युगानुयुगांची आशा

36/88

अध्याय ३५—“उगा राहा, शांत हो”

मत्तय ८:२३-३४; मार्क ४:३५-४१; ५:१-२०; लूक ८:२२-३९.

तो दिवस येशूच्या जीवनातील भरगच्च घडामोडीचा होता. गालील समुद्राच्या किनाऱ्यावर बसून येशूने त्याचा अगदी पहिला दाखला दिला होता. त्या दाखल्याच्या- द्वारे त्याने त्याच्या राज्याचे स्वरूप व ते कसे स्थापन केले जावयाचे होते याची माहिती अगदी परिचित उदाहरणाचा उपयोग करून लोकांना दिली होती. त्याने त्याच्या कार्याची सांगड पेरणी करणाऱ्याच्या कामाशी; त्याच्या राज्याच्या वृद्धिची सांगड मोहरीच्या दाण्याच्या वाढीशी व मापभर पिठातील खमीराच्या परिणामाशी घातली होती. धार्मिक व अधार्मिक यांच्या अंतिम विभागणीचे चित्र त्याने गह व निदण आणि माशाचे जाळे या दाखल्याद्वारे रेखाटले होते. त्याने शिकविलेल्या सत्याचे बहुमोल हे लपविलेली ठेव व मोलवान मोती या दाखल्याच्याद्वारे प्रदर्शित करण्यात आले होते. तर घरधन्याच्या दाखल्याद्वारे त्याचे प्रतिनिधी म्हणून त्याच्या शिष्यांनी कसे कार्य करायचे होते हे त्याने त्याच्या शिष्यांना शिकविले. DAMar 284.1

तो सर्व दिवसभर शिक्षण देण्यात व रोग बरे करण्यांत व्यग्र होता. सायंकाळ होत असतानासुद्धा लोकांचे थवे त्याच्या भोवती गर्दी करीत होते. विश्रांतीचा विरंगुळा किंवा जेवणाचे दोन घास घेण्यासाठी क्वचितच थांबून तो दिवसेंदिवस लोकांची सेवा करीत होता. द्वेषमूलक टीका व विपरीत बोलणी याच्या सहाय्याने परूशी लोकांनी सतत त्याचा पिच्छा पुरविल्यामुळे त्याचे श्रम अधिकच कष्टमय व मनस्तापदायक झाले होते; दिवस बुडण्याच्या सुमारास त्याला अतिशय थकल्यासारखे वाटत होते म्हणून त्याने समुद्राच्या पलीकडे जाऊन कुठेतरी एकान्त व निवांत स्थळी विश्रांति घेण्याचा निर्णय घेतला. DAMar 284.2

गनेसरतेचा पूर्व किनारा अगदीच निर्जन नव्हता, कारण समुद्राच्या आजूबाजूला विखरून वसलेली गावे होती; तरीसुद्धा पश्चिम किनाऱ्याच्या तुलनेत तो निर्जन होता. तेथे यहूदी लोकांपेक्षा विदेशी लोक संख्येने अधिक होते, आणि गालीली लोकाशी त्यांचा फारच थोडा संपर्क होता. अशा त-हेने येशूला पाहिजे होता तसा एकांतवास मिळणार होता आणि त्याने त्याच्या शिष्यांना त्याच्यासंगती पुढे चालण्यास आज्ञा केली. DAMar 284.3

त्याने सर्व लोकांना निरोप दिल्यानंतर “तो होता तसेच त्याला घेऊन त्याचे शिष्य बोटीत बसले, आणि ते तत्काळ तेथून निघाले. पण येथून निघणारे केवळ तेच नव्हते. समुद्रकिनाऱ्यावर कोळ्यांच्या दुसऱ्या बोटी पडलेल्या होत्या, आणि येशूला पाहण्यासाठी व त्याचा संदेश ऐकण्यासाठी येशूच्या मागे जे लोक आले होते ते त्या बोटीत बसले आणि तत्काळ त्या बोटी भरून गेल्या. DAMar 285.1

शेवटी लोकांच्या गर्दीतून सुटका झाल्याबद्दल तारणाऱ्याला आराम वाटला, आणि थकवा व भूक यामुळे गर्भगळीत झालेला येशू वरामावर गेला आणि तत्काळ गाढ झोपी गेला. ती सायंकाळ अगदी प्रसन्न वाटत होती. सरोवरावरसुद्धा प्रशांत वातावरण पसरले होते; परंतु एकाएकी आकाशांत गडद अंधकार दाटून आला, डोंगराच्या खिंड्यातून वारा तुफान वेगाने पूर्व किनाऱ्यावर वाहू लागला, आणि सरोवरावर उग्र वादळ निर्माण झाले. DAMar 285.2

सूर्यास्त झाला होता, वादळी सरोवरावर गर्द अंधारी रात्र पसरली होती. घोंगावणाऱ्या सुसाट वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आक्राळ विक्राळ लाटा क्रूरपणे शिष्यांच्या मचव्यावर आदळत होत्या आणि मचव्याला गिळून टाकण्याची (बुडविण्याची) भीती दाखवीत होत्या. त्या धट्याकट्या जातिवंद कोळ्यांनी त्यांचे उभे आयुष्य सरोवरावर घालविले होते आणि अनेक वेळा अनेक वादळातून त्याने त्यांचे मचवे सहीसलामत पार नेले होते; पण यावेळी त्यांचे शरीरबळ व कौश्यल्य कुचकामी ठरले होते. वादळाच्या माऱ्यामुळे ते असहाय झाले होते, आणि त्यांचा मचवा बुडताना पाहून त्यांनी आशा सोडून दिली होती. DAMar 285.3

स्वतःचा बचाव करण्यासाठी पयत्नांची पराकष्टा करण्याच्या भरामध्ये, त्याच मचव्यात येशू होता याचे भान त्यांना राहिले नव्हते. आता त्यांचे सर्व श्रम निरर्थक ठरल्यामुळे आणि मृत्यू त्यांच्यासमोर उभा टाकल्यामुळे, त्यांना आठवले की ते कोणाच्या सांगण्यावरून सरोवरापलीकडे जाण्यास निघाले होते. आता केवळ ख्रिस्त त्यांची आशा होता. त्यांच्या असहाय व निराशमय परिस्थितीत मोठ्याने ओरडून म्हणाले गुरूजी गुरूजी! परंतु गडद अंधारामुळे तो त्यांना दिसत नव्हता. लाटांच्या गर्जनामुळे त्यांचा आवाज त्या गर्जनामध्येच लोप पावत होता, म्हणून त्यांना उत्तर मिळत नव्हते. संशय व भीती यानी त्यांच्यावर हल्ला चढविला होता. येशू त्यांना विसरला होता काय? ज्याने रोग व भूते यांच्यावर विजय मिळविला होता, होय, मरणावर सुद्धा! तो आता त्याच्या शिष्यांना मदत करण्यास निर्बल झाला होता काय? त्यांच्या दुर्दशेत तो त्यांच्याविषयी बेपरवाई करीत होता काय? DAMar 285.4

पुन्हा त्यांनी आरोळी दिली, परंतु खवळलेल्या लाटामुळे त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही. अगोदरच त्यांचा मचवा बुडत चालला होता. काही क्षणाचा आवकाश, खवळलेला समुद्र त्यांना गिळंकृत करणार असे दिसू लागले. DAMar 285.5

आकाशात विजेच्या लख्खलख्खीत चकमकीने गडद अंधारावर प्रकाश चमकला, आणि तशा गडबड गोंधळामध्ये येशू अगदी निवांतपणे गाढ झोपलेला त्यांना दिसला. आश्चर्याने व निराशेने ते उद्गारले “गुरूजी, आपण बुडतो याची आपणाला चिंता नाही काय?” त्याचे शिष्य धोक्यांत सापडले असताना आणि मृत्यूशी झगडत असताना तो इतक्या निर्धास्तपणे कशी काय निवांत विश्रांति घेऊ शकतो? DAMar 286.1

त्यांच्या आरोळीने येशूला जागे केले. जेव्हा विजेच्या झगमगाटाने त्यांना तो दिसला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्वर्गीय शांती पसरलेली त्यांना दिसली; त्याच्या दृष्टीक्षेपात दयाळू, मायाळू प्रेम दिसले, आणि त्यांची अंतःकरणे त्याच्याकडे केवीलवाण्या आवाजात म्हणाली, “प्रभूजी बचाव करा, आपण बुडतो.” DAMar 286.2

आत्म्याच्या हाकेकडे कधीच दुर्लक्ष केले जात नाही. जेव्हा शेवटला प्रयत्न करण्यासाठी शिष्यांनी वल्हे पकडले, तेव्हा येशू उठला. समुद्रातील वादळ खवळले होते, लाटा त्यांच्यावर कोसळत होत्या, आणि विजेच्या प्रकाशाने त्याचा चेहरा झळकून गेला होता, त्यावेळी तो त्याच्या शिष्यांच्या मध्यभागी उभा राहिला, आणि दया करण्यासाठी नेहमीच उंचावत असलेले आपले हात उंचावून खवळलेल्या समुद्राला दरडावून म्हणाला, “शांत हो.” DAMar 286.3

एकदम वारा पडला. खवळलेल्या लाटा शांत झाल्या, ढग विरून गेले, आणि आकाशात तारे चमकू लागले. डळमळणारा मचवा समुद्राच्या प्रशांत पाण्यावर निवांतपणे तरंगू लागला, आणि मग येशू आपल्या शिष्याकडे वळून दुःखाने म्हणाला, “तुम्ही का घाबरला? अधापि तुम्हाला विश्वास नाही काय?” मार्क ४:४०. DAMar 286.4

शिष्यांमध्ये मंत्रमुग्ध शांतता पसरली होती. पेत्रानेसुद्धा त्यांच्या अंतःकरणातील अचंबा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. येशूच्या मचव्याला सोबत करण्यासाठी म्हणून त्याच्या मचव्याबरोबर निघालेले मचवेसुद्धा त्याच दुर्धर अडचणीच्या प्रसंगात सापडले होते. त्यांत असलेल्या लोकांची मने भीतीने व चिंतेने गांगरून गेली होती. समुद्रातील तुफानी लाटामुळे हेलकावणारे मचवे एकमेकाच्या जवळ आले होते. त्यामुळे सर्व मचव्यातील सर्व लोकांनी येशूच्या धमकावण्यामुळे पसरलेल्या शांततेचा चमत्कार पाहिला होता. आणि त्यानंतरच “हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्रही त्याचे ऐकतात!’ असे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. DAMar 286.5

तुफानी वादळाला तोंड देण्यासाठी जेव्हा येशूला उठवण्यात आले होते. तेव्हा तो अगदीच शांत होता. त्याच्या शब्दात किंवा चेहऱ्यावर भयाची मामुली छटाही उमटलेली नव्हती. तो स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहून शांत झोपी गेला नव्हता, तो पृथ्वी, समुद्र व आकाश यांचा प्रभु होता म्हणून शांत आरामात झोपी गेला नव्हता, तर सर्वस्वी एका सामर्थ्याला शरण गेला होता म्हणूनच शांत झोपला होता, तो म्हणतो, “माझ्याने स्वतः होऊन कांही करवत नाही.” योहान ५:३०. त्याने सर्व समर्थ पित्याच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवला होता. त्याने देवाची प्रीति, देखरेख व वादळ शांत केलेला त्याचा (देवाचा) शब्द यावर विश्वास ठेवला होता. DAMar 286.6

जसा येशू त्याच्या पित्याच्या देखरेखीवर विसंबून राहिला तसेच आपणही आपल्या तारणाऱ्याच्या देखरेखीवर अवलंबून राहिले पाहिजे. जर त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असता तर ते निर्धास्त राहिले असते. धोक्याच्या प्रसंगी त्यांच्या भयभीत मनांनी त्याच्यावरील अविश्वास प्रगट केला. स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात ते येशूला विसरून गेले; आणि मीपणामुळे निराशा पदरी पडल्यानंतर ते त्याच्या मदतीसाठी त्याच्याकडे वळले. DAMar 287.1

किती तरी वेळा शिष्यासारखाच आपलाही अनुभव असतो! जेव्हा आपल्या सभोवती मोहाचे वादळ घोंगावू लागते, आणि मोहाच्या लाटा आमच्यावर आदळू लागतात, प्राणघातक विजा चमकू लागतात तेव्हा वादळाशी झगडणारे मदत करणारे कोणीतरी आपल्याबरोबर आहे हे विसरून आपण एकटेच झगडू लागतो. पूर्णपणे निराशा पदरी पडेपर्यंत, व मरणाचा क्षण जवळ येईपर्यंत आपण आपल्या शरीरबळावर विश्वास ठेवतो. मग अगदी शेवटी आपल्याला येशूची आठवण होते. अशा त-हेने जरी आपण वाचवण्यासाठी त्याला विनंती केली तरी ती वाया जात नाही. जरी दुःखी होऊन तो आपल्या अविश्वासाची व मीपणाची कानउघाडणी करितो तरी तो आपल्याला लागणारी मदत करण्यास हयगय करीत नाही. आपण सागरावर असो किंवा जमिनीवर असो जर उद्धारक आमच्या अंतःकरणात असला तर आपणाला भय बाळगण्याचे काहीच कारण नाही. तारणाऱ्यावरील आपला जिवंत विश्वास जीवनसागराला शांत करील आणि त्याला माहीत असलेल्या उत्तम मार्गाने आपली सुटका करील. DAMar 287.2

वादळ शांत करण्याच्या चमत्कारात आणखी एक आध्यात्मिक धडा आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव पवित्र वचनाच्या सत्यतेबाबत साक्ष देतो. “दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही,... दुर्जनास शांति नाही असे माझा देव म्हणतो.” यशया ५७:२०, २१. पापाने आपली शांति बेचिराख केली आहे. मीपणाला नतमस्तक केल्याशिवाय आपल्याला शांति कदापि मिळणार नाही. मनाचे मनमानी विकार कोणतीही मानवी शक्ती नियंत्रणात ठेवू शकत नाही. तुफान वादळ शांत करण्यात शिष्य जितके असहाय होते तितकेच आपणही असहाय आहोत. परंतु खवळलेल्या गालील समुद्राला “शांत हो’ असा हुकूम देऊन ज्याने शांत केले. तो प्रत्येक व्यक्तीच्या मनातील खवळलेल्या वादळास शांत हो या शब्दाने शांत करतो. मग ते वादळ कितीही तुफानी असो, जे कोणी “प्रभु आम्हाला वाचवा,’ अशी येशूकडे विनंती करतात, त्यांची तो सुटका करतो. प्रत्येक व्यक्तीचा देवाशी समेट करणारी त्याची कृपा मानवाच्या मनोविकाराचे वादळ शांत करते आणि त्याच्या प्रीतित त्या व्यक्तीला विश्रांति मिळते. “तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात, त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात, आणि तो त्यास इच्छित बंदरात नेतो.’ स्तोत्र. १०७:२९, ३०. “यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो.” “नीतिमत्तेचा परिणाम शांति व तिचे फल सर्वकालचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.” रोम ५:१; यशया ३२:१७. DAMar 287.3

अगदी सकाळी, सकाळी, तारणारा व त्याचे सोबती किनाऱ्यावर आले, त्यावेळी उगवत्या सूर्याची कोवळी किरणे शांतीच्या अभिवादनाने भूप्रदेशाला व समुद्राच्या पाण्याला कोमल स्पर्श करीत होती. परंतु त्यांचे पाय किनाऱ्यावर पडले नाहीत तोच खवळलेल्या वादळापेक्षाही उग्र देखाव्याने त्यांचे स्वागत केले. अज्ञातवासाच्या स्थळापासून दोन वेडी माणसे त्यांच्यावर अशी तुटून पडली की, जसे काय त्यांना त्यांचे तुकडे तुकडे करायाचे होते. बांधून ठेवलेल्या बंदिखान्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी तोडलेल्या बेड्यांचे तुकडे त्याच्या अंगावर लोंबकळत होते. त्यांनी स्वतःला दगडाने ठेचल्यामुळे त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या आणि ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या लांब लांब आणि जठायुक्त केसातून त्यांचे डोळे चमकताना दिसत होते. त्यांना लागलेल्या भूतानी त्यांचे मानवरूप छिन्नविच्छिन्न करून बेरूप केले होते, त्यामुळे ते माणसापेक्षा जंगली श्वापदासारखे दिसत होते. DAMar 288.1

शिष्य व त्यांचे सोबती यांनी भयकंपीत होऊन तेथून पळ काढला; त्याचवेळी त्यांना ख्रिस्त त्यांच्यात नसल्याचे समजले, म्हणून त्याला शोधण्यासाठी माघारी फिरले. त्यांनी त्याला ज्या ठिकाणी सोडले होते त्याच ठिकाणी तो उभा होता. ज्या प्रभूने वादळ शांत केले होते, त्याने सैतानाशी सामना करून त्याला पराभूत केले होते, तो त्या भूतापासून भीतीने पळून गेला नाही. जेव्हा ती दोन माणसे दात खात व तोंडातून फेस काढीत धावत येशूच्या जवळ आली, तेव्हा, त्याने समुद्र शांत करण्यासाठी उग्र स्वरूप धारण केलेल्या आवाढव्य लाटांना मागे रेटण्यासाठी जे हात उंचावले होते, तेच उंचावले, आणि ते दोन भूतग्रस्त त्याच्या जवळपास येण्यासाठी एक पाऊलही पुढे टाकू शकले नाहीत. आरडा ओरड करीत ते तेथेच उभे राहिले परंतु त्याच्यापुढे त्यांना काहीच करता आले नाही. DAMar 288.2

मोठ्या अधिकार वाणीने येशूने त्या अशुद्ध आत्म्यांना त्यांच्यातून बाहेर पडण्याची आज्ञा दिली. त्याचे ते अधिकारयुक्त शब्द त्या अभागी माणसांच्या गोंधळलेल्या मनांत शिरले. त्यांच्या जवळ जो उभा होता तो सतावणाऱ्या भूतांना काढू शकत होता याची त्यांना पुसटशी कल्पना आली. त्याची स्तुती करण्यासाठी ते त्याच्या चरणावर पडले. परंतु कृपेची विनंती करण्यासाठी जेव्हा त्यांची तोंडे उघडली, तेव्हा भूते त्यांच्याद्वारे मोठ्याने ओरडून म्हणाली. “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पीडिशील तर तुला देवाची शपथ.” येशूने विचारले, तुझे नांव काय? त्याने उत्तर दिले “माझे नांव सैन्य; कारण आम्ही DAMar 288.3

पुष्कळ आहो.” त्या पीडीत माणसाच्या संपर्काचे माध्यम म्हणून उपयोग करून त्यांना त्या प्रदेशातून बाहेर न पाठविण्याची त्यांनी येशूकडे विनंती केली. तेथून अगदी जवळच डोंगरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. त्या कळपात शिरण्याची त्या भूतांनी येशूकडे विनंती केली, आणि येशूने त्यांना तशी परवानगी दिली. तत्काळ ते डुकरात शिरले व त्यांनी त्यांच्या कळपाचा ताबा घेतला. आणि तो वेड्यासारखे कड्यावरून सुसाट वेगाने धावत सुटले आणि समुद्र किनारा जवळ आल्याचे लक्षात न आल्यामुळे तो कळप सरळ सरोवरात पडला व मेला. DAMar 289.1

दरम्यान भूतग्रस्तामध्ये अद्भूत फरक घडून आला, त्यांची मने प्रकाशीत झाली. त्यांच्या नेत्रात सुज्ञतेची झाक दिसली रक्ताने डागाळलेले हात स्वच्छ झाले आणि हर्षमय आवाजात ते तारणाऱ्यासाठी देवाची स्तुती करू लागले. DAMar 289.2

डुकरे चारणाऱ्यांनी घडलेला सर्व प्रकार डोंगरावरून पाहिला होता. ती बातमी त्यांच्या मालकाना व इतर सर्व लोकांना सांगण्यासाठी ते तत्काळ धावत गेले. भीतीने व आश्चर्याने गावाचे सर्व लोक येशूकडे गेले. ते भूतग्रस्त त्या प्रदेशाचे कर्दनकाळ होते. ते ज्या ठिकाणी राहात होते तेथून ये जा करणे कोणाच्याही सुरक्षिततेचे नव्हते; कारण ते प्रवाशावर शीर्घ गतीने सैतानी हल्ला चढवीत असत. पण आता ते निट-नेटका पोशाख करून समंजसपणे, येशूची बोधवचने ऐकत व ज्याने त्याना शुद्ध केले त्याच्या नावाचे गौरव करीत त्याच्या चरणापाशी बसले होते. परंतु ज्यानी हा देखावा पाहिला त्यांनी हर्ष केला नाही. त्यांना सैतानाच्या बंदिवानाच्या सुटकेपेक्षा डुकरांचा नाश अधिक महत्त्वाचा वाटला होता. DAMar 289.3

डुकरांच्या मालकावर दया करण्याच्या उद्देशानेच हे नुकसान होऊ दिले होते. ते जगिक गोष्टीत अतिशय गुरफटले होते, आणि आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष देत नव्हते. त्यांच्या मनावरची स्वार्थाची मोहीनी मोडून काढण्याची त्याची उत्कट इच्छा होती, यासाठी की ते त्याच्या कृपेचा स्वीकार करू शकतील. त्यांच्या ऐहिक नुकसानीसाठी त्यांना झालेले दुःख व आलेला राग यामुळे त्यांचे डोळे अंधळे झाले होते म्हणून त्यांना येशूची कृपा दिसत नव्हती. DAMar 289.4

अद्भुत शक्तीच्या सेवेने लोकांची खोटी धर्म पद्धत चेतविली गेली होती, आणि त्यांच्यात भीती निर्माण झाली होती. ह्या अनोळखी व्यक्तीला त्यांच्यात राहू दिले तर, पुढे चालून अरिष्टे येतील, आर्थिक हानी होईल असे त्यांनी अनुमान काढले, आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ज्या लोकांनी सरोवर पार केले होते, त्यांनी आदल्या रात्री घडलेला सर्व वृतांत, वादळामुळे निर्माण झालेला धोका, आणि वादळाला कसे शांत केले होते, हे लोकांना सांगितले. परंतु त्या सांगण्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. भीतीने लोकांनी त्याच्यासभोवती गर्दी केली, आणि त्याला त्यांच्यातून निघून जाण्याची विनंती केली. त्याने ती विनंती मान्य केली, आणि तत्काळ मचव्यातून पैल किनाऱ्यावर गेला. DAMar 289.5

गदरेकरामधल्या लोकांनी येशूच्या सामर्थ्याचा व दयेचा साक्षात पुरावा पाहिला होता. ज्यांच्यात विचार शक्तीची पुनः स्थापना केली त्यांना त्यांनी पाहिले; परंतु त्यांचे ऐहिक हितसंबंध संकटात जातील याची त्यांना इतकी भीती वाटली की, ज्याने त्यांच्या डोळ्यादेखत अंधाराच्या अधिपतीला पराभूत केले होते त्याला त्यांनी घूसखोरासारखी वागणूक दिली होती, आणि स्वर्गीय देणगीला त्यांच्या दारातून परत पाठवण्यात आले होते. गदरेकराप्रमाणे ख्रिस्तापासून परत जाण्याचा आम्हाला प्रसंग आलेला नाही; तरी पण त्याचा शब्द पाळण्यास नाकारणारे पुष्कळ लोक आहेत; कारण आज्ञा पालनात काही ऐहिक सुखाचा त्याग अंतर्भूत आहे. कदाचित त्याच्यामुळे त्याना आर्थिक तोटा सोसावा लागेल म्हणून त्याचा अनुग्रह ते धिक्कारतात आणि त्याच्या आत्म्याला हांकून लावतात. DAMar 290.1

परंतु बरे झालेल्या भूतग्रस्ताची भावना फारच निराळी होती. ते त्यांच्या मुक्तिदात्याच्या सहवासात राहाण्याची इच्छा बाळगीत होते. ज्याने त्यांना पिळून काढले होते व त्यांचा ऐन तारुण्याचा काळ वाया घालविला होता, त्या सैतानापासून त्यांना त्याच्या सान्निध्यात संरक्षण वाटत होते. येशू मचव्यात चढणार होता इतक्यांत ते त्याच्या अगदी जवळ गेले, त्याच्या चरणाजवळ गुडघे टेकले, आणि त्यांना त्याच्या सन्निद्ध ठेवण्यासाठी कळकळची विनंती केली, यासाठी की त्यांना त्याची वचने सतत ऐकण्यास मिळतील. परंतु ख्रिस्ताने त्यांना घरी जाण्याची व प्रभूने त्यांच्यासाठी काय महान कृत्य केले होते हे सांगण्याची आज्ञा केली. DAMar 290.2

येशूने त्यांना करण्यासाठी एक काम दिले, - इतर धर्मियांच्या घरी जावयाचे आणि त्यांना, त्या दोघाना येशूपासून मिळालेल्या आशीर्वादाविषयी सांगायचे. तारणाऱ्यापासून विभक्त होणे त्यांना कठीण वाटत होते. त्यांना विधर्मी बांधवाबरोबर संबंध ठेवताना मोठ्या अडचणी खात्रीने येतील असे त्यांना वाटत होते, आणि प्रदीर्घ काळ समाजाला सोडून त्यांनी काढलेल्या एकांतवासामुळे त्यांना येशूने सांगितलेले कार्य करण्यास ते अपात्र आहेत असेही त्यांना वाटत होते. तथापि येशूने त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देताच ते त्याच्या सांगण्याप्रमाणे करण्यास तयार झाले होते. त्यांनी येशूविषयी केवळ त्यांच्या कुटुंबियाना व शेजाऱ्यानाच सांगितले असे नाही, तर ते सर्व देकापलासभर व इतरत्र त्याच्या तारणदायी सामर्थ्याविषयी सांगत व त्याने त्यांना भूताच्या तावडीतून कसे सोडविले याचे वर्णन करीत फिरले. त्याच्या सान्निध्यात राहाणे त्यांच्यासाठी जितके हितकारक होणार होते, त्यापेक्षा त्यांनी त्याचे कार्य करणे हे त्यांच्यासाठी अधिक आशीर्वादाचे ठरणार होते. सुवार्तेचा प्रसार करण्याच्या कार्यामुळे आम्हाला आपल्या तारणाऱ्याच्या अधिक जवळ आणिले जाते. DAMar 290.3

भूते काढलेले भूतग्रस्त हे देकापलीस प्रदेशात सुवार्ता गाजविण्यासाठी ख्रिस्ताने पाठविलेले पहिले मिशनरी होते. ख्रिस्ताचा शब्द ऐकण्याची त्यांना काही क्षणाचीच संधि मिळाली होती पण असा ख्रिस्ताचा एकही संदेश त्यांना ऐकण्यास कधीच मिळाला नव्हता. सदोदित ख्रिस्ताबरोबर असणारे शिष्य ज्या प्रकारे लोकांना शिक्षण देऊ शकत होते तसे ते देऊ शकत नव्हते. तथापि येशू हाच मशीहा होता असे पटवून देणारा पुरावा त्यांनी त्याच्या जीवनात अनुभवलेला होता. त्यांना जे माहीत होते, त्यांनी स्वतः जे पाहिले व ऐकले होते, आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी त्यांना काय वाटत होते तेच ते सांगू शकत होते. ज्यांच्या हृदयाला देवाच्या दयेचा स्पर्श झाला आहे ते सर्वजण अगदी तसेच करू शकतात. येशूचा प्रिय शिष्य योहान यानेही लिहिले की, “जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे, व त्याची साक्ष देतो; ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले, तुम्हासही कळवितो जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासही कळवितो की तुमचीही आम्हाबरोबर भागी व्हावी; आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे.’ १ योहान १:१-३. ख्रिस्ताचे साक्षीदार या नात्याने आपल्याला काय माहिती आहे, आपण स्वतः काय पाहिले व ऐकले व कशाची प्रचिती घेतली आहे हेच आपल्याला सांगावयाचे आहे. आपण जर येशूचे पायरीपायरीने अनुकरण करीत असू, तर त्याने आपल्याला ज्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन केले त्या मार्गाविषयी मुद्देसूदपणे सांगण्यास आपणाजवळ काहीतरी असेल. आम्ही त्याच्या अभिवचनाचा कसा अनुभव घेतला याविषयी आपण सांगू शकू. DAMar 290.4

गदरेकरानी जरी येशूचा स्वीकार केला नव्हता; तरी त्याने त्यांना त्यानी निवडलेल्या पसंत केलेल्या अंधारात राहू दिले नव्हते. ज्या वेळी त्यांनी त्याला त्यांना सोडून जाण्याची विनंती केली, त्यावेळी त्यांनी त्याची वचने - शब्द ऐकले नव्हते. ते कशाचा अव्हेर करीत होते याविषयी ते अज्ञानी होते. म्हणून ज्यांच्याकडून ऐकण्याचा ते नाकार करणार नाहीत अशा लोकांकडून त्याने त्यांना पुन्हा प्रकाश पाठविला. DAMar 291.1

डुकराचा नाश करण्यात, लोकांना येशूपासून दूर लोटण्याचा आणि त्या प्रदेशांत सुवार्ता प्रसाराच्या कार्याला अडथळा आणण्याचा सैतानाचा इरादा होता. परंतु त्या घटनेने सर्व प्रदेशाला जागृत केले होते, व येशूकडे लक्ष वेधले होते. त्याप्रकारे इतर कोणत्याही गोष्टीने केले नसते. जरी स्वतः तारणारा तेथून निघून गेला होता, तरी त्याच्या सामर्थ्याविषयी साक्ष देण्यासाठी त्याने बरे केलेले लोक तेथेच राहीले होते. जे लोक अंधकाराच्या सेनापतीचे हस्तक (माध्यम) होते तेच प्रकाश वाहीन्या बनले होते, देवाच्या पुत्राचे सुवार्तिक बनले होते. लोकांनी ती विस्मरकारक बातमी ऐकली तेव्हा ते थक्क झाले. त्या सर्व प्रदेशात सुवार्तेसाठी मार्ग मोकळा झाला होता. जेव्हा येशू देकापलीसला परत आला, तेव्हा फक्त एका गावातीलच नव्हे सभोतालच्या सर्व प्रदेशातून हजारोच्या संख्येने लोकांनी येशू भोवती गर्दी केली, आणि त्यांनी तीन दिवस तारणाचा संदेश ऐकला. भूताची सत्तासुद्धा तारणाऱ्याच्या ताब्यात आहे, अधिकाराखाली आहे आणि दुष्टाईची कृत्ये सात्विकतेने दूर हटविण्यात येतात. DAMar 291.2

गदरेकराच्या प्रदेशात झालेल्या सामन्यामध्ये शिष्यांसाठी एक धडा होता. सैतान सर्व मानवजातीला भयंकर अपमानास्पद परिस्थितीत ओढण्याचा प्रयत्न करीत आहे व त्याच्या सत्तेतून सुटका करणाचे कार्य ख्रिस्त करीत आहे हे दाखविले आहे. कबरस्थानात घर करणारे, भूतबाधा झालेले, बेभान किळसवाण्या पापी वासना व मनोविकार यांच्या गुलामगिरीत अडकलेली ही दुर्भागी माणसे सैतानी हुकमतीखाली जाऊ दिली तर त्यांची काय दशा होते याचे दर्शक आहेत. वैचारिक गोंधळ माजविण्यासाठी, वाईट, दुष्ट कृत्यासाठी मनाचा ताबा घेण्यासाठी, आणि खळबळ व गुन्हेगारी याना चेतवण्यासाठी सैतानी प्राबल्याचा उपयोग केला जातो. तो देहाला दुबळे करतो मनात गोंधळ माजवितो व आत्म्याचा अधःपात करतो. ज्या ज्या वेळी लोक तारणाऱ्याच्या आमंत्रणाचा अव्हेर करतात त्या त्या वेळी ते सैतानाला वश होत असतात. जीवनाच्या प्रत्येक स्थरावर, घरात, उद्योग धंद्यात आणि मंडळीतसुद्धा असंख्य लोक आज हेच करतात. याच कारणाने सर्व जगभर दहशतवाद व गुन्हेगारी पसरली आहे, आणि मानवाच्या वस्त्यावर कफणाप्रमाणे आध्यात्मिक अंधार आच्छादला आहे. त्याच्या वरसंगी (आकर्षक) मोहाद्वारे सैतान लोकांना पूर्ण नीतिभ्रष्ट व संपूर्ण नाश होईपर्यंत महाभयंकर दु:ष्ट कृत्ये करण्यास मार्गदर्शन करतो. त्याच्या शक्तीविरुद्ध संरक्षण केवळ ख्रिस्ताच्या सान्निध्यातच सापडते. देवदत व मानव यांच्यासमोर सैतानाला मानवाचा शत्रू व संहारक म्हणून व ख्रिस्ताला मानवाचा मित्र व तारक म्हणून प्रगट करण्यात आले आहे. त्याच्या (पवित्र) आत्म्याच्याद्वारे मानवात शीलसंवर्धन होऊन स्वभावाला मोठेपणा प्राप्त होईल व आत्म्याने देवाचे गौरव होईल असा मनुष्य उत्पन्न करील. “कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे.” २ तिमथ्य १:७. त्याने आपल्याला “प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव” “प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.’ त्याचप्रमाणे “पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे’ म्हणून आम्हाला पाचारण केले आहे. २ थेस्सल. २:१४; रोम ८:२९. DAMar 292.1

सैतानाची शस्त्रे - साधने बनण्याइतपत खालच्या दर्जाप्रत पोहंचलेल्या लोकांना ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे सात्विकतेच्या (धार्मिकतेच्या) सेवकांमध्ये रूपान्तर केले जाते व देवाच्या पत्राद्वारे त्यांना “प्रभूने” त्याच्यावर “दया करून केवढी मोठी कार्ये केली.’ हे सांगण्यासाठी पाठविले जाते. DAMar 292.2