मुद्रा त्यांनी पाहिली आणि असंतोषाचे व सूडाचे अस्पष्ट पुटपुटलेले उद्गार ऐकिले. आतापर्यंत त्याने अनेक वेळा सांगितले होते की उघड्या पुस्तकाप्रमाणे त्यांचे मन त्याने ओळखले आहे ते विसरून त्याच्या बोलाचा त्यांच्यावर झालेला परिणाम त्यांनी सांगितला. संतापलेल्या अधिकाऱ्यांचे मन तो वळवील असे समजून ते त्याला म्हणाले, “आपले बोलणे ऐकल्यावर परूश्यांचे मन फार दुखावले हे आपणाला ठाऊक नाही काय?” DAMar 344.1

त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक रोपटे मूळासकट उपटून टाकण्यात येईल.” धर्मगुरूंनी फार मोलाच्या ठरविलेल्या चालीरिती आणि सांप्रदाय हे ह्या जगातील होते, स्वर्गापासून नव्हते. तथापि त्यांचा अधिकार लोकात भारी होता परंतु देवाच्या कसोटीला ते उतरू शकले नव्हते. देवाच्या पवित्र आज्ञांच्या बदली मानवाने योजलेला प्रत्येक शोध त्या दिवशी निरर्थक ठरेल. त्यावेळी “सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करिताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.” उपदेशक १२:१४. DAMar 344.2

देवाच्या आज्ञांच्या जागी मानवाने आणिलेले बदली नियम अजून थांबलेले नाहीत. ख्रिस्ती लोकामध्येसुद्धा ज्या प्रथा, रिवाज, वहिवाट चालू आहेत त्यांना वडीलोपार्जित संप्रदायाप्रमाणेच आधार आहे. देवाच्या नियमांची जागा मनुष्यांच्या अधिकाराने अमलात आलेल्या रिवाजाने घेतली आहे. लोक आपल्या संप्रदायाला चिकटून राहातात आणि प्रथा, वहिवाट, रूढी यांचा आदर करितात आणि त्यांच्या चूका त्यांच्या नजरेस आणून देणाऱ्यांचा ते द्वेष करितात. सद्याच्या काळात देवाची आज्ञा पाळा व येशूचा विश्वास राख हा संदेश देण्यास आम्हाला पाचारण करण्यात आले आहे आणि ख्रिस्ताच्या काळात जे वैमनस्य होते तेच आम्ही आज पाहातो. देवाच्या अवशिष्ट लोकाविषयी असे लिहिले आहे, “तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.” प्रगटी. १२:१७. DAMar 344.3

परंतु “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक रोपटे मूळासकट उपटून टाकण्यात येईल.” मंडळीचे पुढारी, वडील (फादर) यांच्या अधिकाराच्या जागी सनातन पिता (फादर), स्वर्ग व पृथ्वी यांचा प्रभु याचे वचन स्वीकारण्यास देव आम्हाला आज्ञा करितो. केवळ येथेच अस्सल सत्य आहे. दाविदाने म्हटले, “माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक समज आहे; कारण मी तुझ्या निबंधांचे मनन करितो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधि पाळितो.” स्तोत्र. ११९:९९, १००. जे मानवी अधिकार, मंडळीचा रिवाज, रूढी किंवा पारंपारिक संप्रदाय यांचा स्वीकार करितात त्यांनी ख्रिस्ताने दिलेल्या इशाऱ्याच्या वचनाकडे लक्ष द्यावे. ख्रिस्ताने म्हटले, “ते मनुष्यांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ती करतात.” DAMar 344.4