मोक्षमार्ग

1/28

मोक्षमार्ग

अनिक्रमणिका

अध्याय १ ला—ईश्‍वराचेंमनुष्यावरीलप्रेम

सृष्‍टि आणि प्रकटीकरण म्हणजे पवित्रशास्‍त्र हीं दोन्ही ईश्‍वराच्या प्रेमविषयीं साक्ष देत आहेत. आपला स्वर्गीय पिता जीवनाचा, ज्ञानाचा व आनंदाचा कंद आहे. सृष्‍टींतल्या आश्चर्यकारक आणि सुंदर पदार्थाकडे पहा. मनुष्याच्याच नव्हें, तर एकंदर सार्‍या प्राणीमात्राच्या सुखाला आणि गरजांना अनुसरून ते योजलेले असावे हा चमत्कार होय. ह्या चमत्काराचा विचार करा. पृथ्‍वीला आनंदित आणि प्रसन्न करणारा सूर्यप्रकाश व मेघ, पर्वत, समुद्र, मैदानें, हें सारें सृष्टिकर्त्याच्या प्रेमाचें वर्णन करीत आहे. ईश्‍वरच आपल्या प्राण्यांच्या रोजच्या गरजा पुरवीत आहे. हे गीतकर्त्याचे सुंदर शब्द वाचून पहा:--- WG 5.1

“सर्वांचीं नेत्रें तुजकडे लागतात,
आणि सुसमयीं त्यांस त्यांचें भक्ष देतोस.
तूं आपला हात उघडून
सर्व जीवजंतूंची इच्छा तृप्‍त करतोस.”1
WG 5.2

ईश्‍वरानें मनुष्याला पूर्णपणें शुद्ध व सुखी असा निर्मिला; तशीच ही पृथ्वी सृष्‍टिकर्त्यांकडून अस्‍तित्वांत आली, तेव्हां हिच्यावर दु:ख आणि मरण आलें तें ईश्‍वराच्या नियमाचा - प्रीतीच्या नियमाचा-अतिक्रम केल्यानें आलें. तरीसुद्धां पापापासून उद्भवणारें जें दु:ख त्याचें पृथ्वीवर काहूर माजलेलें असून त्यांतून देखील ईश्‍वराची प्रीति व्यक्त होत आहे. असें लिहिलें आहे,कीं ईश्‍वरानें मनुष्यामुळें पृथ्वीला शाप दिला.2 ह्या जगांतले काटे आणि कंटकारण्यें-ज्यांच्या योगानें मनुष्याचें जिणें श्रमाचें आणि काळजीचें होतें- त्या अडचणी आणि संकटे हीं त्यांनें त्याच्या बर्‍याकरितां नेमिलीं आहेत. पापामुळें झालेला नाश आणि भ्रष्‍टपणा ह्यांतून त्याला उद्धरण्याची जी ईश्‍वराची योजना, तिला आवश्‍यक असा एक शिक्षणाचा भाग आहे. जग पतन पावलेलें असलें, तरी सारें दु:खमय, सारें विपत्तिमय नाहीं. सृष्‍टिकडूनच आपणांस कितीतरी आशेचे व समाधानाचें निरोप मिळत आहेत. काटेरी झाडांवर फुलें असतात, काटे गुलाबांनीं झाललेले सांपडतात. WG 5.3

फुलणार्‍या प्रत्येक कळीवर, उगवणार्‍या प्रत्येक पात्यावर “देव प्रीति आहे” असें लिहिलें आहे. आपल्या मधुर गायनानें आसपासचा प्रदेश नादित करुन टाकणारे सुंदर पक्षी, रंगाची नाजुक छटा असलेली व ज्यांचा सुवास हवेंत कोंदून जिकडे तिकडे घमघमाट सुटलेला आहे अशीं फुलें, हिरवीगार पालवी फुटलेले रानांतील गगनचुंबित वृक्ष, हीं ईश्‍वराच्या आपणांवर असलेल्या पितृवात्सल्याची साक्ष देत आहेत, व आपल्या लेकरांस सुखी ठेवावें अशी त्याची इच्छा दर्शवींत आहेत. WG 6.1

देवाचें वचन आपणांस त्याचें शील कसें आहे हें प्रगट करीत आहे. स्वत: त्यानें अमर्याद प्रीति व दया आम्हांस व्यक्त केली आहे. “कृपाकरुन आपलें वैभव मला दाखीव” अशी जेव्हां मोश्यानें प्रार्थना तेव्हां ईश्‍वर त्यास म्हणाला “मी आपलें बरेंपण सर्व तुजपुढें जवळून चालवीन.”1 हेंच त्याचें वैभव. परमेश्वर त्याजपुढें जवळून जाऊन मोठ्यानें असें बोलला, “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध व फार दयेचा व सत्यतेचा; हजारोंवर दया राखतो, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करतो.”2 “तो मंदक्रोध व फार दयाळू आहे,”3 “कारण त्याला दया आवडते.”4 WG 6.2